शेळीपालनाचे उभारले आदर्श मॉडेल

शेळीपालनाचे उभारले आदर्श मॉडेल
शेळीपालनाचे उभारले आदर्श मॉडेल

कवठे (ता. वाई, जि. सातारा) येथील पृथ्वीराज दिलीप चव्हाण या युवा शेतकऱ्याने बाजारपेठेतील जातिवंत शेळ्यांची मागणी लक्षात घेत पाच वर्षांपूर्वी शेळीपालनास सुरवात केली. शास्त्रीय व्यवस्थापनातून त्यांनी बंदिस्त शेळीपालनाचे स्वतःचे मॉडेल विकसित केले. शेळी, करडे, बोकड विक्रीबरोबरीने त्यांनी मटण प्रक्रिया उद्योगाला नुकतीच सुरवात केली आहे.

पुणे-बंगळूर महामार्गावर सातारा जिल्ह्यात कवठे गावशिवारात विठ्ठलवाडी आहे. येथील पृथ्वीराज दिलीप चव्हाण या युवा शेतकऱ्याचा सुंबरान गोट फार्म राज्यभरातील शेतकऱ्यांच्यासाठी प्रशिक्षण केंद्र झालाय. बारामती येथील कृषी महाविद्यालयातून पृथ्वीराजने बी.एस.सी.(कृषी) पदवी घेतली. त्यानंतर बंगळूर येथील ॲग्री बिझनेस ॲन्ड प्लॅंटेशन मॅनेजमेंट हे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. ‘कॅम्पस इंटरव्ह्यू''च्या माध्यमातून एका नामांकित कंपनीत सांगली येथे मार्केटिंग विभागात नोकरीदेखील मिळाली. पुढे चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी पृथ्वीराजला होती. घरच्यांचाही मुलाने शेतीपेक्षा नोकरी करावी असाच आग्रह होता. परंतु पृथ्वीराजने वर्षभरात नोकरी सोडली. कारण त्याने शेळीपालनातील आर्थिक ताकद ओळखली होती.

शेळीपालनात दिसली संधी

बी.एससी.(कृषी)चे शिक्षण घेत असाताना ग्रामीण कृषी कार्यानुभवाच्या निमित्ताने पृथ्वीराज इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडे सहा महिने होता. या भागातील शेतकऱ्यांचा जिरायती शेतीच्या बरोबरीने शेळीपालन हा पूरक व्यवसाय. परंतु शेळ्यांचे व्यवस्थापन आणि मार्केटिंग व्यवस्थित नसल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न हाती लागायचे नाही. परंतु शेतकऱ्यांच्या बोलण्यातून त्याला शेळ्यांचे आर्थिक गणित चांगलेच समजले होते. त्यामुळे शिक्षण सुरू असतानाच त्याने शेळीपालनात करिअर करण्याचा निर्णय घेतला. पदवी पूर्ण झाल्यानंतर एक वर्ष नोकरी केल्यानंतर पृथ्वीराजने फेब्रुवारी, २०१२ मध्ये बंदिस्त शेळीपालन व्यवसाय सुरू केला. घरचे पहिल्यांदा नाराज होते. परंतु त्याच्या जिद्दी स्वभावापुढे घरच्यांना पाठबळ देण्याशिवाय गत्यंतर उरलं नाही. वडिलोपार्जित ३८ गुंठे शेतीमध्ये त्यांने शेळीपालनास सुरवात केली. दहा गुंठे क्षेत्रापैकी चार गुंठे क्षेत्राला तार कंपाउंड करून एक गोठा केला. तसेच सहा गुंठे क्षेत्रामध्ये पत्रा शेड करून शेळ्यांसाठी निवारा तयार केला. वीस गुंठे क्षेत्रावर चारा पिकांची लागवड केली.  या दरम्यान हळूहळू अभ्यास करत आफ्रिकन बोअर जातीचा छोटा नर आणि स्थानिक जातीच्या दहा शेळ्या विकत घेऊन व्यवसायाला सुरवात केली. सुरवातीला नोकरीच्या उत्पन्नातील काही वाटा शेळीपालनात गुंतवला. अनुभव वाढत गेल्यानंतर शेळ्यांची संख्या वाढवत नेली. सध्या पृथ्वीराजच्या शेळीपालन प्रकल्पात १७२ शेळ्या आहेत.

