नेदरलॅंडमध्ये साठवण, निर्यातीसाठी खास कांदा जाती

नेदरलॅंडमध्ये साठवण, निर्यातीसाठी खास कांदा जाती
नेदरलॅंडमध्ये साठवण, निर्यातीसाठी खास कांदा जाती

वातावरणातील बदल लक्षात घेता कांदा पिकांच्या नव्या जातींच्या पैदासीसाठी सातत्याने प्रयत्न केला जात आहे. जागतिक पातळीवरील विविध संस्था त्यासाठी कार्यरत आहेत. त्यामध्ये खासगी संशोधन संस्था, कंपन्यांचे संशोधन विभागही उतरले आहे. विविध रोगांसाठी प्रतिकारकता, सालीची जाडी, गंध, रंग यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. कांद्याचा दर्जा हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून, तो टिकवण्यासाठी विविध मार्गाने प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी रोग प्रतिकारकता विकासावर प्राधान्याने लक्ष दिले जात आहे. कमी कालावधीच्या कांद्यामध्ये येणाऱ्या करपा रोगाविरुद्ध प्रतिकारक जनुक पीडीआर कार्यान्वित असलेल्या प्रजातीं बाजारात उतरवण्यासाठी पैदासकार तयार आहेत. त्याविषयी माहिती देताना ग्लोबल प्रोडक्ट मॅनेजर विम व्हॅन डेर हेईज्दान यांनी सांगितले, की या रोगांविरुद्धची प्रतिकारशक्ती कांदा पिकाला आणि उत्पादनांना बाजारामध्ये वेगळी क्षमता देणार आहे. नेदरलँडमधील बियाणे उत्पादक कंपनी हजेरातर्फे विविध ठिकाणी कांदा सुधार प्रकल्प राबवला जात असून, त्यामध्ये प्राधान्याने दर्जा आणि अधिक उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्यात येतो. दर्जासाठी कंपनीने काही निकष ठरवले आहेत. त्यात कडकपणा आणि सुप्तावस्था यांचा समावेश आहे. कडकपणा हा घट्टपणा, कांद्याच्या सालींची संख्या आणि जाडीवर अवलंबून असतो. त्यामुळे वाहतुकीदरम्यान व साठवणीमध्ये कांदा चांगला राहण्यास मदत होते. स्थानिक हवामानानुसार केले खास बदल ः

  • कांदा तापमान, प्रकाशाची तीव्रता आणि दिवसांची लांबी या हवामानातील तीन घटकांना तीव्रतेने प्रतिसाद देतो. हजेरामध्ये अन्य देशामध्ये निर्यातीच्या दृष्टीने संकरीत जातींचा विकास करण्यात येतो. त्यांच्या जातींची विभागणी दिवसांच्या लांबीनुसार बदलते. उदा. अधिक लांबीचे दिवस, लांब दिवस, सरासरी दिवस आणि कमी लांबीचे दिवस.
  • स्थानिक हवामानानुसार योग्य त्या कांदा जातींची निवड केल्यास अधिक चांगले उत्पादन मिळते. खास पश्चिम युरोप येथील बाजारपेठ लक्षात घेऊन नवीन कांदा जात विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ही जात या वर्षी बाजारात येण्याची शक्यता कंपनीने व्यक्त केली. लवकर पक्व होणारी, अधिक उत्पादनक्षम, चांगली साठवणक्षमता असलेली आणि कडकपणा असलेली अशी तिची वैशिष्ट्ये विम यांनी सांगितली. यामुळे उत्पादकांसाठी हवामानाचा धोका कमी झाला आहे. या जातीची लागवड मार्च महिन्यामध्ये, तर काढणी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत करता येते. पूर्वीच्या मार्च - सप्टेंबर या महिन्यामध्ये पिकाला प्रचंड पावसाचा सामना करावा लागे. अर्थात, या कालावधीमध्ये येणाऱ्या काही जाती बाजारात उपलब्ध असल्या तरी त्यांमध्ये साठवणक्षमता नसणे आणि जोड कांद्याचे अधिक प्रमाण या समस्या आहेत.
  • रोगासाठी प्रतिकारकता ः

