क्षारपड जमिनीच्या समस्येवर हायड्रोपोनिक्स तंत्रातून शोधला मार्ग

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात ऊस पिकासह क्षारपड जमिनीची समस्याही मोठी आहे. यावर मात करण्यासाठी उरुण इस्लामपूर (ता. वाळवा) येथील विकास साळुंखे यांनी क्षारपड जमिनी उत्पादक करण्यासाठी हायड्रोपोनिक्स तंत्राचा वापर करत फूलशेती केली आहे. फूलशेतीच्या काटेकोर व्यवस्थापनातून दर्जेदार फूल उत्पादन मिळवले आहे.
क्षारपड जमिनीच्या समस्येवर हायड्रोपोनिक्स तंत्रातून शोधला मार्ग
क्षारपड जमिनीच्या समस्येवर हायड्रोपोनिक्स तंत्रातून शोधला मार्ग

सांगली जिल्ह्यातील उरुण इस्लामपूर (ता. वाळवा) हा भाग ऊस उत्पादक म्हणून ओळखला जातो. शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक ऊस उत्पादन घेण्याची निकोप स्पर्धा कायम सुरू असते. या गावातील शिक्षक म्हणून निवृत्त झालेल्या यशवंत साळुंखे यांच्याकडे १४ एकर शेती आहे. स्वतः शिक्षक असल्यामुळे त्यांची विकास, मनीष, संदिप ही तीनही मुले उच्चशिक्षित आहेत. मनीष व संदीप हे दोघ प्राध्यापक आहेत. मात्र, शेतीची आवड असल्याने मेकॅनिकल इंजिनिअर असूनही विकास हे पूर्णवेळ शेती करतात. विविध प्रयोग शेतीमध्ये करत असतात. एकत्र कुटूंब असल्याने त्यांना आई कमल, वडील यशवंत, विकास यांच्या पत्नी रुपाली, संदिप यांच्या पत्नी सुप्रिया, मनीष यांच्या पत्नी पद्‌मा यांची मोलाची साथ मिळते. आधुनिक फूलशेतीकडे वळले... वाळवा भागात ऊस हे हुकमी पीक असले तरी जमिनी क्षारपड होण्याचे प्रमाणही मोठे आहे. आमची साडेतीन एकर शेती क्षारपड आहे. अन्य क्षेत्रामध्ये उसाचे नव्या लागवडीचे एकरी ७५ ते ८० टन, तर खोडव्याचे ५५ ते ६० टन उत्पादन मिळते. मात्र, क्षारपड जमिनीतून उत्पादन कमी येत असे. त्यामुळे या जमिनीत लागवडीसाठी विकास यांनी नव्या पिकांचा शोध सुरू केला. त्या वेळी परिसरातील शेतकऱ्यांकडून फूलशेतीची माहिती मिळाली. २०१४ मध्ये पॉलिहाऊस उभारणीचा निर्णय घेतला.

सुरवातीला दहा गुंठे क्षेत्रामध्ये मातीत गादीवाफे करून सहा हजार जरबेरा रोपांची लागवड केली. मात्र, मुळातच जमीन क्षारपड असल्याने मुळ कूज रोगाचा मोठा प्रादुर्भाव होऊ लागला. प्रति रोप प्रति महिना फुलांची संख्याही कमी (२ ते ३ फुले) मिळत असे. यामुळे उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ घालण्यात अडचणी येऊ लागल्या. यावर मात करण्यासाठी विकास यांचा विचार सुरू झाला. इंटरनेटवरून हायड्रोपोनिक्स तंत्राविषयी कळले. आपल्या परिसरात अशी फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा शोध घेतला. परिसरातील अभिजित पाटील यांची कोकोपीटमधील फूलशेती पाहिली. त्यांच्याकडून माहिती घेतली. हे आपल्याला जमू शकेल, याचा अंदाज आला. यातून क्षारपड जमिनीच्या समस्येवर उत्तम मार्ग मिळू शकतो, याचा विश्वास आला. अशी आहे हायड्रोपोनिक्स पद्धती ः

