बायोगॅसमुळे स्वच्छ ऊर्जेसह पीक उत्पादकता वाढ

बायोगॅस उभारणीतून स्वच्छ ऊर्जेसह मिळवली उत्पादकता वाढ
बायोगॅस उभारणीतून स्वच्छ ऊर्जेसह मिळवली उत्पादकता वाढ

ग्रामीण भागामध्ये शेण, पिकांचे अवशेष मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. प्रामुख्याने त्यांच्या ज्वलनातून ऊर्जा मिळवली जाते. मात्र, ज्वलनातून निर्माण होणारे वायू हे पर्यावरणासोबत स्वयंपाकघरामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या आरोग्यासाठीही हानिकारक ठरतात. यावर बायोगॅस हा पर्याय फायदेशीर ठरतो. फर्रादापूर (ता. मेहकर, जि. बुलडाणा) येथील उद्धव पुंडलिक गाडेकर यांनी सुधारीत बायोगॅस उभारला असून, त्यातून उपलब्ध होणाऱ्या गॅसमुळे प्रति वर्ष 9 हजार रुपयांची, तर शेतात शेणस्लरीच्या वापरातून रासायनिक खतांवरील खर्चात सुमारे 10 हजार रुपयांची बचत साधली आहे. फर्रादापूर (ता. मेहकर, जि. बुलडाणा) येथील उद्धव पुंडलिक गाडेकर यांच्याकडे 15 एकर शेती आहे. सहा तास सोयाबीन त्यातच सातव्या तासाला तुरीच्या लागवडीचा पॅटर्न या भागातील शेतकऱ्याप्रमाणेच उद्धवही राबवतात. खरिपातील सोयाबीन, तुरीच्या काढणीनंतर रब्बी हंगामात सलग हरभरा लागवड असते. घरातील जनावरांच्या खाद्यासाठी 15 ते 20 गुंठ्यावर यशवंत जातीच्या चाऱ्याची लागवड केली आहे. या वर्षी दहा एकर क्षेत्रामध्ये हरभरा लागवड केली असून, प्रति वर्ष हरभऱ्याचे एकरी उत्पादन सरासरी आठ क्‍विंटलपर्यंत घेतात. पाच एकर क्षेत्रामध्ये गहू पीक असून, त्यापासून एकरी सरासरी दहा ते बारा क्‍विंटल उत्पादन मिळते.

बायोगॅसची केली उभारणी उद्धव यांच्या कुटुंबात आईवडील, पत्नी, दोन मुले असे सहा जण आहेत. स्वयंपाकासह अन्य कामांसाठी दर महिन्याला सरासरी एक सिलिंडर लागत असे. वाशीम जिल्ह्यामधील रामदास हाडे यांच्याकडे एका लग्नानिमित्त गेल्यानंतर त्यांना बायोगॅसची माहिती मिळाली. यातून सिलिंडरवरील खर्चाच बचत होत असल्याचेही समजले. त्यानंतर बायोगॅसची सविस्तर माहिती मिळवली. अनुदान असल्याचे कळाल्याने मेहकर पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी अशोक मुळे यांच्याशी संपर्क साधला. अनुदानासाठी प्रस्ताव दाखल केला. बायोगॅस उभारणीच्या प्रक्रियेने वेग घेतला. अकोला येथील कृषी विद्यापीठातील कुशल कामगार ज्ञानेश्‍वर तायडे यांच्या माध्यमातून बायोगॅस उभारला. त्यासाठी सुमारे 30 हजार रुपये खर्च आला. 2013-14 या वर्षात त्यांना बायोगॅस उभारणीसाठी आठ हजार रुपयांचे अनुदानही मिळाले.

