मधमाश्यांच्या वसाहतीत वाढतेय बुरशीनाशकांचे प्रदूषण

मधमाश्यांच्या वसाहतीत वाढतेय बुरशीनाशकांचे प्रदूषण
मधमाश्यांच्या वसाहतीत वाढतेय बुरशीनाशकांचे प्रदूषण

अमेरिकेतील इल्लिनॉईज विद्यापीठामध्ये झालेल्या संशोधनामध्ये मधमाशा सामान्य साखरेच्या रसाच्या तुलनेमध्ये बुरशीनाशकांचे अंश असलेल्या साखरेच्या रसाला प्राधान्य देत असल्याचे दिसून आले आहे. वास्तविक बुरशीनाशकांमुळे मधमाश्‍यांच्या वसाहतीमध्ये प्रदूषण होत असल्याच्या बाबी सातत्याने पुढे येत असतानाच काही बुरशीनाशकांविषयी मधमाश्‍यांमधील आकर्षण हा अधिक अभ्यासाचा विषय होऊ शकतो. हे संशोधन ‘जर्नल सायंटिफिक रिपोर्टस्’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे . आजवर बुरशीनाशके आणि कीटकनाशकांच्या मधमाश्‍यांवरील विपरीत परिणामांची अनेक संशोधने प्रसिद्ध आहेत. मात्र, नव्याने झालेल्या एका संशोधनामध्ये क्लोरोथॅलोनीलचा वापर आणि बंबल बीमध्ये नोसेमा बोम्बी या बुरशी परजिवीचा आढळ या गोष्टी समांतरपणे चालत असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे बंबल बीच्या चार प्रजातींच्या घटत्या संख्येशीही अधिक बुरशीनाशक वापराचा संबंध जोडण्यात आला आहे. त्याचप्रमाणे युरोपिय मधमाश्‍यांमध्ये विषारी संयुगांचे (बुरशीनाशकांसह) विपरीत कमी करणारी विकरे (एन्झायम्स) मर्यादित असून, त्याचा चयापचयाच्या क्षमतेवर परिणाम होत असल्याचे एका अभ्यासात आढळले आहे. इल्लिनॉईज विद्यापीठ कीटकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. मे बेरेन्बाऊम यांनी सांगितले, की बुरशीनाशकांचा परिणाम केवळ बुरशीवर होतो, असे लोक मानतात. मात्र, त्यांचा परिणाम वनस्पतींपेक्षाही प्राण्यांवर अधिक होतो. जे विषारी घटक बुरशींच्या प्रक्रियांना हानी पोचवतात, ते कीटकांसह प्राण्यांमध्येही हानी पोचवू शकतात. २०१५ मध्ये झालेल्या एका अभ्यासात, युरोपीय मधमाशा आणि बंबल बीची एक प्रजाती ही निओनिकोटीनॉईड कीटकनाशकांचे अंश असलेल्या आहाराला अधिक प्राधान्य देत असल्याचे दिसून आले. त्याच्या अधिक चाचण्या घेण्यासाठी पोस्ट डॉक्टरल संशोधक लिंग-हसियू लियावो यांनी काही प्रयोग केले. तपासणीसाठीच्या रसायनाचा अंश असलेला साखरेचा द्रव आणि नुसता साखरेचा द्रव अशी दोन खाद्य ठिकाणे तयार केली. मधमाशा आपल्या खाद्याची मुक्तपणे निवड करू शकतील अशी रचना केली. या रसायनामध्ये नैसर्गिकरीत्या आढळणाऱ्या तीन बुरशीनाशके आणि दोन तणनाशकांच्या विविध प्रमाणांमध्ये समावेश होता. चाचणीमध्ये नैसर्गिकरीत्या रसायनांचे अंश असलेल्या द्रवाला मधमाश्‍यांनी प्राधान्य दिल्याचे दिसले. उदा. साखरेच्या द्रवामध्ये ग्लायफोसेटचे प्रमाण १० पीपीबीपर्यंत असल्यास त्याकडे मधमाशा आकर्षिल्या गेल्या. त्यापेक्षा अधिक प्रमाण असताना मात्र मधमाशा तिकडे फिरकल्या नाहीत. अशीच बाब क्लोरोथॅलोनीलचे प्रमाण ०.५ आणि ५० पीपीबीपर्यंत असताना मधमाश्‍यांमध्ये आकर्षण दिसून आले. मात्र, ५०० पीपीबी प्रमाण असताना मधमाशा आल्याच नाहीत.

  • प्रा. बेरेन्बाऊम यांनी सांगितले, की यावरून मधमाशा बुरशीनाशकांना केवळ टाळतातच असे नाही, तर काही मात्रेमध्ये आहारात घेत असल्याचे दिसून आले. कदाचित मधमाश्‍यांच्या पोळ्यामध्ये बुरशीनाशकांचे अधिक अंश सापडण्याचेही हेच कारण असावे. उत्क्रांतीच्या इतिहासामध्ये बुरशीनाशकांना प्राधान्य देण्याची बाब वैशिष्ट्यपूर्ण ठरायला हरकत नाही.
  • कामकरी मधमाशा वसंताच्या सुरवातीपासून फुलोरा संपेपर्यंत कार्यरत असतात. या हंगामामध्ये त्या विविध वनस्पतींच्या फुलोऱ्यांवर अवलंबून असतात. कदाचित नावीन्यपूर्ण आहाराच्या शोधामध्ये मधमाशा या रसायनयुक्त द्रवांकडे आकर्षित होत असतील.
  • मधमाश्यांच्या वसाहतीमध्ये येणाऱ्या व्हरोवा परजिवी कोळ्यांना नियंत्रित ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोळीनाशकांच्या चयापचयावर या बुरशीनाशकांच्या संपर्कामुळे परिणाम होतो. हे अधिक धोकादायक आहे.
  • या रसायनांच्या प्रमाणावरूनच त्यांचा विषारीपणा ठरतो. ज्या वेळी विषारी घटक हे पचविण्याच्या क्षमतेपेक्षा अधिक होतात, त्यानंतरच तोपर्यंत उपाचारासाठी वापरले जाणारे रसायनही विषारी ठरू शकते. ज्यावेळी अनेक कीडनाशकांच्या संपर्कात मधमाशा येतात, त्यावेळी हाच प्रकार घडत असल्याचे बेरेन्बाऊम यांनी सांगितले.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com