कमी पाण्यावरील सीताफळ ठरतेय फायदेशीर

कमी पाण्यावरील सीताफळ ठरतेय फायदेशीर
कमी पाण्यावरील सीताफळ ठरतेय फायदेशीर

नांदेड जिल्ह्यातील नांदूसा (ता. अर्धापूर) या भागातील शेती अलीकडे पावसावर अवलंबून झाली आहे. पाण्याची हमी नसल्याने कमी पाण्यावर येणाऱ्या काटक अशा सीताफळाची लागवड करून हनमंत माणिकराव राजेगोरे यांनी वेगळा मार्ग निवडला आहे. प्रायोगिक तत्त्वावर केलेल्या ३० गुंठ्यांतील सीताफळ लागवडीतून उत्पन्नाचा चांगला स्रोत निर्माण झाला आहे. या वर्षी त्यांनी आणखी ३ एकर क्षेत्रात लागवडीचा निर्णय घेतला आहे. हिंगोली तालुक्‍यात असलेल्या सिद्धेश्‍वर सिंचन प्रकल्पाचे पाणी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, नांदेड तालुक्‍यांना मिळते. या धरणामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जीवनात सुबत्ता आली होती. सिद्धेश्‍वर- येलदरी धरणाच्या वरील बाजूला दोन धरणे झाल्यामुळे हे धरण पूर्णपणे भरतच नाही. मात्र, गेल्या सहा वर्षांपासून कॅनॉलला पाणीच आले नाही. परिणामी याचा फटका नांदेड जिल्ह्याला बसला असून, केळीसह विविध बागायती पिकांनी फुललेल्या या भागाला पावसावरच अवलंबून राहावे लागत आहे. वास्तविक ही स्थिती २०१० मध्ये बॅंकेतील उत्तम नोकरी सोडून शेतीत उतरलेल्या हनमंत माणिकराव राजेगोरे यांची परीक्षा पाहणारी होती. मात्र, कृषिशास्त्रासह व्यवस्थापनाचे शिक्षण घेतलेल्या राजेगोरे यांनी हार मानली नाही. पाणीस्रोत केले बळकट ः पूर्वी कॅनॉलला पाणी सुटले, की या परिसरातील विहिरी पाण्याने भरून जायच्या. मात्र, कालव्याला पाणीच नसल्यामुळे विहिरीमध्ये पुरेसे पाणी राहत नाही. यातून राजेगोरे यांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी शेताजवळून जाणाऱ्या रस्त्याचा जलसंधारणासाठी उपयोग केला आहे. या रोडच्या बाजूने असलेल्या चराचे खोलीकरण, रुंदीकरण केले. हा चर त्यांनी १२ फूट खोल, १२ फूट रुंद असा ८०० मीटर अंतरापर्यंत स्वखर्चाने खोदला. पावसाळ्यात या चरात सतत पाणी भरून राहते. या चरामुळे या परिसरातील विहिरी, बोअर यांना चांगले झरे मिळतात. त्यामुळे जानेवारीपर्यंत पाणी राहते. सीताफळाला जानेवारी महिन्यांपर्यंत पाणी लागते. त्यापुढे ताण दिला जातो. प्रायोगिक तत्त्वावर केली लागवड ः कमी पाण्यात येणाऱ्या पिकांचा शोध राजेगोरे यांनी सुरू केला. सीताफळाच्या गोल्डन या नवीन वाणाबद्दल समजले. हे पीक प्रत्यक्ष पाहण्यासाठी गोरमाळे (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथील नवनाथ कसपटे यांच्या सीताफळ बागेला भेट दिली. या फळाविषयी सर्व बाबी समजून घेतल्या. आणि सीताफळ लागवडीचा निर्णय घेतला. हे फळपीक आश्वासक वाटले तरी हणमंत राजेगोजे यांनी जपून पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला. प्रथम प्रायोगिक तत्त्वावर ३० गुंठे लागवडीचा निर्णय घेतला. जून २०१२ मध्ये २७५ कलमांची लागवड केली.

फळ लागवडीनंतर साधारणतः तिसऱ्या वर्षापासून फळे घेण्याचे नियोजन असले तरी सिंचनासाठी पाणी कमी पडले. बहार घेता आला नाही. कमी पावसामुळे २० झाडे वाळून गेली. परिणामी चौथ्या वर्षी त्यांचे सीताफळ बागेकडे थोडे दुर्लक्ष झाले. केवळ १० क्विंटल माल निघाला. प्रती किलो ८० रुपये या प्रमाणे फ्रुट स्टॉल धारकांनाच विक्री केली. दुर्लक्ष करूनही सीताफळापासून चांगला फायदा होऊ शकते, हे लक्षात आले. मग केले काटेकोर नियोजन...

