खाऱ्या पाण्यात पिंजऱ्यांमध्ये सिबास मासेपालन ठरेल फायदेशीर

खाऱ्या पाण्यात पिंजऱ्यांमध्ये सिबास मासेपालन ठरेल फायदेशीर
खाऱ्या पाण्यात पिंजऱ्यांमध्ये सिबास मासेपालन ठरेल फायदेशीर

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रीय खाऱ्या पाण्यातील सजीव पालन संस्थेने चेन्नई येथील राष्ट्रीय महासागर औद्योगिक संस्था (NIOT) यांच्या सहकार्यांने पिंजऱ्यातील मत्स्यपालनासंदर्भात प्रयोग सुरू केले असून, पहिल्या टप्प्यामध्ये सिबास माशांचे पालन करण्यात आले. यातून किनारावर्ती भागातील ग्रामीण भागामध्ये शाश्वत उत्पन्नांच्या व रोजगारांच्या संधी वाढण्यास मदत होणार आहे. सागरी किनाऱ्याजवळील, खाडी प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी खाऱ्या पाण्यातील मत्स्यपालनामुळे चांगले उत्पन्नाचे साधन निर्माण होऊ शकते. परदेशामध्ये सागरात जाळ्यामध्ये मत्स्यपालन मोठ्या प्रमाणात होत असले तरी भारतामध्ये अद्याप त्याने मूळ पकडलेले नाही. त्यासाठी चेन्नई येथील राष्ट्रीय महासागर औद्योगिक संस्था (NIOT) यांच्या सहकार्याने भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रीय खाऱ्या पाण्यातील सजीव पालन संस्था संशोधन करीत आहे. त्याअंतर्गत तमिळनाडू राज्यातील वेन्नागुपाट्टू (जि. कांचीपुरम) येथील बकिंगम खाडीमध्ये आशियाई सिबास माशांचे (लेट्स कैलकरीफर) जाळीदार पिंजऱ्यांमध्ये पालन करण्यात येत आहे. मत्स्यपालनासाठी आवश्यक पिंजऱ्यांचे आरेखन, निर्मिती, मत्स्यबीज वाढविण्यासाठी नर्सरी, मासेपालन यासाठी संशोधन होत आहे. प्रकल्पउभारणीसाठी त्रिस्तरीय प्रारूप तयार केले आहे. पिंजऱ्यातील मत्स्यपालनाचे त्रिस्तरीय तंत्र

  • आशियाई सिबास (लेट्स कैलकरीफर) मासे वेगाने वाढतात. या माशांची अंडी देण्याची क्षमता व बाजारात किंमतही चांगली आहे.
  • नर्सरीमध्ये १ सेंमी आकाराच्या मत्स्यबीजांची वाढ केली जाते. साधारणतः ४५ ते ६० दिवसांमध्ये करंगळीच्या आकाराची (७-८ सेंमी) वाढतात. त्यानंतर त्यांना प्री ग्रो पिंजऱ्यात स्थलांतरित करतात. तिथे ९० ते १०० ग्रॅम वजनाचे झाल्यानंतर ग्रो आउट पिंजऱ्यामध्ये हलवले जातात. येथे त्यांच्या साठवणीची घनता १२ किलो प्रतिवर्गमीटर ठेवली जाते.
  • या माशांच्या आहारासाठी संस्थेने सीबॅस या सागरी जिवापासून तयार केलेला आहार दिला जातो. वाढीच्या टप्प्यानुसार वजनाच्या ८-१० टक्के, ४ ते ६ टक्के आणि २ ते ४ टक्के आहार पुरवला जातो. त्याची किंमत प्रतिकिलो ८० रुपये इतकी आहे. साधारणतः १ किलो वजनाच्या मासे मिळविण्यासाठी १.८५ किलो आहार द्यावा लागतो.
  • सुमारे सहा महिन्यांमध्ये माशांचे वजन ९०० ग्रॅम ते १.२५ किलोपर्यंत मिळते. एका चक्रामध्ये दोन वेळा ४६० किलो उत्पादन मिळाले. प्रतिकिलो उत्पादनासाठी १९० रुपये खर्च येतो; तर माशांच्या विक्रीतून प्रतिकिलो ३८० रुपये मिळतात.
  • या मत्स्य उत्पादकांना तमिळनाडू मात्सिकी विकास निगम या सरकारी संस्थेशी जोडण्यात आले आहे. त्यामुळे माशांना योग्य दर मिळण्यास मदत होते.
  • शाश्वत उत्पन्नासह रोजगाराची निर्मिती

  • कांचीपुरम परिसरातील तरुणांच्या गटाने पिंजऱ्यातील मत्स्यपालनाचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यातून ‘डॉ. ए.पी.जे. अब्‍दुल कलाम फिश प्रोड्यूसर्स स्‍व: सहायता समूह’ या बचत गटाची स्थापना झाली असून, स्थानिक कोळी बांधव मत्स्यपालनाकडे वळले आहेत.
  • नुकताच वेन्नागुपाट्टू गावातील संस्थेच्या मत्स्यपालन तलावावर मासेमारी करणाऱ्या स्त्री, पुरुषांसह मुलांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. त्यात सुमारे १२० लोकांनी सहभाग घेतला. या संस्थेत पहिल्या टप्प्यातील मत्स्यबीजाचे पालन करणाऱ्या महिला सदस्य़ांना मासेपालनातून मिळालेल्या उत्पन्नाचे वाटप संस्थेचे संचालक डॉ. के.के. विजयन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
  • मासेपालनासाठी आवश्यक पिंजऱ्यांची निर्मिती राष्ट्रीय महासागर औद्योगिक संस्थेतील गटाने केली होती. ही पद्धती अत्यंत सोपी असून, ग्रामीण पातळीवर त्याचे उत्पादन होऊ शकते. या त्रिस्तरीय पिंजऱ्यातील मत्स्यपालनातून किनारावर्ती भागामध्ये चांगले उत्पन्न मिळू शकते. रोजगारनिर्मितीसाठीही त्याचा फायदा होणार आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com