  • पैदासकार केंद्र म्हणून हजेराने गेल्या ३० वर्षांपेक्षाही अधिक काळापासून डाऊनी मिल्ड्यू (करपा) रोगाला प्रतिकारक जातींचा विकास हे लक्ष्य ठेवले आहे. जागतिक पातळीवर या रोगामुळे ५ ते ३० टक्क्यांपर्यंत नुकसान होते. हे प्रमाणही शुद्धपणे रोगांवरच अवलंबून असते. त्यामध्ये उत्पादनावर परिणाम करणाऱ्या अन्य घटकांचा समावेश केलेला नाही. ज्या वेळी करपा रोगाचा प्रादुर्भाव हंगामाच्या सुरवातीच्या काळात होतो, त्या वेळी होणारे नुकसान अधिक असते.
  • फ्युजारियम आणि बॉट्रायटीससारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भावही लक्षात घेण्यात आला आहे. मात्र, या रोगांच्या नियंत्रणाबाबत शंभर टक्के खात्री देणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
  • दीर्घकाळ साठवणीमधील वजनांची घट

  • दीर्घकाळ कांदा साठवणीमध्ये वजनात मोठी घट येते. वाहतुकीचा मार्ग अधिक काळाचा असल्यास प्रत्यक्ष भरतीवेळचे वजन आणि नंतरचे वजन यात फरक पडू शकतो. उत्पादनानंतर कांदा वाळवणे, साठवणे आणि वाहतूक या प्रक्रियांमध्ये वजनात अल्प घट होत असली तरी दीर्घकाळ साठवणीमध्ये हे प्रमाण अधिक असू असते. सातत्याने ४० वर्षांपासून पिकामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असल्याने प्रत्येक बारीक सारीक घटकांची नोंद घेणे व त्यावर अंमलबजावणी केली जाते. कांद्याचा कडकपणा आणि साल निर्यातीमध्ये विशेषतः तापमानातील चढउतारामध्ये अत्यंत मोलाची भूमिका बजावते.
  • सरासरीपेक्षा २ ते ३ टक्क्याने वजन घट, तर जोडकांद्याचे प्रमाण २ ते ४ टक्क्याने कमी होत असल्याचे आढळले आहे. यामुळे निव्वळ फायद्यामध्ये वाढ होते.
  • कांद्याचा रंग ः गेल्या काही वर्षांमध्ये कांद्याच्या रंगामध्ये बदल केले जात आहे. नेहमीच्या लाल, पांढरा यासोबत पिवळा, गुलाबी असे रंग आणले जात आहेत. गुलाबी रंगाचा कांदा इक्वेडोर परिसरातीमध्ये लोकप्रिय आहे. गुलाबी रंग आणि मंद असा गंध असलेला कांदा पेरू आणि डोमिनिकन प्रजासत्ताक येथील देशांमध्ये प्रसिद्ध आहे. त्याच प्रमाणे लाल आणि पांढऱ्या कांद्याचाही बाजारपेठेतील हिस्सा वाढत आहे. हजेरा कंपनीने एका कांद्यामध्ये दुहेरी रंग असलेली जात आणण्याचे नियोजन केले आहे. सेंद्रिय बाजारपेठेसाठी नवी जात ः गेल्या काही वर्षांमध्ये सेंद्रिय बाजारपेठ वेगाने विस्तारत आहे. त्यामध्ये बस्तान बसवण्यासाठी हजेरा कंपनीने विशिष्ट जात- फास्टो बनवली आहे. ती हवामानातील विविध बदलांमध्येही चांगल्या प्रकारे वाढते. तिचा साठवणकालावधीही उत्तम आहे. तसेच लवकर येणारी, रोग प्रतिकारकता असल्याने दर्जाही चांगला मिळतो.  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com