शेळीपालनात मिळवली मास्टरी

  • मुंबई येथील पशुवैद्यकीय महाविद्यालय, फलटण येथील नारी संस्था आणि  मांस संशोधन संस्था, हैद्राबाद येथून पृथ्वीराजने शेळीपालन प्रशिक्षण घेतले. राज्य, परराज्यांतील प्रकल्पांना भेटी दिल्या. त्यातून शेड व्यवस्थापन हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचे समजले. अन्य प्रकल्पांत जाणवणाऱ्या त्रुटी आपल्या प्रकल्पामध्ये कमी केल्या. उदाहरण सांगायचे तर बऱ्याचदा बंदिस्त पद्धतीत शेळ्यांना २४ तास एकाच जागेवर ठेवले जाते. परिणामी, सातत्याने गोठा ओला व दुर्गंधीयुक्त राहतो. असे  वातावरण गोचीड, पिसवांसारख्या बाह्यपरोपजीवींसाठी पोषक असते. पृथ्वीराजच्या प्रकल्पात खाद्याची जागा व शेळ्यांच्या मुक्कामाची जागा वेगवेगळी असल्यामुळे शेड स्वच्छ व कोरडी राहते. यामुळे रोगराईचे प्रमाण अत्यल्प आहे.
  • जातिवंत नर-मादी विक्रीवर भर, बकरी ईदसाठी जातिवंत व धष्टपुष्ट नर तयार केले जातात. स्थानिक शेळ्यांच्या बरोबरीने आफ्रिकन बोअर, सिरोही, सोजत आणि स्थानिक जातीच्या शेळ्यांचे पालन.
  • वजनवाढीचा वेग स्थानिक जातींमध्ये अत्यल्प असतो. त्याचा उत्पन्नावर परिणाम होतो.त्यामुळे पृथ्वीराजने आफ्रिकन बोअर जातीच्या नरासोबत संकर केल्यास त्या शेळ्यांपासून होणारी पैदास वर्षभरात ४५ ते ५५ किलो वजनाचे होतात. त्यामुळे बोअर जातीचे नर कळपात वापरले.  
  • अन्य ठिकाणी शेळ्यांमध्ये वजनवाढीचा दर जिथे प्रतिदिन ५० ते १०० ग्रॅम असतो, त्या तुलनेत पृथ्वीराजकडील करडांचा वजनवाढीचा दर २२० ते २५० ग्रॅम प्रतिदिनी आहे. वर्षात सुमारे ८० ते ९० किलोचे विक्रीयोग्य नर तयार होतात.
  • शेळीपालनासाठी पृथ्वीराजने १८ बाय ३५ फूट आकाराचे दोन निवासी, तर १६ बाय ६० फूट आकाराच्या खाद्यासाठी दोन शेड बांधल्या. पाण्यासाठी दोन हजार लिटरची टाकी ठेवली आहे.
  •  वीस गुंठे क्षेत्रावर बहुवार्षिक एकदल आणि द्विदल चारा लागवड केल्याने वर्षभर पुरेशा चाऱ्याची उपलब्धता होते.
  •  काटेकोर आहारामुळे करडे, शेळी, बोकडांची चांगली वाढ. वेळेवर लसीकरण, जंतनिर्मूलनामुळे मरतुकीवर पूर्णतः नियंत्रण.
  •  बकरी ईदसाठी दीड वर्ष वाढवलेल्या सुमारे ७० ते ८० किलो वजनाच्या बोकडाची विक्री होते. शुद्ध बोअर जातीचे नर असल्यास प्रति किलो १५०० रुपये दराने आणि मादीची विक्री तीन हजार रुपये प्रति किलो दराने होते. जाती व जातीच्या शुद्धतेनुसार दरात फरक राहतो.
  •  वर्षभरात ३० नर आणि २५ माद्यांची विक्री. वर्षभरात २० ट्रॉली लेंडी खताची  विक्री.
  •  वाढविली शेळ्यांची गुणवत्ता

  •  सिरोही, सोजत आणि स्थानिक शेळ्यांमध्ये निवड पद्धतीने जुळी करडे देण्याऱ्या शेळ्यांचे प्रमाण ६० टक्‍क्‍यांपर्यंत वाढवले.  
  • जन्मलेल्या करडांमधील मृत्यूचे प्रमाणही शून्य टक्के ठेवण्यात यश.
  • पृथ्वीराजने आपल्या शेडमध्ये जन्मणाऱ्या प्रत्येक करडाची तसेच त्याच्या आई-वडिलांची शास्त्रीय नोंद ठेवली आहे. या जातीची दूध देण्याची क्षमता, वेतक्षमता, वाढीचा वेग, आनुवंशिक गुणधर्म आदी सर्व नोंदी असल्याने जातीची शुद्धता तपासणे व तशा जाती विकसित करणे शक्‍य झाले. नोंदीच्या दृष्टीने प्रत्येक शेळीच्या कानात क्रमांकाचे बिल्ले आहेत.
  • बकरी ईदच्या अगोदर बोकडांचा फॅशन शो ही संकल्पना पृथ्वीराज दरवर्षी राबवितो. त्यामुळे परिसरातील व्यापारी, शेतकरी बोकड पहाण्यासाठी येतात.त्यातून फार्मवरच शेळ्या, बोकड आणि करडांच्या विक्रीला फायदा झाला. दर वर्षी शेळीपालन प्रकल्पातून किमान निव्वळ नफा सात ते आठ लाखांपर्यंत पोहोचला आहे.
  • गेल्या पाच वर्षात किमान सहा हजार लोकांनी शेळीपालन प्रकल्पाला भेटी दिल्या आहेत. पृथ्वीराज सकाळच्या एसआयएलसी तर्फे आयोजित प्रशिक्षण वर्गामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो. याचबरोबरीने त्यांच्या प्रकल्पातही शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची सोय त्याने उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरातील १५४ शेतकऱ्यांनी शेळीपालन प्रकल्पांना सुरवात केली आहे.
  • येत्या काही महिन्यांतच पृथ्वीराज मटण प्रक्रिया उद्योगाला सुरवात करीत आहे. पहिल्या टप्यात  ५०० किलो मटण लोणचे विक्रीसाठी तयार केले असून पुणे बाजारपेठेत विक्रीचा शुभारंभ होत    आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com