परसबागेतील पोल्ट्रीसाठी नियमांची आवश्यकता

परसबागेतील पोल्ट्रीसंदर्भात अचूक
परसबागेतील पोल्ट्रीसंदर्भात अचूक

परसबागेतील कोंबडीपालनाची लोकप्रियता वेगाने वाढत असली तरी अनेक नगरपालिकांमध्ये पक्ष्यांचे पालन व कत्तलीसंदर्भात स्पष्ट नियमावली व कायदेच नसल्याचे पुढे आले आहे. अमेरिकेतील कोलोरॅडो राज्यात सुमारे १०० नगरपालिकांमधील व चार मोठ्या शहरांतील ४२ हजार कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. ही बाब पक्ष्यांचे आणि पर्यायाने माणसांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने धोका वाढण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.

बहुतांश शेतकऱ्यांच्या परसबागेमध्ये कोंबड्यांचे पालन केले जाते. त्याचा उपयोग प्रथिनांच्या उपलब्धतेसोबतच घरगुती पद्धतीने मांस मिळवण्यासाठी केला जातो. या पद्धतीमुळे महायुद्धाच्या काळात अन्नधान्यांवर नियंत्रण (रेशनिंग) असण्याच्या किंवा प्रचंड मंदीच्या परिस्थितीतही अनेक कुटुंबांना तग धरणे शक्य झाले. उपासमार टळली होती. अलीकडे ग्रामीण आणि निमशहरी भागामध्ये परसबागेतील पोल्ट्रीला पुन्हा लोकप्रियता मिळू लागली आहे.

ग्रामीण भागामध्ये कोंबड्यांचे पालन ही मुक्त संचार पद्धतीने किंवा पिंजऱ्यामध्ये केले जाते. अनेक लोक व्यावसायिक उपयोगापेक्षाही स्वतःच्या कुटुंबाच्या आहारासाठी म्हणून त्यांचे पालन करतात. मात्र, कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी या प्रकारच्या कोंबडीपालनामध्ये आवश्यक तितकी आरोग्याची काळजी घेणे, लसीकरण याकडे लक्ष देण्यात येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. व्यावसायिक पोल्ट्रीसाठी अनेक नियम असले तरी परसबागेतील कोंबडीपालनासाठी कोणतेही नियम किंवा कायदे नाहीत. या क्षेत्रामध्ये सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. परसबागेतील कोंबडीपालनाकडे अन्न किंवा आहार या दृष्टीने पाहण्याची आवश्यकता व्यक्त केली. हे संशोधन जर्नल ऑफ कम्युनिटी हेल्थ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले.

कॅलिफोर्निया विद्यापीठातील कृषी व पर्यावरणशास्त्र महाविद्यालयातील सहायक प्राध्यापिका कॅथरीन ब्रिंकले यांच्या केलेल्या अभ्यासामध्ये ही बाब प्रकर्षाने पुढे आली आहे. आपल्या संशोधनाविषयी माहिती देताना त्यांनी सांगितले, की स्वतःचे अन्न स्वतः पिकवणे किंवा तयार करण्याकडे लोकांचा कल वाढतो आहे. मात्र, पक्ष्यांचे व माणसांचे मूलभूत आरोग्य यात पणाला लागता कामा नये. परसबागेमध्ये केल्या जाणाऱ्या कोंबडीपालनामध्ये लसीकरण, पक्ष्यांची विष्ठा आणि खत व्यवस्थापन, पक्ष्यांचे सामान्य आरोग्य याबाबत अधिक नियमावलींची गरज समोर आली आहे. सध्या व्यावसायिक पोल्ट्री उद्योगामध्ये पक्ष्यांचे पालन, आरोग्य आणि मांसासाठी कत्तल या संदर्भात अनेक नियम असले तरी घरगुती कोंबडीपालनाबाबत फारसे नियम नाहीत. पर्यायाने माणसांच्या आरोग्यासाठी धोका वाढू शकतो.

संशोधकांनी कोलोरॅडो येथील १०० नगरपालिकांमधील कोंबडीपालन, पक्ष्यांचे शेड आणि अन्य उपलब्ध सांख्यिकी माहितीचा उपयोग केला. त्यांनी अमेरिकेतील डेनव्हर, लॉस एंजेलिस, मियामा आणि न्यूयॉर्क अशा तीन शहरांशी त्याची तुलना केली. या चार शहरांतील सुमारे ४२ हजार कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आले. डेनव्हर येथे परसबागेतील पोल्ट्रीला प्रोत्साहन देण्याचे प्रमाण सर्वाधिक (६२.५ टक्के) असून, या विभागामध्ये परसबागेतील पोल्ट्रीपासून मानवी आरोग्याला धोका होऊ शकतो, असे म्हणणाऱ्याचे प्रमाण सर्वात कमी (७.४ टक्के) होते.

कोलोरॅडोमध्ये २००० मध्येच पोल्ट्रीविषयक अनेक कायदे मंजूर करण्यात आले होते. शंभर वर्षाच्या तुलनेमध्ये गेल्या पाच वर्षामध्ये कायद्यामध्ये काही बदल किंवा सुधारणा करण्याचे प्रमाण अधिक असल्याचे निरीक्षण ब्रिंकले यांनी नोंदवले आहे. त्यात पोल्ट्रीविषयक सामान्य नियमावलीचा प्राधान्याने कोंबड्यांसाठी खुराड्याचे आरेखन, त्याची जागा आणि पक्ष्यांच्या लिंगाचे प्रमाण यांचा समावेश होता. काही नगरपालिकांमध्ये बारा पक्ष्यांसाठी एक रुस्टर असा नियम आहे. काही नगरपालिकांमध्ये असा नियमच नाही. मात्र स्वच्छता, खेळती हवा, अन्न आणि पाण्याची उपलब्धता याविषयीच्या नियमांमध्ये समानता आहे. परसबागेतील पक्ष्यांच्या कत्तलीसंदर्भात कोलोरॅडोतील केवळ अर्ध्या नगरपालिकांमध्ये नियम आहेत. त्यातील अनेक नियम हे अत्यंत मोघम स्वरूपात केल्याचे जाणवते.

थोडक्यात कोलोरॅडो येथील अभ्यासामध्ये कोंबड्यांचे आरोग्य आणि जपणुकीविषयी योग्य आणि स्पष्ट नियमावली उपलब्ध नाहीत. केवळ दोन टक्के नगरपालिकांमध्ये पोल्ट्री आणि प्राण्यांसंदर्भातील क्रूरतेविषयीचे नियम आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com