दुष्काळी पिराचीवाडी झाले हिरवेगार

दुष्काळी पिराचीवाडी झाले हिरवेगार
दुष्काळी पिराचीवाडी झाले हिरवेगार

कोल्हापूर जिल्ह्यातील पिराचीवाडी (ता. कागल) येथील सुभाष भोसले यांनी केवळ स्वतःपुरते न पाहता स्वमालमत्ता व दागिने तारण ठेवत सुमारे चार कोटी रुपयांची सहकारी पाणीपुरवठा योजना उभारली आहे. त्यामुळे गावातील तीनशे एकर क्षेत्रापैकी तब्बल दोनशे एक क्षेत्र पाण्याखाली आले. पहिल्यांदाच बारमाही हिरवाई बघितलेल्या गावकऱ्यांनीही त्यांना थेट जनतेतून सरपंच म्हणून कौल दिला आहे. बागायती मानल्या जाणाऱ्या जिल्ह्यातही प्यायला पाणी नसणारीही अनेक गावे असतात. त्यांचे हाल कुणीही पुसत नाही. कागल तालुक्‍यातील पिराचीवाडी (जि. कोल्हापूर) हे असेच एक तीन हजार लोकसंख्येचे छोटे गाव. हे गाव तालुक्‍यात सर्वांत उंच असले तरी पाऊस मात्र जेमतेमच. पावसावर आधारीत भात, नाचणी, मुग ही प्रमुख पिके. परिणामी केवळ शेतीवर कुटूंबाचा खर्च भात नाही. मजूरी हाच मुख्य व्यवसाय. त्यातही साखर कारखाने सुरू झाल्यानंतर साखरेची जड पोती उचलण्यासाठी आवश्यक कामगार येथून मिळणार, अशी त्याची ख्याती राज्यभर आहे. असा झाला कायापालट ः कोणत्याही जिरायती गावामध्ये सहकारी तत्त्वावर पाणीपुरवठा योजना सुरू करायची म्हटले की आर्थिक अडचण प्रमुख असते. आपला हिस्सा भरता येत नाही, म्हणून वंचित राहणाऱ्यांचे प्रमाण अधिक भरते. गावातील एखादा तालेवार स्वतःपुरती योजना राबवतो आणि एकटाच मलई खात राहतो, हे सर्वत्र दिसणारे चित्र. मात्र, याला चांगल्या अर्थाने छेद दिला तो सुभाष भोसले या तरुणाने. सुभाष भोसले (वय ३६) यांची पंचवीस एकर शेती. विहीर बागायत. पावसाळा संपल्यानंतर त्यात फारसे पाणी राहत नसे. इतरांपेक्षा थोडी बरी अशीच परिस्थिती. २०१३ मध्ये पाणी आणण्यासाठी स्वतःपुरती योजना राबविण्याचा विचार मनात आला. कोटेशन आणली, खर्चाचा अंदाज घेतला. त्यावरून थोडी मोठी योजना राबवल्यास स्वस्त पडते आणि त्याचा फायदा संपूर्ण गावाला होऊ शकतो, हे त्यांच्या लक्षात आले. मात्र, गावकऱ्यांची आर्थिक स्थिती माहीत असल्याने त्यांच्याकडून कोणतीही आर्थिक मदत होणार नव्हती. थोडा धोका पत्करला तर सर्वाचा फायदा होऊ शकेल, असा विचार त्यांनी केला. प्रथम योजना पूर्ण करायची आणि त्यानंतर शेतीमधून निघालेल्या पुढील पिकातून ठराविक रक्कम आकारायाची, असे नियोजन शेतकऱ्यांशी सल्लामसलतीनंतर केले. श्री. गहिनीनाथ सहकारी पाणीपुरवठा योजनेला सुरवात केली. दागिन्यांबरोबर मालमत्ताही ठेवली गहाण ः हेतू कितीही विधायक असला तरी या याेजनेस काही कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. पैसे उभारणे आणि त्यानंतर योजनेच्या पूर्ततेनंतर पुन्हा गोळा करायचे, या दोन्ही समस्या दिसत होत्या. घरातील लोकांशी चर्चा केली. त्यांच्या पाठिंब्यानंतर शेत, वडिलोपार्जित घर, स्वत:चा बंगला, घरातील दागिने गहाण ठेवत कशीबशी तीन कोटी रुपयांची जुळणी त्यांनी केली.

