रॉक फॉस्फेट ठरेल स्फुरदाचा स्वस्त पर्याय

रॉक फॉस्फेट ठरेल स्फुरदाचा स्वस्त पर्याय
रॉक फॉस्फेट ठरेल स्फुरदाचा स्वस्त पर्याय

केनियातील पश्चिमेकडील भागामध्ये शेती अत्यंत अडचणीची ठरत आहे. या ठिकाणी शेतकरी वर्षातून एक किंवा दोन पिके घेत असले तरी पोषक घटकरहित माती ही मोठी समस्या ठरत आहे. त्यातच गरिबीचे प्रमाण मोठे असल्याने महागडी पारंपरिक खते विकत घेऊन वापरणे शक्य होत नाही. यावर रॉक फॉस्फेट या खनिजाच्या वापराचा पर्याय उपयुक्त ठरू शकत असल्याचे इल्लिनॉईज विद्यापीठातील कृषी महाविद्यालयात झालेल्या संशोधनातून लक्षात आले आहे. ट्रिपल सुपर फॉस्फेटसारखी पारंपरिक खते ही अत्यंत महाग असल्याने गरीब शेतकऱ्यांना विकत घेणे परवडत नाही. परिणामी हलक्या जमिनीमध्ये उत्पादन चांगले मिळत नाही. पर्यायाने अन्नसुरक्षेसाठी बिकट स्थिती निर्माण होते. यावर मात करण्यासाठी रॉक फॉस्फेट हे खनिज अत्यंत उपयुक्त ठरू शकते. इल्लिनॉईज विद्यापीठातील संशोधक मार्गेनॉट आणि सहकाऱ्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि नैरोबी येथील आंतरराष्ट्रीय उष्णकटिबंधीय कृषी केंद्रातील संशोधकांसह दोन स्फुरदयुक्त खतांचा दीर्घकालीन अभ्यास केला.

  • ट्रिपल सुपर फॉस्फेट (४५ टक्के स्फुरद) हे प्रामुख्याने मोरोक्को येथील खाणीतून आयात करावे लागते. हे खत प्रदेशातील आम्लधर्मी, लोहयुक्त जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे विरघळते. मात्र, त्याची अधिक किंमत अडचणीची ठरते. तसेच अधिक लोह असलेल्या जमिनीमध्ये कमी सामू असताना त्यातील स्फुरद बांधले जाते. ते पिकांना वापरता येत नाही.
  • फॉस्फेट रॉक या खतामध्ये ८ ते १२ टक्के स्फुरद असून, ते तुलनेने स्वस्त आहे. ते आम्लधर्मी जमिनीमध्ये वापरण्यास योग्य आहे. त्याबद्दल माहिती देताना मार्गेनॉट यांनी सांगितले, की रॉक फॉस्फेट हे आपल्या दातांमध्ये किंवा हाडामध्ये आढळणाऱ्या कॅल्शिअम फॉस्फेटप्रमाणे आहे. ते कमी पीएच असलेल्या मातीमध्ये उपयुक्त ठरू शकते.
  • मका आणि वाटाणा या पिकांमध्ये रॉक फॉस्फेट, ट्रिपल सुपर फॉस्फेट आणि खतांचा अजिबात न वापरता प्रयोग करण्यात आले. तेरा हंगामाइतक्या दीर्घकाळ केलेल्या या अभ्यासामध्ये माती आणि पिकामध्ये उपलब्ध स्फुरदाचे प्रमाण मोजण्यात आले. लोहामुळे बंधनात अडकलेल्या स्फुरदाचे प्रमाण मोजण्यात आले. तसेच उपयुक्त सूक्ष्मजीवांवरील परीणामांचाही विचार करण्यात आला.
  •  टीएसपी आणि रॉक फॉस्फेट या दोन्हीची पिकातील उपलब्धता सारखीच आहे. मात्र, टीएसपी खतांच्या शेतामध्ये लोहामुळे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक स्फुरद बांधले गेल्याने पिकांना उपलब्ध होत नसल्याचे आढळले.
  • रॉक फॉस्फेटच्या शेतामध्ये २९९ टक्के अधिक स्फुरद हा सूक्ष्मजीवांच्या कार्यामुळे अधिक उपलब्ध होत असल्याचे आढळले. 
  • रॉक फॉस्फेट हे सावकाश उपलब्ध होणारे खत असून, टीएसपी वेगाने मिळते. एकाच वेळी अधिक वापर केल्यास सूक्ष्मजीव आणि पिकांना उचलता येत नाही. पर्यायाने ते मातीमध्ये बद्ध होते. मात्र, रॉक फॉस्फेटमुळे काही प्रमाणात आम्लता कमी होऊन मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअमसारखे अन्य पोषक घटक उपलब्ध होण्यास मदत होते. त्याचा पिकांना फायदा होतो. - अॅन्ड्र्यू मार्गेनॉट, संशोधक

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com