गुऱ्हाळाद्वारे ऊस प्रक्रिया करत साधली सुबत्ता

गुऱ्हाळाद्वारे ऊस प्रक्रिया करत साधली सुबत्ता
गुऱ्हाळाद्वारे ऊस प्रक्रिया करत साधली सुबत्ता

ज्या भागामध्ये सहकारी साखर कारखानदारी फुललेली आहे, तिथे शेतकऱ्यांसाठी ऊस हे शाश्वत उत्पन्न देणारे असले तरी पाण्याची कमतरता व कारखानदारीचा ऱ्हास यामुळे वऱ्हाडामध्ये ऊस शेती लुप्त होत आहे. मात्र, अकोला जिल्ह्यातील कुरुम (ता. मूर्तिजापूर) येथील अब्दुल शकील अब्दुल रशीद व त्यांच्या बंधूंनी सेंद्रिय पद्धतीने उसाची उत्तम जोपासना केली असून, त्यापुढे जात गुऱ्हाळ उभारले आहे. सेंद्रिय गुळाच्या निर्मितीतून बाजारपेठेमध्ये नाव कमावले आहे. पाण्याची मुबलकता असताना वऱ्हाडात पूर्वी उसाची लागवड होत असे. राजकीय कृपाशीर्वादाने साखर कारखानेही उभे राहिले. मात्र, पाण्याची उपलब्धता कमी झाली. कारखानदारीलाही ग्रहण लागले. या दोन्ही समस्यांमुळे उसाची लागवड कमी होत गेली. वास्तविक पाहता उत्तम नगदी पिके सोडून शेतकऱ्यांना पुन्हा पारंपरिक पिकांकडे वळावे लागले. कधीकाळी हजारो एकर असलेले ऊस लागवड क्षेत्र अाता शासनाच्या पीक पेऱ्यातही दिसत नाही, एवढे कमी व अदखलपात्र बनले. अशाही परिस्थितीत उसाची लागवड करूनच न थांबता, त्यावर आधारित गुऱ्हाळाची उभारणी करण्याचे धाडस मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम या गावातील अब्दुल शकील अब्दुल रशीद व त्यांच्या बंधूंनी केले आहे. सेंद्रिय गूळनिर्मितीतून बाजारपेठेमध्ये स्वतःची अोळख बनवली आहे. तीन भावांची एकत्रित ३० एकर शेती ः कुरुम गाव शिवारात अब्दुल शकील अब्दुल रशीद, अब्दुल जमील अब्दुल रशीद, अब्दुल अकील अब्दुल रशीद यांच्याकडे वडिलोपार्जित अशी सात एकर शेती होती. मात्र, ऊस शेती आणि गुऱ्हाळाच्या उभारणीतून हळहळू शेती खरेदी करता तीन बंधूंनी ३० एकरपर्यंत वाढवली आहे. एका तळावर असलेली शेती संपूर्ण बागायती अाहे. त्यातील १२ एकर क्षेत्रात को ९११० व को ८६०३२ जातींची ऊस लागवड केली आहे. या वर्षी आणखी १० एकर नवीन लागवड करणार अाहेत. उर्वरित शेतात सोयाबीन, हरभरा ही हंगामी पिके घेतात. शेतीत जास्तीत जास्त शेणखताचा वापर ते करतात. ऊस शेतीत रासायनिक खतांचा वापर संपूर्ण बंद केला अाहे. दुपटीने वाढवले उसाचे क्षेत्र ः पूर्वी अकोला जिल्ह्यात उसाचे कारखाने सुरू होते. अनेक शेतकऱ्यांप्रमाणेच १९९२ ते ९७ या काळात अब्दुल शकील हे ऊस पीक घेत. कारखानदारी हळूहळू लयाला गेली. त्याचा फटका अन्य शेतकऱ्यांबरोबरच अब्दुल रशीद यांनाही बसला. अनेकांनी उभा ऊस जाळला किंवा जनावरांना खाऊ घातला. या कटू अनुभवाने पोळलेल्या अब्दुल रशीद व बंधूंनी उसावर प्रक्रिया करण्याचा घाट घातला. मात्र अाता पुन्हा ऊस लागवडीकडे ते वळाले, पण या वेळी लावलेला संपूर्ण ऊस स्वतःच प्रक्रिया करण्यासाठी वापरण्याचा निश्चय करीत गुऱ्हाळ थाटले. या वर्षी त्यांचा हा तिसरा हंगाम अाहे. त्यांचे ऊस क्षेत्र पाच एकरपासून वाढवत १२ एकरांपर्यंत पोचले आहे. पहिल्या हंगामात २०० क्विंटल, दुसऱ्या हंगामात १५० क्विंटल गूळ तयार केला. सेंद्रिय गूळनिर्मिती ः