अशी आहे संरचना

  • डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अपारंपरिक ऊर्जा स्रोत विभागाने दिनबंधू (जनता) सुधारीत बायोगॅस संयंत्र विकसित केले आहे. या प्रकारचे दोन घनमीटर क्षमतेचे बायोगॅस संयंत्र उद्धव यांनी उभारले आहे. त्यासाठी प्रति दिन 45 ते 50 किलो शेणाची आवश्‍यकता असते. दोन घनमीटर क्षमतेच्या पारंपरिक बायोगॅस संयंत्रातून प्रति दिन दोन हजार लिटर गॅस मिळतो, तर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सुधारीत तंत्रज्ञानातून त्यापेक्षा तीस टक्‍के अधिक गॅस मिळत असल्याचे कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ डॉ. अनिल कांबळे यांनी सांगितले.
  • उद्धव यांनी घरापासून 800 फूट अंतरावर असलेल्या आपल्या शेतात बायोगॅस बांधला आहे. तेथून 16 एम. एम. आकाराच्या ठिबक लॅटरलद्वारे घरापर्यंत गॅस आणला आहे.
  • सध्या गॅस सिलिंडरची किंमत 750 रुपये आहे. महिन्याला सरासरी एक सिलिंडर अपेक्षित धरल्यास वर्षभरात 9 हजार रुपयांची बचत होते. बायोगॅस सलग चालविल्यास चार तास ऊर्जा मिळते.
  • शेणाच्या स्लरीचा शेतात वापर

  • बायोगॅसमधून बाहेर पडणारी शेणस्लरी ही शेतीसाठी खत म्हणून उपयुक्त ठरते. अलीकडे त्यांनी शेतामध्ये शेणस्लरीचा वापर वाढवला असून, रासायनिक खतांचा वापर कमी केला आहे. त्यामुळे रासायनिक खतावरील खर्चात सरासरी दहा हजार रुपयांपर्यंत बचत झाल्याचे उद्धव यांनी सांगितले.
  • शेणस्लरी ही पिकांच्या उत्पादकतेसाठी उपयुक्त ठरली आहे. पूर्वी सोयाबीनचे उत्पादन एकरी 7 क्‍विंटलपर्यंत मिळत असे. ते वाढून आता एकरी दहा क्‍विंटलवर पोचल्याचे ते सांगतात. शेणस्लरीमुळे शेतीमध्ये जिवाणूंची चांगल्या प्रकारे वाढ होते. तसेच नत्र, स्फुरद आणि पालाशही पिकांच्या वाढीसाठी उपलब्ध होते.
  • जनावरांपासून मिळते शेण

  • उद्धव यांच्याकडे दोन बैल आणि एक म्हैस आहे. त्यांच्या शेणाचा वापर बायोगॅससाठी होतो. जाफराबादी म्हशीपासून 8 लिटर दूध उत्पादन मिळते.
  • शेणासोबतच घरातील उरलेले अन्न, भाजीपाला, देठ व अन्य अवशेष यांचा वापर बायोगॅस संयंत्रामध्ये करता येतो. पारंपरिक तंत्राच्या बायोगॅस संयंत्रामध्ये केवळ शेणाचा वापर करावा लागतो. तसेच ऊर्जा निर्मितीही तुलनेने कमी होते.
  • दुहेरी फायदा ः

  • सुधारीत बायोगॅस संयंत्रामुळे 30 टक्के अधिक गॅस मिळतो.
  • यात शेणासोबत अन्य कुजणाऱ्या सर्व घटकांचा वापर शक्‍य.
  • शेणस्लरीचा शेतामध्ये वापर केल्याने उत्पादनामध्ये मिळाली वाढ.
  • सामान्यतः शेणाच्या गोवऱ्या लावून त्यांच्या ज्वलनातून ऊर्जा मिळवली जाते, त्या तुलनेमध्ये अधिक स्वच्छ ऊर्जा यातून मिळते.
  • ऊर्जेवरील खर्चात आर्थिकदृष्ट्या प्रति वर्ष 9 हजार रुपयांपर्यंतची बचत शक्‍य.
  • पारंपरिक व सुधारीत बायोगॅस संयंत्राची तुलना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील अपारंपरिक ऊर्जा स्राेत विभागातील तज्ज्ञ डॉ. अनिल कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार,

  • पारंपरिक बायोगॅसमध्ये दिवसाला ५० लिटर पाण्याची गरज राहते. तुलनेने सुधारीत बायोगॅस संयंत्रासाठी थेट शेणाचा वापर करता येतो. त्यामुळे पाणीटंचाई असलेल्या भागाकरीता उपयोगी.
  • पारंपरिक बायोगॅसच्या स्लरीमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे शेतात वापरण्यासाठी काही दिवस (४५ दिवस) वाट पाहावी लागते. तुलनेने सुधारीत बायोगॅस संयंत्रातील स्लरीचा शेतीमध्ये थेट वापर करता येतो.
  • पारंपरिक बायोगॅसच्या तुलनेत ३० टक्‍के अधिक जैववायू मिळतो.
  • संपर्क ः उद्धव गाडेकर, 9763058363

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com