युरोपीय महासंघाने तयार केला वाळवंटीकरणाचा अॅटलास

युरोपीय महासंघाने तयार केला वाळवंटीकरणाचा अॅटलास
युरोपीय महासंघाने तयार केला वाळवंटीकरणाचा अॅटलास

युरोपीय महासंघाच्या संयुक्त संशोधन केंद्राच्या वतीने जागतिक वाळवंटीकरणाचा नकाश तयार करण्यात आला आहे. या पहिल्याच एकत्रित व पुरावा आधारित अशा नकाशातून जागतिक पातळीवरील जमिनीची होणारी धूप आणि वाळवंटीकरणाचा अंदाज येतो. जमिनीच्या सुपीकतेसंदर्भात तातडीने उपाययोजना राबवण्याची गरज यातून स्पष्ट होते. या नकाशाची नवी आवृत्ती २१ जून रोजी प्रकाशित करण्यात आली. जमिनीवरील उत्पादकतेचा ताण वाढत्या लोकसंख्येबरोबर वाढत जाणार आहे. अशा स्थितीमध्ये जमिनीची सुपीकता हा अत्यंत महत्त्वाचा विषय ठरणार आहे. मानवी हस्तक्षेपासह नैसर्गिक पातळीवरही विविध कारणांमुळे जमिनीची धूप होत असते. त्याचा वेग प्रचंड असून, अन्नधान्य सुरक्षिततेची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. त्याविषयी माहिती देताना युरोपीय संघाच्या संयुक्त संशोधन केंद्राचे टिबोर नाव्रास्किकस यांनी सांगितले, की वाळवंटीकरणाचा आधीचा नकाशा प्रकाशित झाल्याच्या घटनेला सुमारे २० वर्षे झाली आहेत. दरम्यानच्या काळामध्ये जमीन आणि मातीवर ताण लक्षणीयरीत्या वाढलेला आहे. भविष्यासाठी आपला ग्रह सुरक्षित ठेवायचा असेल, तर हे मूलभूत स्रोत जपण्याची गरज आहे. जागतिक पातळीवर वाळवंटीकरणाच्या नकाशामुळे धोरणकर्त्यांना एकत्रित माहिती उपलब्ध होऊ शकेल. त्यातून जमिनीच्या सुपीकता टिकवण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल. या नकाशातून मानवी हस्तक्षेपामुळे होणाऱ्या अघटित घटकांकडे लक्ष वेधले आहे. उदा. विविध प्रजातींचे उच्चाटन, अन्न सुरक्षिततेसाठी भीती, वातावरण बदलाचा वाढलेला वेग, या साऱ्यांमुळे स्थलांतराचे वाढलेले प्रमाण. वाळवंटीकरण जसे वाढत जाईल, तसा सर्व ताण उपल्बध सुपीक जमिनीवर वाढत जाणार आहे. यातील महत्त्वाचे मुद्दे

  • जागतिक पातळीवरील एकूण जमिनीच्या सुमारे ७५ टक्के जमीन ही आधीच नापीक झालेली आहे. २०५० पर्यंत हेच प्रमाण ९० टक्क्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे.
  • दरवर्षी सुमारे ४.१८ दशलक्ष वर्ग किलोमीटर क्षेत्र खराब होत असून, त्याचा फटका प्रामुख्याने आफ्रिका आणि आशिया खंडाला बसत आहे. युरोपीय खंडातील मातीची सुपीकता कमी होण्याचे प्रमाण दरवर्षी सुमारे १० अब्ज डॉलर इतक्या किमतीचे आहे.
  • जमिनीचे क्षरण आणि वातावरणातील बदल यामुळे २०५० पर्यंत जागतिक पिकांच्या उत्पादनामध्ये १० टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे. याचे प्रमाण भारत, चीन आणि सबसहारण आफ्रिकेमध्ये अधिक असणार आहे. येथील उत्पादनाची घट ही ५० टक्क्यांपर्यंत असू शकेल.
  • जंगलाखालील क्षेत्र वेगाने कमी होत असून, वातावरणातील बदलांचे परिणाम रोखण्यामध्ये अडचणी येणार आहेत.
  • २०५० या वर्षापर्यंत जमिनीच्या क्षरणामुळे ७०० दशलक्ष लोक स्थलांतरित किंवा विस्थापित होतील. या शतकाच्या अखेरपर्यंत हेच प्रमाण १० अब्जापर्यंत पोचेल.
  • शेतीचे वाढत चाललेले प्रमाण हेही मातीची सुपीकता कमी होण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. ते पिकांची उत्पादकता वाढवून काही प्रमाणात रोखता येईल. त्याचप्रमाणे वनस्पतिजन्य आहाराकडे लोक वळवणे, प्राणिज प्रथिनांऐवजी अधिक शाश्वत स्रोत शोधणे आणि अन्नाची नासाडी व वाया जाणे टाळणे अशा अनेक उपायांकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे.
  • पार्श्वभूमी

  • संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकास ध्येयाप्रमाणे जागतिक पातऴीवर वाळवंटीकरणाविरुद्ध लढाईल प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. त्यासाठीचा एक कार्यक्रम २०३० लक्ष्य ठेवून तयार करण्यात आला आहे.
  • युरोपीय खंडामध्ये वाळवंटीकरणामुळे ८ टक्के विभागाला विशेषतः दक्षिण, पूर्ण आणि मध्य युरोप फटका बसणार आहे. या विभागात सुमारे १४ दशलक्ष हेक्टर जमीन वाळवंटीकरणाच्या छायेत आहे.
  • युरोपातील बल्गेरिया, क्रोशिया, सायप्रस, ग्रीस, हंगेरी, इटली, लाटविया, माल्टा, पोर्तुगाल, रोमानिया, स्लोवाकिया, स्लोवेनिया आणि स्पेन या १३ सदस्य देशांनी वाळवंटीकरणाचा फटका बसत असल्याचे जाहीर केले आहे. युरोपीय संघाने माती आणि शाश्वत जमीन वापर या अनुषंगाने काम सुरू केले आहे. ऊर्जा, कृषी, वने, हवामान बदल, संशोधन अशा अनेक विभागांमध्ये काम सुरू केले आहे.
  • नकाशाच्या निर्मितीसाठी नकाशाच्या नव्या आवृत्तीसाठी संशोधकांनी १.८ पेटाबाईट्स इतक्या उपग्रह डेटावर शेकडो संगणकांच्या साह्याने प्रक्रिया केली. या माहितीसाठ्याचा आकार हा ६ वर्षांपेक्षा अधिक पूर्ण चोवीस तास हाय एचडी व्हिडियो रेकॉर्डिंगइतका आहे. या आधीची नकाशा आवृत्ती १९९२ मध्ये रिओ दी जॅनेरियो येथील अर्थ समिटमध्ये, त्यानंतर पाच वर्षांनी १९९८ मध्ये दुसरी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली आहे.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com