छोट्या छोट्या तंत्रांनी शेती झाली सुलभ

शरद पाटील यशकथा
शरद पाटील यशकथा

शेतीसमोरील प्रश्‍न वाढत असतानाच नवे तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाच्या वापरातून नवे मार्ग सापडतात. जळगाव जिल्ह्यातील करंज येथील युवा शेतकरी शरद जगन्नाथ पाटील हे पॉली मल्चिंग, सूक्ष्मसिंचन, व्हेंच्युरी तंत्रज्ञानात सुधारणा, मूरघास निर्मिती आदी विविध तंत्रे हाताळण्यात तरबेज आहेत. त्यातून मजुरी, वेळ, पैसे यात बचत करणे त्यांना शक्य झाले आहे.

करंज (ता. जि. जळगाव) हे जळगाव शहरापासून सुमारे २५ किलोमीटरवर असलेले गाव तापी नदीच्या काठावर वसले आहे. गावात कूपनलिका अधिक आहेत. पाणी मुबलक असल्याने अनेक शेतकरी केळी, कपाशी, मका आदींचे उत्पादन घेतात. जमीन काळी कसदार असल्याने पिके बऱ्यापैकी येतात.

सुधारित तंत्राने शेती गावातील शरद पाटील यांची पाच एकर शेती आहे. कानळदा- भोकर या मुख्य रस्त्यावर गावानजीकच त्यांची शेती आहे. त्यांच्या आईचे सुमारे १५ वर्षांपूर्वी तर वडिलांचे १२ वर्षांपूर्वी निधन झाले. कमी वयातच संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी शरद यांच्यावर आली. पत्नी सौ. अनिता यांच्या साथीने ते शेती कसतात. पाटील कुटुंबाची संयुक्त १० एकर शेती होती. वाटणी होऊन लहान बंधू प्रदीप अलीकडेच वेगळे झाले. अर्थात दोघेही भाऊ एकमेकांना साह्य करतात. शरद पूर्वी भाजीपाल्याची पारंपरिक शेती करायचे. अशातच सुधारीत तंत्र वापरून जळगावातील एका शेतकऱ्याने केलेल्या कलिंगडाच्या यशस्वी शेतीविषयी माहिती मिळाली. शरद यांनाही भाजीपाला पिकांत असे तंत्रज्ञान वापरण्याची प्रेरणा मिळाली.

शरद पाटील वापरतात ही सुधारित तंत्रे

  • सिंचनासाठी वडिलोपार्जीत विहीर आहे. पाणी मुबलक असले तरी त्याचा अपव्यय व्हायला नको असे शरद मानतात. भाजीपाला पिकांना पाणी अधिक लागते असे त्यांना काही शेतकरी सांगायचे, पण शरद यांनी ठिबक सिंचनाचा वापर करून पाण्याचा काटेकोर वापर सुरू केला.
  • शरद यांच्याकडे मजुरांची समस्या आहे. मात्र गादीवाफे बनविणे, नांगरणी आदी कामे ते भाडेतत्वाने करून घेतात. ट्रॅक्‍टर स्वतः चालवितात. एका रेषेतील वाफे तयार करण्यात त्यांचा हातखंडा आहे.
  • सुमारे तीन एकर क्षेत्रावर पॉली मल्चिंगचा वापर केला जातो. मे महिन्यात मका, त्यानंतर सप्टेंबरमध्ये पॉली मल्चिंगवर कलिंगड आणि पुढे त्याच मल्चिंगवर ढेमसे किंवा भेंडी असे नियोजन आहे. म्हणजे एकाच मल्चिंगवर किमान दोन पिके घेतली जातात.
  • मल्चिंग तंत्राच्या वापरामुळे जमिनीत कायम वाफसा राहिला. विषाणूजन्य रोगाचे प्रमाण कमी झाले. पाण्याचे बाष्पीभवन कमी झाले. उत्पादनात वाढ मिळाली. कलिंगडाचे एकरी २० टनांपर्यंत उत्पादन त्यांनी घेतले आहे. एका हंगामात व्यापाऱ्यांनी अत्यंत कमी दरात कलिंगड मागितल्याने थेट ग्राहकांना विक्री करण्याचे शरद यांनी ठरवले. त्यासाठी मित्राकडून मालवाहू चारचाकी आणली आहे.
  • यंत्र हाताळणीत शरद कुशल असल्याने कृषीपंप, जलवाहिनी व अन्य तांत्रिक बाबींमधील बिघाड त्यांना अचूक कळतो. तो त्वरीत दूर करण्यातही ते कुशल आहेत.  
  • सतत नवे काही करण्याची धडपडी वृत्ती असल्याने गावातील अहिल्याबाई शेतकरी विकास गटातही शरद सहभागी झाले आहेत. सेंद्रिय शेतीच्या कार्यक्रमात ते हिरीरिने सहभाग घेतात. गांडूळ खतनिर्मितीचे छोटे युनिटही त्यांनी साकारले आहे.
  • लहान बंधू प्रदीप यांच्यासोबत शेती करीत असताना कूपनलिकेवर कृषी विभागाच्या मदतीने सौरपंप ही बसवून घेतला. शेतात कांदाचाळही उभारली आहे. आज कांदाचाळ व पंप प्रदीप यांच्याकडे आहे.
  • दोघा भावांचे मिळून पशुधन आहे. त्यासाठी यंदा मका पिकावर आधारीत एक टन क्षमतेचे मूरघास युनीटही उभारले आहे. त्याचा उपयोग उन्हाळ्यात त्यांना करता येईल.
  • ठिबक सिंचनाचा वापर केला असला तरी काही वेळा व्हेंच्युरीमुळे शेतात शेवटच्या अोळीपर्यंत पाणी एकसमान दाबाने पोचणे शक्य होत नव्हते. त्यासाठी अर्धा एचपी मोटरचा वापर करून प्रत्येक रोपाला समान दाबाने पाणी देण्याची व्यवस्था केली आहे.  
  • कलिंगडात फळमाशीची संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी एकरी ७० सापळे लावण्याचे त्यांना सांगण्यात आले. मात्र शरद यांनी त्यातील ४० सापळे लावले. तर रिकाम्या प्लॅस्टिक बॉटलचा वापर करून घरगुती स्वरूपात ३० सापळे तयार केले. त्याचाही चांगला फायदा झाल्याचे ते सांगतात.  सापळ्यांचा वापर केल्याने किमान दोन फवारण्यांत बचत झाली. प्रति फवारणी खर्च किमान तीनहजार रुपये येतो.  
  • बैलजोडी चलित मल्चिंग अंथरण्याचे यंत्र घेतले आहे. त्याची किंमत सुमारे सातहजार रूपये आहे. त्या यंत्राच्या वापराने एका दिवसात तीन एकरांत पेपर अंथरण्याचे काम झाल्याचे शरद यांनी सांगितले. त्यासाठी केवळ तीन मजूर पुरेसे ठरले. हेच काम विना यंत्राद्वारे करायचे (मॅन्युएली) तर सहा मजूर लागतात व त्यासाठी किमान तीन दिवस द्यावे लागतात. हे यंत्र भाडेतत्त्वावर देऊन अतिरिक्त उत्पन्नाचा स्त्रोतही शरद यांनी मिळवला आहे.  
  •  संपर्क : शरद पाटील, ९७६७१३८८८६

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com