agricultural stories in marathi, agro special, rose farming yashkatha | Agrowon

गुलाब फुलांसह फुलले जीवन
राजकुमार चौगुले
शनिवार, 30 डिसेंबर 2017

उच्चशिक्षित असतानाही शेतीच करण्याचा आग्रह आणि त्याला मिळालेली जोडीदाराची साथ यातून केवळ संसारच नाही, तर शेतीही फुलत गेली. प्रचंड कष्ट असले तरी उसासह गुलाब शेतीतून फुलांसोबतच जीवनही फुलले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कांडगाव (ता. करवीर) येथील सचिन व राणी पाटील या अल्पभूधारक दांपत्याने फुलवलेल्या शेतीची सुगंधी कहाणी...

उच्चशिक्षित असतानाही शेतीच करण्याचा आग्रह आणि त्याला मिळालेली जोडीदाराची साथ यातून केवळ संसारच नाही, तर शेतीही फुलत गेली. प्रचंड कष्ट असले तरी उसासह गुलाब शेतीतून फुलांसोबतच जीवनही फुलले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कांडगाव (ता. करवीर) येथील सचिन व राणी पाटील या अल्पभूधारक दांपत्याने फुलवलेल्या शेतीची सुगंधी कहाणी...

कोल्हापूर- राधानगरी रस्त्यावरील कांडगाव (ता. करवीर) हे कोल्हापूरपासून वीस किलोमीटरवरील गाव. येथील सचिन बाळासो पाटील (वय ३६) आणि त्यांची पत्नी राणी (वय ३०) यांची सुमारे तीन एकर शेती आहे. ऊस पट्ट्यातील गाव असल्याने प्राधान्याने उसाची लागवड आहे. अशा वेळी सचिन यांनी ५० गुंठे उसासोबतच फूलशेती केली आहे. त्यांच्याकडे पॉलिहाउस १० गुंठ्यात, तर खुल्या शेतातील २० गुंठे इतका गुलाब आहे. शेती कमी असल्याने सचिन यांचे वडील फुलांचा व्यवसाय करायचे. त्यातूनच सचिन यांना फूलशेतीची आवड निर्माण झाली. कोल्हापूर जिल्ह्यात पॉलिहाउसखालील क्षेत्र मोठे असले, तरी खुल्या शेतात गुलाबाची लागवड फारशी नाही. थोडेबहुत शिक्षण झाले तरी नोकरीच्या शोधात फिरत बसणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. अशा वेळी अल्पभूधारक व उच्चशिक्षित असूनही सचिन यांनी नोकरीचा शोध घेण्यापेक्षा आधुनिक फूलशेतीची कास धरली. फूलशेतीमध्ये कष्ट असले तरी दररोजचा ताजा पैसा हाती येत राहतो. हे लक्षात घेऊन त्यांनी २००८ मध्ये शेतीला प्रारंभ करताना गलांडा व झेंडूने सुरवात केली. २०११ मध्ये पंचवीस गुंठ्यांत गुलाबाची लागवड केली. सुमारे चार वर्षे चांगले उत्पादन मिळाले. त्यातूनच गुलाब शेतीतच रस वाढला. एक ते सव्वा एकर शेती ऊस पिकाखाली ठेवून गुलाब शेतीला त्यांनी प्राधान्य दिले.

पहाटेपासून सुरू होतो दिवस

वीस गुंठ्यांत ग्लॅडिएटर या जातीच्या गुलाबाची दोन हजार झाडे आहेत. सकाळी सहा वाजल्यापासून पाटील दांपत्याचा दिवस सुरू होतो. मजुराच्या कमतरतेची समस्या मोठी असल्याने पती-पत्नी दोघेच फुलांची काढणी करतात. लगेच त्याच्या काढणीनंतर गड्ड्या बांधून, सचिन दुचाकीवरून सुमारे १३ कि.मी. अंतरावरील कोल्हापूर येथील शिंगोशी बाजारात फुले घेऊन जातात. तिथे दोन ते अडीच तास थांबून स्वतः फुलांची विक्री करतात. बहुतांश नियमित ग्राहक असल्याने फारशा अडचणी येत नाहीत. प्रतिफूल सरासरी २ रुपये असा दर मिळतो. दररोज पाचशे ते सहाशे फुले असतात.

व्यवसायात नफा-तोटा तर असतोच ना!