  • पट्टा पद्धतीने उसाची लागवड केली असून, सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन करतात.
  • एकरी ५० ते ७० टनांपर्यंत उत्पादन मिळते.
  • स्वतःच्या शेतीतील संपूर्ण उसाची गुऱ्हाळाद्वारे प्रक्रिया केली जाते. गुऱ्हाळाच्या उभारणीसाठी सुमारे चार लाख रुपये गुंतवणूक केली करून, प्रतिदिन सरासरी ५ क्विंटल गूळनिर्मिती केली जाते.
  • गूळनिर्मितीच्या प्रक्रियाही संपूर्णतः सेंद्रिय आहे.
  • सेंद्रिय गुळाला आहे उत्तम मागणी ः

  • गुऱ्हाळ सुरू झाल्यापासून तिसरा हंगाम असून, गत दोन वर्षांमध्ये तयार झालेल्या गुळाची विक्री स्थानिक पातळीवर झाली. नजीकच्या अमरावती येथील व्यापाऱ्यांनी जागेवरूनच गूळ नेला.
  • या वर्षी एका स्थानिक व्यापाऱ्याने ५० क्विंटल गुळाची अागाऊ मागणी नोंदविली आहे. तसेच ग्राहकांना दर्जेदार व चांगला अारोग्यदायी गूळ सातत्याने देण्यासाठी आपले प्रयत्न असल्याचे अब्दुल शकील यांनी सांगितले.
  • अब्दुल शकील अब्दुल रशीद यांनी गुळाची निर्मिती करताना सेंद्रिय उत्पादकतेवर जाणीवपूर्वक भर दिला. यामुळे नियमित गुळापेक्षा पाच रुपये दर अधिक मिळतो. व्यापाऱ्याकडून साधारण गुळाला 35 रुपये, तर सेंद्रिय गुळाला गुळाला 40 रुपये प्रतिकिलोपर्यंत दर मिळतो. मागील दोन हंगामांत असा वाढीव दर मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.
  • यासाठी ऊस लागवड आणि व्यवस्थापनापासून सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केला जातो. शेणखत व सेंद्रिय घटकांच्या वापरामुळे उसाचा गोडवा वाढून, गुळाची चवही चांगली मिळत असल्याचा अनुभव आहे. त्याचप्रमाणे पट्टा पद्धतीमध्ये काळ्या उसाची लागवड केली होती. त्याची गोडी अप्रतिम असल्याने अब्दुल शकील यांच्या मुलांनी आठवडी बाजारात हात विक्री केला. 40 ते 80 रुपये जोडीपर्यंत दर मिळाला असून, त्यातून दोन लाख रुपये उत्पन्न मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
  • पुढे गुळाच्या निर्मितीमध्ये कोणत्याही रसायनाचा वापर करत नाहीत. गेल्या दोन हंगामांपासून सातत्य असल्याने व्यापाऱ्यांकडून आगाऊ मागणीही नोंदवली जाते.
  • एकत्र कुटुंब; अादर्शवत शेती ः चारही भावांची शेती एकत्र असून, त्यामध्ये सर्वांचे कष्ट आहेत. मात्र, त्याच वेळी शेतीकडे लक्ष देताना शिक्षणाकडे दुर्लक्ष होणार नाही, याकडेही प्राधान्याने पाहिले जाते. अब्दुल शकील यांचा मुलगा एमबीएपर्यंत शिकून मुंबईत नोकरी करतो. दुसऱ्या भावाची मुलगी उच्च शिक्षण घेत अाहे. शेतीला लागणारी सर्व प्रकारची यंत्रे, ट्रॅक्टर, बैलजोड्या आवश्यकतेनुसार खरेदी केले आहेत. तसेच शेतात पॅकहाउसही उभे केले अाहे. याच ठिकाणी गुळाची निर्मिती केली जाते. अशी आहे प्रक्रिया ः

  • एक टन उसापासून प्रक्रियेनंतर साधारणतः १३० किलो गूळ तयार होतो. दिवसाला दोन कढाई उतरतात.
  • यासाठी रस काढून शिल्लक राहिलेल्या चोथा वाळवून, त्याचा वापर ज्वलनासाठी केला जातो. त्यामुळे खर्चात बचत होते.
  • गुऱ्हाळ वर्षातून चार ते पाच महिने चालते. यातून प्रतिदिन १० ते १२ जणांना रोजगार मिळाला आहे. या वर्षी मजुरांना प्रतिदिन ३०० रुपये, तर त्यांच्या प्रमुखाला (गुळव्याला) ६०० रुपये याप्रमाणे मजुरी दिली जाते.
  • अ. शकील अ. रशीद यांची वैशिष्ट्ये ः

  • कारखाने बंद झाले तरी हार न मानता प्रक्रियेत पाऊल
  • एकत्र कुटुंब असल्याने ३० एकर क्षेत्र व गुऱ्हाळाचे योग्य व्यवस्थापन शक्य.
  • कारखान्याला ऊस देण्याच्या तुलनेत दुप्पट फायदा
  • गाव पातळीवर रोजगारनिर्मिती
  • सेंद्रिय गुळाला असलेली मागणी ओळखून नियोजनात केले बदल.
  • अन्य शेतकरी ऊस कमी करत असताना अाणखी दहा एकरांत नवीन लागवडीचे नियोजन.
  • संप्रक ः अब्दुल शकील अब्दुल रशीद, ९४२३१३०४८०,८३७८९२८०३४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com