agricultural stories in marathi, agro special, organic farming success story | Agrowon

सातत्यपूर्ण प्रयोगातून शेती जाईल सेंद्रिय शाश्‍वततेकडे
सतीश कुलकर्णी
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

शेतीमध्ये समस्या खूप आहेत. त्यावर मात करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने प्रयोग करण्याची आवश्यकता आहे. शेतीमध्ये शाश्वतता आणण्यासाठी विविध सेंद्रिय पद्धतींचे प्रयोग आनंद चोरडिया यांनी आपल्या शेतीमध्ये केले आहेत. शेतीमध्ये काटेकोर सेंद्रिय पद्धतीचा अवलंब, पिकाचा आर्थिक ताळेबंद, सातत्याने घेतला जाणारा आढावा आणि प्रयोग यातून आपली सेंद्रिय शेती फुलवली आहे.

शेतीमध्ये समस्या खूप आहेत. त्यावर मात करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने प्रयोग करण्याची आवश्यकता आहे. शेतीमध्ये शाश्वतता आणण्यासाठी विविध सेंद्रिय पद्धतींचे प्रयोग आनंद चोरडिया यांनी आपल्या शेतीमध्ये केले आहेत. शेतीमध्ये काटेकोर सेंद्रिय पद्धतीचा अवलंब, पिकाचा आर्थिक ताळेबंद, सातत्याने घेतला जाणारा आढावा आणि प्रयोग यातून आपली सेंद्रिय शेती फुलवली आहे.

गेल्या पन्नास वर्षांपासून चोरडिया कुटूंबीय हे मसाले, अन्नप्रक्रिया पदार्थांच्या निर्मिती उद्योगामध्ये कार्यरत आहेत. त्यांचे सुहाना आणि प्रवीण मसाले हे दोन ब्रॅंड प्रसिद्ध आहेत. त्यांच्या पुणे जिल्ह्यातील भांडगाव (ता. दौंड) येथील या दोन कंपनीमध्ये मसाले प्रक्रिया उद्योगात मसाले, लोणची, केचअप, इन्स्टंट मिक्‍सेस अशी उत्पादने घेतली जातात. या उत्पादनांची विक्री संपूर्ण भारतात होते. तसेच जगभरातील २१ देशांमध्ये निर्यात केली जातात. अशा आंतरराष्ट्रीय दर्जांच्या उत्पादनाच्या निर्मितीवेळी निर्माण होणारा सेंद्रिय कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची समस्या सर्वात मोठी असते. वास्तविक हा कचरा म्हणजे लसूण, कांदा, मसाले पदार्थ यांची साले व अन्य घटक असून, त्यात ऊर्जा असते. तिचा वापर शेतीच्या उत्पादकता वाढीसाठी होऊ शकतो, हे लक्षात घेऊन आनंद चोरडिया यांनी स्वतःच शेतीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला.