गुलाब शेतीत उतरल्यानंतर दोनच वर्षांनी अतिपावसामुळे रोपांची पानगळ झाली. मुळांच्या परिसरात पाणी भरून राहिल्याने संपूर्ण बाग अडचणीत आली. उत्पादनामध्ये घट होऊ लागली. आता करायचे असे म्हणून नशिबाला दोष देत राहण्यापेक्षा हातात कुदळ आणि फावडे घेतले. संपूर्ण बागेतील पाणी बाहेर काढण्यासाठी चर काढले. काही उत्पादन घटले, तरी वेळेत पाणी बाहेर काढल्यामुळे संपूर्ण बाग खराब होण्याचा धोका टळला. याविषयी बोलताना ते म्हणतात, ‘‘व्यवसायात नफा-तोटा तर असतोच ना! आपण कष्टाला कमी पडायचे नाही.

खुल्या शेतीबरोबर पॉलिहाउसचा प्रयोग

कष्ट आणि धडपडीला कमी पडत नसूनही हवामानातील विविध घटकांचा फटका गुलाबासारख्या नाजूक फूलपिकाला बसतो. विशेषतः पावसामुळे गुलाबाची प्रत खराब होत असल्याचे सातत्याने समोर येत होते. गुलाब शेती सुरू करून सहा वर्षे झाल्याने त्यातील व्यवस्थापनाची प्रत्येक बाब ज्ञात झाली होती. त्यामुळे पाटील दांपत्याने थोडे धाडस केले. सहा महिन्यांपूर्वी बॅंकेतून कर्ज घेत पॉलिहाउसची उभारणी केली. त्यासाठी तळेगाव येथे हार्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर येथे पाच दिवसांचे प्रशिक्षणही घेतले. त्यातील डच गुलाबांच्या लागवडीतून आता उत्पादनही सुरू झाले आहे. लांब दांड्याच्या फुलांसोबत गुच्छ (बुके) करण्यासाठी फिलर्सची आवश्यकता असल्याचे सातत्याने फुले बाजारात जात असल्याने माहिती होते. त्यामुळे कामिनी या वनस्पतीची १५ गुंठे लागवड सचिन यांनी केली आहे.

सेंद्रिय व्यवस्थापनाला प्राधान्य

पॉलिहाउसमध्ये आठवड्यातून दोन वेळा फवारणीचे नियोजन असते. खर्च कमी करण्याच्या उद्देशाने जास्तीत जास्त फवारण्या या सेंद्रिय घटकांच्या केल्या जातात. कीड नियंत्रणासाठी निमऑइल, दशपर्णी अर्क यांच्या फायदा होतो. तसेच गुलाबाच्या दर्जाही सुधारतो. यामुळेच बाजारात दरही चांगला मिळत असल्याचे सचिन यांनी सांगितले.

सणासाठी खास नियोजन

फुलांची मागणी ही सणासुदीच्या काळात वाढते. गणपतीच्या काळात दहा ते पंधरा दिवसांच्या कालावधीत नेहमीच्या तुलनेत फुलांना दुप्पट दर मिळतो. त्यासाठी दीड महिना अगोदर शेताची स्वच्छतेसह फुलांच्या छाटणीचे योग्य नियोजन केले जाते. सणासुदीच्या काळात अधिक फुले मिळवण्यावर पाटील दांपत्यांचा भर असतो. या नियोजनामुळे दररोज एक हजार फुले मिळतात. त्याला प्रतिफूल पाच रुपयांपर्यत दर मिळतो. परिणामी चांगली रक्कम हाती येते. पुढे काही काळ दर कमी झाले तरी त्याचा फटका यातून भरून निघतो.

दुधापेक्षा गुलाब शेती फायदेशीर

अलीकडे दूध व्यवसाय अनेक कारणामुळे परवडेनासा झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर गुलाब शेतीकडे जोडधंदा म्हणून पाहिल्यास ती फायदेशीर ठरत असल्याचा अनुभव सचिन यांनी सांगितला. जेवढा वेळ दूध व्यवसायाला द्यावा लागतो, तो इथेही द्यावा लागतो. एकदा सकाळी सहाला शेतात आलो, की कामे पूर्ण करून संध्याकाळी सहालाच घरी जातो. आम्ही दोघेही स्वतः कष्ट करत असल्याचे मजुरी वाचते. खुल्या क्षेत्रातील वीस गुंठे गुलाबातून समाधानकारक उत्पन्न मिळते. आता पॉलिहाउसमधूनही उत्पादन सुरू झाले आहे.

