जलसंधारणातून खटाव निघाले समृद्धीकडे

जलसंधारणातून खटाव निघाले समृद्धीकडे
जलसंधारणातून खटाव निघाले समृद्धीकडे

सांगली जिल्ह्यातील कर्नाटक सीमेलगत असलेले खटाव (ता. मिरज) हे गाव तसे कायम पाणी टंचाईग्रस्त. जिरायती आणि अशाश्वत शेतीमुळे संघर्ष पाचवीलाच पूजलेला. मात्र, जलयुक्त शिवार योजनेतून जलसंधारणाची कामे झाली. पाणी साठवण वाढली. पर्यायाने गावातील बागायती क्षेत्र वाढले असून, शेतशिवार हिरवेगार झाले आहे. गावाची वाटचाल समृद्धता, सुबत्तेकडे सुरू झाली आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्‍याचा पूर्व भाग दुष्काळी म्हणून ओळखला जातो. सांगलीपासून चाळीस किलोमीटर अंतरावरील खटाव (ता. मिरज) या गावातही पाण्याची मोठी टंचाई. अगदी पिण्याच्या पाण्यासाठीही टॅंकरवर अवलंबून असलेले. येथील भूजलपातळीही खोलवर (३८ फुटांपर्यंत) गेलेली. पर्यायाने संपूर्ण शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून. जिरायती पिकांची अशाश्वताही गावावर भरून राहिलेली. यावर मात करण्याच्या उद्देशाने या गावामध्ये जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न कृषी विभागाने केला. कृषी विभागाने हे गाव पाणी टंचाईमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवले. खटाव हे गाव जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट केले. त्यानंतर तत्कालीन जिल्हा कृषी अधीक्षक उमेश पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ यांनी सातत्याने गावाला भेटी दिल्या. गावाच्या चारी बाजूने असलेल्या लहान-मोठ्या ओढ्यावर जलयुक्त शिवारमधून कोणती जलसंधारणाची कामे करता येतील, याचा अंदाज घेतला. कामांची आखणी करण्यापूर्वी गावकऱ्यांना विश्वासात घेणे, जनजागृती करणे आवश्यक होते. लोक सहभाग वाढवण्यासाठी चर्चा, बैठका, प्रभात फेरी यांचे आयोजन करण्यात आले. खटाव या गावचे मंडल कार्यालय आरग येथे असून, याठिकाणी पावसाची सरासरी मोजली जाते. या मंडलाची पावसाची सरासरी ५५० मिलिमीटर आहे. त्यात जमिनी हलक्या असल्याने पाण्याचा साठा होत नव्हता. अनियमित पावसामुळे पिकांना फटका बसत होता. त्यामुळे पाण्याची शाश्वत सोय होण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले. अशी केली जनजागृती

  • शिवार फेरी
  • विशेष ग्रामसभा
  • शेतकरी मेळावे
  • शेतकऱ्यांबरोबर बैठक व चर्चासत्र
  • लोकसहभाग
  • जलयुक्तमधून ही झाले कामे

  • कॉंक्रीट सिमेंट नालाबांध ः ६ गट
  • कंपार्टमेंट बंडिग ः ८९३
  • नाला खोलीकरण व रुंदीकरण २१ गट
  • लोकसहभागातून झालेली कामे

  • ओढा पात्रातील गाळ काढणे ः २ बंधारे
  • वनराई (कच्चे बंधारे) २ बंधारे
  • वृक्षलागवड ः ५५० रोपे
  • विहीर पुनर्भरण ः ५
  • पाणीसाठा