चोरडिया कुटुंबीयांनी भांडगाव (जि. पुणे) येथील कंपनीच्या परिसरामध्ये प्रथम सहा एकर शेती कराराने घेतली. सेंद्रिय उत्पादनाचे उत्तम मॉडेल फार्म बनविण्याच्या ध्यासाने काम सुरू केले. मात्र, राज्यामध्ये सेंद्रिय व नैसर्गिक शेतीच्या विविध पद्धतीमध्ये कार्यरत अनेक ऋषीतूल्य व्यक्तिमत्वे आहेत. उदा. बायोडायनॅमिक्‍स, मोहन देशपांडे यांचे प्राचीन ज्ञानावर आधारित ऋषीकृषी तंत्र, अगदी ज्यांची सेंद्रिय शेती जागतिक पातळीवर नावाजली जाते असे भास्करराव सावे गुरुजी, सध्या सर्वत्र बोलबाला असलेले सुभाष पाळेकर यांची शून्य खर्चावर आधारित आध्यात्मिक शेती, त्याच प्रमाणे पर्माकल्चर ही पद्धती यांचा अभ्यास सुरू केला.  पर्माकल्चर तंत्राविषयी जाणून घेण्यासाठी एक महिन्यासाठी न्युझीलँडमध्ये प्रत्यक्ष पर्माकल्चर राबवणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात राहून जाणून घेतले. यातील फरक पुस्तकी स्वरुपात माहीत असले तरी प्रत्यक्ष अनुभव घेण्याची गरज होती. त्यामुळे या सर्व प्रकारांनी प्रत्येक एक एकर क्षेत्रावर प्रयोग करण्यास सुरवात केली. या साऱ्या पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी त्यामध्ये अनेक बाबतीत मूलभूत पातळीवर साम्य आहे. उदा. सौर ऊर्जा संवर्धन, कमीत कमी पाण्यावर निर्भरता, जमिनीची पोत सांभाळणे, मातीमधील शेती उपयोगी जीवजंतूंचे संवर्धन आणि जमिनीवरील जैविक आच्छादन आणि सर्वांत महत्त्वाचे निसर्गचक्राचा समतोल राखणे. अशा साम्य असलेल्या घटकांवर प्रथम लक्ष केंद्रित केले. त्या पर्माकल्चर आणि सेंद्रिय शेतीचे विविध प्रयोग राबवण्यास सुरुवात केली. पहिल्या दोन वर्षातच शेतीतून चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळू लागला. त्यांचा हुरूप वाढला. पुढील टप्प्यामध्ये त्यांनी आणखी वीस एकर शेती कराराने घेतली आहे. आता एकूण २६ एकर क्षेत्रामध्ये सेंद्रिय शेतीच्या प्रयोगाची व्याप्ती वाढली आहे.

कचऱ्याचे विश्लेषण व शेतीत वापर

 • सर्व प्रथम व्यवसायातील कच्च्या मालापासून ते प्रक्रिया केलेल्या मालापर्यंतच्या प्रक्रियेचे परीक्षण करण्यात आले. त्यातून उत्पादित होणाऱ्या कचऱ्याचे विश्लेषण करण्यात आले. उदा. घन आणि द्रव कचरा, उच्च आणि कमी ओलावा असलेला कचरा, विघटनशील आणि अविघटनशील कचरा अशी विभागणी करण्यात आली. त्याचे नेमके प्रमाण मिळविण्यात आले. त्यातील केवळ विघटनशील कचऱ्याचा वापर शेतीमध्ये करण्यास सुरवात केली. पहिल्या टप्प्यामध्ये शेतीतील झाडे व पिकांजवळील जमिनीवर आच्छादन करण्यात आले. परिणामी जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत मिळाली. पदार्थ कुजून पिकांना पोषक घटक मिळू लागले. शेतीमध्ये आवश्यक अशा उपयुक्त सूक्ष्मजीवांची वाढ होण्यास मदत झाली.
 • गेल्या वर्षभरात कारखान्यातील सुमारे २५०० टन जैविक कचरा शेतीसाठी वापरण्यात आला.
 • कचऱ्यावर अधिक चांगली प्रक्रिया करण्यासाठी  बायोगॅस संयंत्र उभारले आहे. त्यातून मिळालेल्या बायोगॅसमुळे कंपनीच्या उपहारगृहातील ऊर्जेवरील खर्चात बचत झाली. तसेच त्यातून संपूर्ण कुजलेल्या स्लरीमुळे शेतीमध्ये उत्तम प्रतीचे खत मिळू लागले.
 • कोणत्याही रासायनिक खतांच्या वापराशिवाय सर्व पिके घेतली जातात.
 • अत्यंत खडकाळ किंवा मुरमाड अशी हलकी जमीन असूनही कमी पाण्यामध्ये पिकांचे उत्पादन घेतले जाते. गेल्या तीन वर्षांमध्ये जमिनीवर सेंद्रिय पदार्थांचा एक मोठा थर निर्माण झाला आहे. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढत आहे. कमीत कमी पाण्यामध्ये सर्व पिकांची उत्पादने घेतली जातात.