शेतकरी नवरा हवा ग बाई...

सचिन यांचे शिक्षण बी.एस्सी. (केमिस्ट्री) झाले आहे. नोकरीच्या संधी असूनही त्या केल्या नाहीत. लग्न ठरविण्याच्या प्रसंगी त्यांची शेती करणारा मुलगा ही प्रतिमा अडसर ठरण्याची शक्यता होती. नातेवाईक त्यांना समजावत असले तरी शेतीच करण्याचा निश्चय पक्का होता. त्याच वेळी त्यांच्या पत्नी राणी यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. वास्तविक आता ग्रामीण भागामध्येही मुलींच्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत. अशा वेळी लग्नाचा विषय घरात निघू लागल्यानंतर फक्त निर्व्यसनी असलेला उत्तम शेती करणारा मुलगा असावा, अशीच अपेक्षा व्यक्त केली. यामागे आपल्या पाच एकर शेतीमध्ये राबून उत्तम शेती करणारे भाऊ त्यांच्या डोळ्यांसमोर होते. प्रत्येक मुलीने नोकरदार व शहरी नवरा हवा असे म्हटले तर कसे? प्रत्यक्ष पाहण्याच्या कार्यक्रमातही राणी यांनी सचिन यांच्या शेती करण्याविषयी खात्री करून घेतली. हे समजल्यावर तर सचिन यांनी तातडीने होकार कळवला. दोघांचे विचार एक असले की सहजीवनामध्ये शिक्षणाची आडकाठी येत नसल्याचे सचिन व राणी या दांपत्याने सांगितले.

 वय ९० व ७० वर्षे असलेल्या आजे सासू-सासऱ्यांसह, सासू-सासरे, दीर, जाऊ अशा एकत्रित प्रेमळ कुटुंबात दुधात साखर विरघळावी, तसा त्यांचा संसार उत्तम सुरू आहे. या साऱ्यापुढे कष्टाचे काही वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले.

संपर्क ः सचिन पाटील, ९७६५८८११०९

 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
अंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...
रोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...
साखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...
‘ॲग्रोवन’ आमचा..! आम्ही ‘ॲग्रोवन’चे..!!पुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...
वर्धापन दिनानिमित्ताने ‘अॅग्रोवन’वर...पुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...
भारतासह दक्षिण आशियात यंदा सामान्य पाऊसपुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
चंद्रपूरला अजूनही उच्चांकी तापमानपुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्यातील ऊन...
रत्नागिरी, देवगड, अलिबाग हापूसला...मुंबई : हापूस ‘कोणा’चा हा गुंता आता सुटण्याच्या...
‘ॲग्रोवन’चे आज चौदाव्या वर्षात पदार्पण !पुणे ः राज्यभरातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या...
कृषी विज्ञान केंद्रांमध्ये हवामान...पुणे : ‘‘देशातील शेतकऱ्यांना मोबाईलवरून हवामान...
चंद्रपूरमध्ये देशातील उच्चांकी...पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...
३२०० साखर दराची अंमलबजावणी व्हावी :...कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषिमूल्य आयोगाने...
केसर आंबा संकटातचऔरंगाबाद :  सुरवातीला मोहराच्या काळात...
त्रस्त शेतकरी वाटणार ३ मेपासून मोफत दूधनगर/औरंगाबाद  : गतवर्षी शेतकरी संपानंतर...
पीक फेरपालट, सेंद्रिय खतांचा केला वापरप्रभाकर चौधरी हे १९७६ पासून शेती करतात. त्यांची...
खडकाळ, हलक्या जमिनीतही आणली सुपीकताकोणतेही पीक येईल की नाही, अशा खडकाळ जमिनीचे संजय...
नैसर्गिक शेतीतून राखले जमिनीचे आरोग्यअमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा (संभू)( ता. भातकुली...
जमिनीवरील अत्याचार थांबवा !पुणे : एक इंच माती तयार होण्यासाठी ५०० वर्षे...
दुग्ध व्यवसायाला २८०० कोटींचा फटकापुणे : उत्पादन खर्चात वाढ आणि नफा घटल्यामुळे...
मुदत संपलेल्या जिल्हा बँकांवर प्रशासक...मुंबई : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण चार...