  • पाचव्या बहाराचे नियोजन राजेगोरे यांनी अत्यंत काळजीपूर्वक केले.
  • आधीचा हंगाम संपल्यानंतर सीताफळाची जुनी पाने आपोआप गळू लागतात. या वेळी राजेगोजे सीताफळाचे पाणी पूर्णपणे तोडतात व झाडाला विश्रांती देतात. या काळातच मशागतीची व छाटणीची कामे केली की पाऊस सुरू होईपर्यंत सीताफळाला पाणी दिले जात नाही. यामुळे फुलधारणा चांगली होते.
  • पाऊस सुरू झाल्यानंतर १०० किलो डीएपी, १०० किलो पोटॅश, १६० किलो लिंबोळी पेंड व २०० किलो बोनमील त्यांनी बेडमध्ये भरुन घेतले.
  • फळधारणा झाल्यानंतर ०ः ५२ः३४ हे खत २५ किलो प्रमाणात प्रत्येक ६ दिवसाच्या अंतराने ४ वेळा ठिबकद्वारे दिले.
  • बोरॉनच्या कमतरतेमुळे सीताफळांना तडे जातात. ते टाळण्यासाठी फुले लागल्यानंतर व बोराच्या आकाराची फळे असताना असे दोन वेळा ठिबकद्वारे एक किलो बोरॉन दिले.
  • सप्टेंबरमध्ये पाऊस कमी झाल्यानंतर ०ः०ः५० व कॅल्शियम नायट्रेट प्रत्येकी २५ किलो ४ वेळा विभागून ठिबकद्वारे आलटून पालटून दिले.
  • दरम्यानच्या काळात कीड रोगांचा प्रादुर्भावानुसार नियंत्रणाचे उपाय केले.
  • छाटणीचे नियोजन : सीताफळ हे अत्यंत काटक फळपीक आहे. हलकी जमीन असणारे व मोजके पाणी असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे पीक वरदान ठरू शकते. जानेवारीनंतर पाऊस पडेपर्यंत या पिकाला पाणी दिले जात नाही. पावसाळा संपल्यानंतर मात्र फळांच्या पोषणासाठी पाण्याची गरज असते. राजेगोरे यांनी ठिबक बसवले आहे. प्रत्येक ६ दिवसाला ते ५ ते ६ तास ठिबकद्वारे पाणी दिले.

    झाडांची वाढ नियंत्रित ठेवण्यासाठी व उत्तम प्रतीची फळांसाठी दरवर्षी छाटणी करतात. बहाराची छाटणी करताना पेन्सिल आकारापेक्षा लहान काड्या, गर्दी करणाऱ्या, जमिनीलगतच्या फांद्या काढून टाकल्या जातात. राजेगोजे यांची जमीन काळी कसदार असल्यामुळे येथे फांद्यांची वाढ जास्त होते. प्रत्येक फांदीचा दोन ते अडीच फुट अंतराव शेंडा ते मारतात.

    गेल्या सात वर्षांपासून ते ‘ॲग्री क्लिनिक’ चालवतात. विक्रीसाठी समाजमाध्यमांचा वापर ः

  • जूनला छाटणी केलेल्या बागेची नोव्हेंबरपासून एक दिवसाआड फळकाढणी सुरु होते. नांदेड शहरातील दोन सुपर मार्केट व तीन फळविक्रेत्यांना ते प्रति किलो ८० ते ९० रुपये या प्रमाणे माल देतात.
  • समाजमाध्यमांचा वापर आपल्या बागेच्या प्रसिद्धीसाठी केला. नांदेड शहरातील लोक शनिवारी - रविवारी सहलीसाठी बागेत येतात. प्रति किलो रु. १००/- प्रमाणे फळे घेऊन जातात.
  • ढगाळ वातावरणाचा फटका : या वर्षी त्यांनी अडीच टनाचे उत्पादन अपेक्षित होते. मात्र, फळ पक्वतेच्या काळात सतत ८ दिवस ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे फळांची गळ झाली. सुमारे एक टन फळांचे नुकसान झाले. या वर्षी दीड टन उत्पादन मिळाले असून, त्यासाठी उत्पादन खर्च १८ हजार रुपये झाला. कमी पाण्यामध्ये ३० गुंठ्यांतील सीताफळाने चांगले उत्पन्न मिळाल्याने या वर्षी २० जूनला ३.१० एकर क्षेत्रावर नवीन सीताफळ लागवड केली आहे. गोल्डन सीताफळाविषयी...

  • नवनाथ कसपटे या शेतकऱ्यांनी एनएमके-१ (गोल्डन) हा वाण निवड पद्धतीने मिळवला आहे.
  • बाळानगर व स्थानिक सीताफळांचा हंगाम संपल्यानंतर गोल्डन सीताफळे पक्व होतात. हा वाण तयार होण्यासाठी थोडा जास्त कालावधी लागतो. त्यामुळे अन्य बागेतील फळे कमी झाल्यानंतर ही फळे बाजारात येतात. परिणामी चांगला दर मिळतो.
  • फळांचा आकारही मोठा आहे. या जातीचे फळ दिसायला देखणे, मोठे डोळे, रंग सोनेरी पिवळा आहे.
  • या वाणात बियांची संख्या कमी असून, गराचे प्रमाण जास्त आहे.
  • फळांची टिकवणक्षमता अधिक आहे. दूरवरच्या बाजारपेठेत माल पाठविणे शक्य होते.
  • संपर्क : हनमंत राजेगोरे, ९७६५५५८२२२ (लेखक नांदेड येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com