सध्या घेतली जातात ही पिके

 • पपई, मका, भेंडी, हिरवी मिरची, टोमॅटो, फळझाडे, फळभाज्या इत्यादी विविध ४० हून अधिक पिके. कढीपत्ता, केळी आणि शेवगा यांची एकत्रित शेती. प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक म्हणून कढीपत्त्याची निवड केली आहे. त्याच प्रमाणे कोरडवाहू भागातील योग्य व शेंगावर्गीय पीक म्हणून शेवगा घेतला आहे.
 • ड्रॅगन फ्रूट, भोपळा, मिरची, मका, शेवगा ही पिके केवळ २० गुंठे क्षेत्रामध्ये लावण्यात आली आहेत. एका पोलला ५५ के ६० फळे आहेत. प्रति किलो शंभर ते दीडशे रुपये दर मिळतो. या पिकामध्ये कमीत कमी देखभालीमध्ये हे पीक बऱ्यापैकी उत्पन्न मिळाले. त्याच प्रमाणे बांधावर हादगा, जनावरांच्या चाऱ्यासाठी विविध चारापिके लावली आहेत.

 ही आहेत वैशिष्ट्ये

 • निसर्गाचे सातत्यपूर्ण निरीक्षण.
 • खडकाळ जमिनीमध्ये पिकांचे योग्य नियोजन. प्रयोगातून पिकांची निवड केली जाते.
 • ताळेबंद ः प्रत्येक पिकाचा व पद्धतीचा काटेकोर हिशोब ठेवला जातो. त्याचा हंगामाअखेर ताळेबंद मांडला जातो. त्यासाठी खास रकाने असलेल्या नोंदवह्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक शेतात कार्यरत मजुरांसह, प्रत्येक घटकांची नोंद ठेवली जाते. त्यातून मिळालेले प्रत्येक उत्पादन नोंदवले जाते. या उत्पादनाला बाजारात मिळालेला दरही नोंदवला जातो. त्यामुळे कोणत्या गोष्टी बरोबर आणि कोणत्या चुकल्या यावर सर्व काम करणाऱ्या लोकांशी चर्चा केली जाते.
 • आढावा : प्रत्येक प्रारुपामध्ये त्या त्या पद्धतीतील घटकांचाच काटेकोरपणे वापर केला जातो. त्यामुळे प्रत्येक पद्धतीचा वर्षअखेर आढावा घेतला जातो. उदा. अन्य पद्धतीमध्ये पांढरी माशीचा प्रादुर्भाव असला तरी या पद्धतीमध्ये पांढरी माशीचा प्रादुर्भाव झाला नाही. किंवा या पद्धतीत पिकांची वाढ चांगली झाली. उत्पादन चांगले मिळाले.  
 • शेतीचा खर्च कमीत कमी ठेवत उत्पन्न मिळविण्यावर भर असतो.

 प्रत्येक निविष्ठा बनवली जाते शेतातच...

 • आमच्या शेतीमध्ये मजुरी हा एवढाच एक मोठा खर्च असल्याचे आनंद चोरडिया सांगतात.  
 • या सर्व शेतीमध्ये सुरवातीच्या टप्प्यामध्ये बियाणे विकत घ्यावे लागत असले तरी देशी बियाणांची बॅंक तयार करण्यात येत आहे.
 • पिकांच्या उत्तम वाढीसाठी विविध नैसर्गिक घटकांचा वापर केला जातो. त्याच प्रमाणे पीक संरक्षणासाठी विविध अर्कांचा वापर केला जातो. हे सर्व घटक शेतातच तयार करण्यावर त्यांचा भर असतो. कोणतीही गोष्ट बाहेरून विकत आणली जात नाही. शेतीचे बाह्य घटकांवरील अवलंबित्व कमी केले जात आहे.    
 • प्रामुख्याने जमिनीच्या आच्छादनासाठी कोरड्या पीक व प्रक्रिया अवशेषांचा वापर केला जातो. त्यामुळे जमिनीतील आर्द्रता वाढून नैसर्गिकरीत्या गांडुळाची निर्मिती झालेली दिसून येते.

शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षणाची योजना

 • पाऊस व निसर्गातील बदलांमुळे, रासायनिक खते, कीटकनाशके यांचा अतिरेकी वापरामुळे, जमिनीची पोत कमी झाल्यामुळे शेती करणे शेतकऱ्यांना परवडत नसल्याचे दिसते. त्यातच शेतीमालाच्या विक्री दरातील चढउतार यामुळे अशाश्वता निर्माण होते. शेती सोडून रोजगाराच्या अपेक्षेने शहराकडे स्थलांतर वाढत जाते. परिणामी ग्रामीण भागामध्येही शेती पडीक राहण्याचे प्रमाण वाढत आहे.
 • एकीकडे आपण अन्नसुरक्षिततेसाठी धडपडत असताना, धोरणे राबवत असताना तरुण शेतीतून बाहेर पडत चालला आहे. एका टप्प्यानंतर नवीन ताज्या दमाचे मनुष्यबळ शेतीसाठी उपलब्ध होणे थांबेल. त्याचा मोठा फटका प्रचंड लोकसंख्या असलेल्या आपल्या भारतासारख्या देशाला बसल्याशिवाय राहणार नाही. यावर मात करण्यासाठी आनंद चोरडिया हे शेतीतील मनुष्यबळ विकासाचे नियोजन करत आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती पद्धतीचे प्रशिक्षण देण्याची योजना आखली आहे.

नावीन्यपूर्ण पर्माकल्चर...

 • पर्माकल्चर (पर्मनंट अॅग्रीकल्चर) म्हणजे कायम शेती पद्धती. यामध्ये मोठी झाडे, लहान झाडे आणि त्यानंतर झुडपे, जमिनीवर पसरणाऱ्या किंवा झाडावर वाढणाऱ्या वेली यांचा समावेश असतो.
 • मातीमध्ये पोषक घटकांची कमतरता नाही. अनेक वेळा तर हे घटक अधिक प्रमाणात आहेत. मात्र, झाडांचा प्रमुख झगडा हा सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी होत असल्याचे कोणत्याही जंगलामध्ये पाहिल्यास दिसून येते. येथे अन्नद्रव्यांची पूर्तता ही प्रामुख्याने मातीत असलेली खनिजे आणि वनस्पती किंवा पिकांचे जमिनीवर पडणारे अवशेष कुजल्यानंतर उपलब्ध होत असतात. शेतीमध्येही ही कल्पना आपल्याला वापरता येते. झाडे एकमेकांच्या साथीने चांगल्या प्रकारे वाढू शकतात. पर्माकल्चरमध्ये याच तत्त्वावर भर दिला जातो.  
 • यामध्ये पाच ते सहा थर असतात. सध्या चोरडिया यांच्या शेतीमध्ये तीन थर निर्माण झाले आहे. पुढील टप्प्यामध्ये जसजशी मोठी झाडे होत जातील, तसतसे त्यातील थरांची संख्या वाढत जाईल.  शेताचे कुंपण हा एक वेगळा घटक मानला आहे. प्रत्येक शेताला तारेचे कुंपण करण्याऐवजी जिवंत कुंपण विशेषतः चारा पिकाचे तयार केले आहे.

खरेतर आपण हे विसरतो?

 • शेतीच्या नैसर्गिक चक्रात निसर्गातील प्रत्येक घटकाचा उदा. सूर्य, हवा, पाणी, वनस्पती, पशुपक्षी, किटक, जिवाणू आणि मधमाशांचा महत्त्वाचा वाटा आहे.
 • संशोधनातून असे दिसून आले आहे, की जगातील ३० टक्के अन्न उत्पादन हे किटकांनी केलेल्या परागसिंचनामुळे होते. परंतु, रासायनिक शेती, एकपीक शेती, बेसुमार जंगलतोडीमुळे परागसिंचन करणाऱ्या मधमाशा व फुलपाखरांची संख्या कमी झालेली दिसून येते. त्याचा पिकाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येते.
 • केवळ शेती पद्धतीच नव्हे, तर माणूस हाही निसर्गाचा एक भाग असल्याचे जाणून आपली जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे. ही बाब प्रामुख्याने विसरली जाते.