  • डिसेंबर २०१६ मध्ये पॉलिहाउसमधील गादीवाफे काढून टाकले. तिथे स्टिलचे स्टॅंड उभारून, त्यावर कुंड्या बसविण्यात आल्या. यासाठी ८ हजार कुंड्याला दीड लाख रु., कोको पीट एक लाख रु., स्टील आणि मजुरी २ लाख रु. असे एकूण सुमारे ४ लाख ५० हजार रुपये इतका खर्च आला.
  • एका कुंडीमध्ये सुमारे २ ते अडीच किलो कोकोपीट माणसांच्या भरून त्यात जरबेरा रोपाची लागवड केली. दहा गुंठ्यांमध्ये ७ हजार २०० कुंड्या लागल्या.
  • दोन ओळीतील अंतर अडीच फूट ठेवले असून, सिंचनासाठी प्रत्येक कुंडीत एक ड्रिपर सोडला आहे.
  • कोकोपीटमध्ये लागवड असल्याने सिंचन व खत व्यवस्थापन अत्यंत काटेकोरपणे करावे लागते.
  • जरबेराचे व्यवस्थापन

  • दर आठवड्याचे नियोजन करून, पोषक घटक व कीडनाशकांची फवारण्या केल्या जातात.
  • हंगामानुसार कमी अधिक असे प्रति रोप सुमारे ३०० मिली पाणी दिले जाते. यामध्ये दोन ते अडीच तासाचे चार टप्पे केले आहेत. यामुळे खतांची सुमारे ३५ टक्के बचत होते.
  • सेंद्रिय घटकांच्या (देशी गाईचे गोमूत्र, दूध) यांची आठवड्यातून एक फवारणी घेतात.
  • फूलशेतीतील फुले काढणी, पॅकिंग यामध्ये घरातील सर्व महिला वर्गाची चांगली मदत होते. त्यामुळे मजुरीच्या खर्चात बचत होते.
  • हे झाले फायदे

  • नव्या पद्धतीमुळे मुळकूज रोगांचे प्रमाण शुन्यावर आणण्यात यश आल्याचे विकास सांगतात.
  • त्याच प्रमाणे प्रति रोप प्रति महिना सरासरी ५ दर्जेदार फुले मिळतात. त्यामुळे बाजारात अन्य शेतकऱ्यांच्या तुलनेमध्ये चांगला दर मिळतो.
  • फुलांची बाजारपेठ

  • सुरवातीला इस्लामपूर येथील स्थानिक बाजारपेठेमध्ये फुल विक्री आणि दराच्या माहिती घेतली. काही व्यापाऱ्यांनी फुले तर घेतली मात्र पैसे देताना खळखळ केली. त्यामुळे मुंबई येथील बाजारपेठेत फुले पाठवत आहेत. दोन दिवसांतून एकदा फुलाची काढणी केली जाते. एका बॉक्‍समध्ये ५०० फुले या प्रमाणे सरासरी ४ बॉक्‍स जातात. येथे कायमस्वरुपी मागणी असल्याने फारशी अडचण येत नाही.
  • बाजारपेठेमध्ये मागणीनुसार दरामध्ये प्रचंड चढउतार होते.
  • या वर्षीचा प्रति फूल किंमतीतील सरासरी बदल - गणपती उत्सवात ८ रुपये, दिवाळीमध्ये ४ रुपये, नाताळात ९ रुपये, लग्नसराईत ६ रुपये, अन्य दिवशी एक ते दोन रुपये. असे दर असतात. मात्र, संपूर्ण वर्षाचा विचार केल्यास सरासरी २.५ ते ३ रुपये प्रति फूल इतका दर मिळतो.
  • जरबेरा फुलाची काढणीपासून ते मार्केटमध्ये जाईपर्यंत प्रति फुलास ८० पैसे खर्च येतो.
  • साळुंखे यांची शेती दृष्टिक्षेपात १) एकूण शेती १४ एकर त्यापैकी चांगल्या जमिनीत ४ एकर ऊस लागवड - को ८६०३२ चार एकर खोडवा ऊस - को ८६०३२ चार एकर क्षारपड - गोठा व हंगामी पिके आणि वैरण १० गुंठ्यांत पॉलिहासमधील जरबेरा, अन्य दहा गुंठ्यांत पॉलिहाऊस उभारणीचे काम सुरू.

    २) शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड साळुंखे यांच्या दावणीला १३ म्हशी, तर दोन देशी गायी आहेत. सध्या दूधाळ जनावरांची संख्या ८ आहे. दोन्ही वेळेचं ३५ लिटर दूध मिळते. दूध डेअरीत न घालता रतीब सुरू आहे. दूधाला प्रति लिटर ४७ रुपये असा दर मिळतो आहे. जनावरांचे शेणखत संपूर्ण शेतीला वापर करतात. संपर्क ः विकास यशवंत साळुंखे, ९९२३०७९८९९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com