  • पूर्वी ः गावात केवळ ३०१.४० टी.सी.एम (हजार घनमीटर) पाणीसाठा होत असे.
  • जलयुक्त शिवारनंतर ः ६१४.७२ टी.सी.एम. पाणीसाठा
  • एकूण पाणीसाठा ः ९१६.१२ टी.सी.एम.
  • उत्पादकताही वाढली पीक.....पूर्वीची उत्पादकता.......आत्ताची उत्पादकता (हेक्‍टरी) रब्बी ज्वारी .....४ क्विंटल .....10 क्विंटल मका......२१ क्विंटल ......३५ क्विंटल ऊस.....३५ टन .....५५ टन द्राक्ष.....१३ टन ......१८ टन बागायती क्षेत्र वाढण्यास मदत या गावात केवळ जिरायती शेती केली जायची. त्यावर उदरनिर्वाह करणे कठीण असल्यामुळे गावकऱ्यांना मजुरीचा आधार घ्यावा लागे. मात्र, जलयुक्त शिवार योजनेसह लोकसहभागातून झालेल्या कामांमुळे गावाच्या चारही बाजूला पाणीसाठे तयार झाले. भूजलपातळी वाढली. पाण्याची शाश्वती वाढली. गेल्या एक वर्षामध्ये गावात द्राक्ष बागेचे सुमारे ४० हेक्‍टरने क्षेत्र वाढले तर बागायत क्षेत्र तब्बल ९३ हेक्‍टरने वाढले आहे. शेतशिवारात डोलणाऱ्या पिकांसोबत समाधानही शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलत आहे. आता गावात भाजीपाला, ऊस, द्राक्ष अशी नगदी पिके होत असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ होत आहे. शेतकऱ्यांचे आयुष्यच बदलून गेले आहे. जमिनीची सुपिकता वाढवली या गावातील शेतजमीन ही हलक्‍या प्रतीची आहे. परिणामी पिकांची वाढ आणि उत्पादकताही कमी राहते. गावामध्ये जलयुक्त शिवाराची कामे सुरू झाल्यानंतर ओढ्यातून काढलेला गाळ शेतकऱ्यांनी स्वखर्चाने शेतात टाकला. या गाळयुक्त मातीमुळे सुमारे ९३ हेक्‍टर क्षेत्र सुपीक होण्यास मदत झाली. हा झाला बदल

  • पाण्याची सोय झाल्याने नगदी पिकांसह चारा पिकांची लागवडही वाढली. गावात शेतीला दुग्ध व्यवसायाचीही जोड मिळाली.
  • पूर्वी गावात दोन दूध संकलन केंद्र होत्या. त्यांचे प्रतिदिन दूध संकलन सुमारे ५ हजार ५३० लिटर इतके होते.
  • आत्ता ६ दूध संकलन केंद्र सुरू असून, प्रतिदिन ३ हजार ९७५ प्रति लिटर दूध संकलन होत आहे.
  • प्रतिक्रिया

    आमचा भाग दुष्काळी म्हणून ओळखला जायचा. शेतीचा भर प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर असे. डिसेंबरच्या महिन्यापर्यंत विहिरीतील पाणी कसेबसे पुरायचे. टॅंकरद्वारे पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध करावे लागे. माझ्या शेताजवळचा बाबर ओढा गाळाने भरल्याने साठवणक्षमता कमी झाली होती. मात्र, २०१५-१६ मध्ये जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत या ओढ्यातील गाळ काढला. पाणी साठू लागल्याने शेतीला चांगला फायदा झाला. - रामचंद्र आप्पासो बाबर माझी १२ एकर शेती असून, पूर्वी ती केवळ पावसावर अवलंबून होती. कृषी विभागाच्या वतीने जलयुक्त शिवार योजनेतून गाव परिसरातील ओढे खोलीकरण, बंधारे उभारणी अशी कामे झाली. यामुळे संपूर्ण १२ एकर क्षेत्र ओलिताखाली आले असून, आता चार एकर उसासह भाजीपाला पिके घेत आहे. जनावरांसाठी चारा पिकेही घेत आहे. - शिवलिंग नागू बेरड (संपर्क ः ७७५६०१३८१४) जिरायती शेतीवर प्रपंच चालणे अवघड होते. त्यामुळे मजुरी करत असे. जलयुक्त शिवाराची कामे झाल्याने शेतीला पाणी मिळाले. शेतात भाजीपाला पिके घेतो. त्यातून उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे. सात महिन्यांपूर्वी पहिल्यांदाच द्राक्षाची लागवड केली आहे. - तानाजी वाळके सन २०१२ पासून खटाव हे गाव टॅंकरवर अवलंबून होते. पावसावर आधारीत शेतीची उत्पादकताही कमी होती. जलयुक्त शिवार योजनेमध्ये २०१५ मध्ये हे समाविष्ट करण्यात आले. त्या अंतर्गत कामे झाल्याने चांगला पाणी साठा झाला. परिसरातील विहिरी व कूपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ झाली. हे पाणी एप्रिल महिन्यापर्यंत पुरेल अशी आशा आहे. बागायती क्षेत्र वाढले असून, पीक पद्धतीत बदल झाला आहे. - अमित सूर्यवंशी, कृषी सहायक संपर्क. ९४०४३५३९४०

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com