 शेतीच्या आरेखनासाठी सृजनशीलती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यासाठी निसर्गासह आपल्या शेतीचे निरीक्षण करणे व अवलोकन करणे आवश्‍यक आहे. त्यातून आम्ही बोध घेत राहतो. शेती खऱ्या अर्थाने शाश्‍वत करण्यासाठी प्रयोगशील राहण्याची आवश्‍यकता असते. निसर्ग रचनाशास्त्राचा पायाच आपल्या शेतीला शाश्‍वततेकडे नेऊ शकतो, असा विश्‍वास आम्हाला आहे.
- आनंद चोरडिया

संपर्क : चंद्रकांत काळे (फार्म व्यवस्थापक), ९९२२५०८७४७

फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
पाणी बचत, दर्जेदार उत्पादनासाठी मल्चिंग...पॉलिथिन कागद आच्छादनासाठी वापरल्याने पिकासोबत...
शाश्वत सिंचनासाठी जलपुनर्भरणाच्या...पुनर्भरण न करता भूजलाचा उपसा करत राहिल्यास फार...
पीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...
बटाटा स्टार्चपासून विघटनशील प्लॅस्टिकची...प्लॅस्टिकचा वापर सातत्याने वाढत असून, त्यातून...
केळी खोडापासून धागानिर्मिती तंत्रकेळी झाडाचे खोड, पानांचा उपयोग धागा...
शेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध...सध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके...
हरितगृहातील प्रकाशाचे नियंत्रण...हरितगृहातील प्रकाशाच्या कार्यक्षम व्यवस्थापनासाठी...
गूळ प्रक्रियेच्या आधुनिक पद्धतीआरोग्यासाठी गूळ उत्तम असून, त्याची लोकप्रियता...
जलनियंत्रण बॉक्सद्वारे कमी करता येईल...अधिक काळ पाण्याखाली राहत असलेल्या जमिनीतून...
योग्य पद्धतीनेच वापरा पॉवर टिलर पॉवर टिलर चालू करीत असताना डेप्थ रेग्युलेटर चालू...
शेतात केले पेरणी ते मळणी यांत्रिकीकरणनंदुरबार जिल्ह्यातील आडगाव (ता. शहादा) येथील...
बॅटरीरहित उपकरणांचे स्वप्न येईल...सध्या विविध स्मार्ट उपकरणे बाजारात येत आहेत....
छोट्या यंत्रांनी होतील कामे सुलभया वर्षी दापोली येथे पार पडलेल्या संयुक्त कृषी...
पेरणी यंत्राचा वापर फायदेशीर ठरतो...बियाण्यांच्या लहान मोठ्या अाकरावरून पेरणीचा...
कमी वेळेत चांगल्या मशागतीसाठी रोटाव्हेटर१९३०च्या दशकात रोटरी कल्टिव्हेटर (रोटा + व्हेटर)...
पाच मिनिटांत एका एकरवर फवारणी !...शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आले पाहिजे, असे जो तो...
रोपांच्या मुळांची गुंडाळी टाळण्यासाठी...ट्रे किंवा प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये रोपांची...
आरोग्यदायी कडधान्य चिप्सतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने...
सुधारित अवजारे करतात कष्ट कमीवैभव विळा : १) गहू, ज्वारी, गवत कापणी जमिनीलगत...
सुधारित ट्रेलरमुळे कमी होईल अपघाताचे...ट्रॅक्टर व उसाने भरलेला ट्रेलर हे ग्रामीण...