  • यापूर्वी राबवल्या गेलेल्या सरकारी योजनांचा अनुभव वाईट होता. गाव अधिक उंचीवर असल्याने कोणतीच पेयजल योजनाही गावात चालत नव्हती.
  • गावापासून सात किलोमीटर दूर असणाऱ्या कसबा वाळवे या गावातील दुधगंगा नदीतून ही योजना आणायचे ठरविले. तीन टप्प्यात योजना राबविण्यात आली. त्यातील पहिल्या टप्प्यात ५०, दुसऱ्या टप्प्यात ५० आणि तिसऱ्या टप्प्यात १०० अश्‍वशक्तीचा पंप बसवला. योजनेसाठी आवश्यक विजेसाठी एक्‍सप्रेस फिडर उभारणीसाठी सुमारे ४० लाख रुपये खर्च झाला. त्यामुळे सलग अठरा तास विनाकपात लाईट मिळणे सहज शक्‍य झाले आहे.
  • मागेल त्याला पाणी ः

  • योजना केल्यानंतर जो शेतकरी मागेल त्याला पाणी देण्याचे नियोजन होते. हे करताना कोणताही भेदाभेद करण्यात आला नाही. प्रत्येकाच्या शेतात एक चेंबर या प्रमाणे दोनशे एकर क्षेत्रासाठी चारशेपर्यंत चेंबर तयार केले.
  • आजवर पडिक असलेल्या शेतीमध्येही उसाचे मळे फुलले आहेत. पहिल्या वर्षी चाचणीस्वरुप साठ एकर लागवडीखाली आणले. गेल्या वर्षी तब्बल दोनशे एकर क्षेत्रावर उसाची लागवड झाली. या उसाची तोड सुरू आहे. यंदा गावातील सुमारे दहा हजारांहून अधिक टन ऊस विविध कारखान्यांना जाणार आहे. - शेतात पाणी आल्याने अनेक कामगारांनीही ऊस शेती करून शेती कसण्याचा फायदेशीर मार्ग निवडला.
  • उसातून मिळणाऱ्या उत्पन्नातील एकरी नऊ टनाची रक्कम योजनेच्या देखभालीसाठी द्यायची, असा नियम आहे. या पैशातूनच लाईटबिल व अन्य कामे करण्यात येत आहेत.
  • चांगल्या कामातूनच झाला विजय ः या योजनेच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या प्रयत्नामुळे या वर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गावाने भोसले यांना सरपंचपदी निवडून दिले आहे. निवडणुकीमध्ये आश्वासने देत विजयी झाल्यानंतर विसरून जाण्याच्या जमान्यामध्ये उलटा प्रकारही घडू शकतो. चांगल्या कामामुळे विजयी झाल्याचे अपवाद हातावर मोजण्याइतकेच असतील. त्यात पिराची वाडी येथील नवनिर्वाचित सरपंच सुभाष भोसले यांचे नाव नक्कीच सर्वात वर असेल. आता पुढील ध्येय... संपूर्ण गाव ठिबक करायचे सरपंचपदाची जबाबदारी आल्यानंतर आता या योजनेचा लाभ अधिक शेतकऱ्यांना मिळण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी सर्व क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न सुुरू केले आहेत. येत्या काही वर्षातच आमचे गाव संपूर्ण ठिबक सिंचन करणारे गाव होईल, असा विश्वास भोसले यांनी व्यक्त केला. गत पाच वर्षात ग्रामपंचायतीने केलेली कामे ः १) रस्त्यांच्या सुधारणेला प्राधान्य ः यामध्ये सोनाळी पिराचीवाडी हा रस्ता तयार करण्यात आला. (खर्च ४० लाख रुपये) पिराचीवाडी गावांतर्गत सर्व रस्त्याची सुधारणा करण्यात आली. (खर्च ३० लाख रुपये.) २) महिलांसाठी प्रशिक्षण शिबिरे ः महिला सबलीकरण योजनेअंतर्गत महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, या हेतूने ग्रामपंचायतीच्या वतीने विविध प्रकारची प्रशिक्षणे घेण्यात येतात. त्यात शिवणकला या प्रशिक्षणांचाही समावेश आहे. एका बॅचमध्ये ६० महिलांना लाभ घेता येतो. या प्रशिक्षणाचे सर्व व्यवस्थापन ग्रामपंचायतीने केले आहे. ३) प्राचीन पाणीसाठ्याची सुधारणा ः गावात स्वातंत्र्यपूर्व काळातील दोन प्राचीन आड होते. वापरात नसल्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष होत होते. डागडुजी करून या आडांना चांगले रुपडे देण्यात आले. यामुळे गावातील हा प्राचीन ठेवा जपण्यास मदत झाली. ४) प्राथमिक शाळेत ‘इ लर्निंग’ सेवा ः गावातील प्राथमिक शाळेत इ लर्निंगची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यासाठी लोकवर्गणीतून शाळेत सात संगणक बसवले आहेत. त्यासाठी खास प्रयोगशाळा केली असून, त्याद्वारे विद्यार्थ्यांना विविध धडे सोपे करून शिकवले जातात. भविष्यात या ठिकाणी एल.इ.डी. बसवून यात आधुनिकता आणण्याचाही ग्रामपंचायतीचा प्रयत्न आहे. संपर्क ः सुभाष भोसले, ९७६७३४८७८७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com