‘प्रत्युष’ सुपर कॉम्प्युटरमुळे गावपातळीवर मिळेल हवामानाचा अचूक अंदाज

‘प्रत्युष’ सुपर कॉम्प्युटरमुळे गावपातळीवर  मिळेल हवामानाचा अचूक अंदाज
‘प्रत्युष’ सुपर कॉम्प्युटरमुळे गावपातळीवर मिळेल हवामानाचा अचूक अंदाज

 ‘‘मॉन्सून, जलवायूचा अंदाज ‘प्रत्युष’ या सुपर कॉम्प्युटरमुळे अधिक अचूकपणे वर्तविता येणार आहे. तसेच, गावपातळीवरील हवामानाचा अंदाज देणेही शक्‍य होणार आहे. याद्वारे आगामी दोन वर्षांत देशातील जवळपास ९.३ कोटी शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज सांगणारा संदेश पाठविण्याचे उद्दिष्ट पूर्ण होणार आहे,’’ असे मत केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान, भू-विज्ञानमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी व्यक्त केले.

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेतर्फे (आयआयटीएम) ‘प्रत्युष’ या देशातील पहिल्या मल्टी पेटाफ्लॉप्स सुपर कॉम्प्युटर एचपीसी प्रणालीचे उद्‌घाटन डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते झाले. या वेळी खासदार अनिल शिरोळे, केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. राजीवन, आयआयटीएमचे संचालक प्रा. रवी एस. नन्जुनडैया, प्रकल्प संचालक डॉ. सूर्यचंद्र राव आदी उपस्थित होते. जवळपास ४५० कोटी रुपयांच्या निधीतून ‘प्रत्युष’ची निर्मिती झाली आहे.

डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, ‘‘सध्या देशातील सुमारे २.४ कोटी शेतकऱ्यांच्या मोबाईलवर हवामानाचा अंदाज पाठवण्यात येत आहेत. त्यामुळे दरडोई उत्पन्नात वाढ होताना दिसून येत आहे. ‘प्रत्युष’ या सुपर काँप्युटरमुळे  उष्णतेची लाट, चक्राकार स्थिती, त्सुनामी, वीज पडणे, अतिवृष्टी असे हवामानविषयक अंदाज अचूकपणे देणे शक्‍य होणार आहे. एचपीसी या प्रणालीच्या साहाय्याने हवामानाचा अचूक अंदाज वर्तविणाऱ्या देशांच्या क्रमवारीत जपान, युनायटेड किंगडम, अमेरिका या देशांनंतर भारत चौथ्या क्रमांकावर पोचला आहे.’’ ‘‘सर्वसामान्य नागरिकांसाठी विज्ञान कसे उपयुक्त ठरेल, यासाठी सरकारी पातळीवरून प्रयत्न करण्यात येत आहेत. अवकाश निरीक्षणासाठीची जगातील सर्वांत मोठी दुर्बीण बनविण्यासाठी केंद्र सरकारने १३०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तसेच, ‘डिजिटल भारत’ साकारण्यासाठी १० लाख किलोमीटरच्या ऑप्टिकल फायबरच्या केबलचे जाळे पसरविले आहे. याद्वारे हजारो गावांमध्ये इंटरनेट पोचले आहे. नव्या भारताचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविताना ‘सायंटिफिक सोशल रिसपॉन्सिब्लिटी’वर भर दिला जाणार आहे,’’ असेही डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले. या कार्यक्रमात ‘प्रत्युष’ वेबपोर्टलचे उद्‌घाटन करण्यात आले. याप्रसंगी एम. राजीवन यांचेही भाषण झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com