वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी जंगलांना होतो बुरशींचा फायदा

वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी जंगलांना होतो बुरशींचा फायदा
वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी जंगलांना होतो बुरशींचा फायदा

पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेण्याच्या वनस्पतींच्या क्षमतेमध्ये वाढ होण्यासाठी मातीतील बुरशींची मदत होऊ शकत असल्याचे संशोधनात पुढे आले आहे. मातीतील बुरशी आणि त्यांचा पर्यावरणावरील नेमका परिणाम तपासण्यासाठी कॅलिफोर्निया विद्यापीठातील सहायक प्रा. काई झू यांनी जमिनीपासून टोकाकडे ऐवजी टोकाकडून जमिनीकडे (‘बॉटम अप’पेक्षाही ‘टॉप बॉटम अॅप्रोच’) असे नावीन्यपूर्ण धोरण वापरले आहे. त्यामुळे उपग्रहातून मिळणाऱ्या प्रतिमांद्वारेही जमिनीतील विविध घटकांचा वेध घेणे शक्य होऊ शकते. निसर्गामध्ये सहजिवी संबंधांचे महत्त्व मोठे आहे. एकमेकांच्या सहकार्यांतून मातीतील बुरशी आणि वनस्पतींची मुळे विविध अन्नद्रव्यांची देवाणघेवाण करतात. मातीच्या आत अंधारात होणाऱ्या या प्रक्रियांचा परणाम वनस्पतींच्या वाढीवर मोठ्या प्रमाणात होत असतो. वातावरणातील बदलांशी जुळवून घेण्यासाठी या बुरशी उपयुक्त ठरत असल्याचे सांताक्रूझ येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील सहायक प्रा. काई झू यांनी केलेल्या अभ्यासात पुढे आले आहे. वातावणातील बदलांची तीव्रता वेगाने वाढत असताना, त्याला जंगलांचा प्रतिसाद तुलनेने कमी आहे. तो वाढवण्यासाठी कोणते घटक उपयुक्त ठरू शकतील, याबाबत अभ्यास करण्यात आला. जंगलामध्ये झाडांची वाढ ही प्रामुख्याने मातीमध्ये उपलब्ध असलेल्या अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. सेंद्रिय कर्बांचे वहन करण्यामध्ये पर्यावरणातील विशेषतः झाडांच्या मुळांवर वाढणाऱ्या मायकोरायझल बुरशी मोलाची भूमिका निभावतात. मातीतील पोषक कर्ब घटक आणि मुळे यातील मध्यस्थ म्हणून कार्य करतात. झाडांच्या मुळांकडून बुरशींना कार्बन उपलब्ध होते, तर वनस्पतीला पोषक घटक मिळतात. असा दोघांच्या फायद्याचा सौदा असतो.

  • जंगलामध्ये सामान्यतः आढळणाऱ्या दोन महत्त्वाच्या बुरशी  इक्टोमायकोरायझल ः या बुरशी सूचीपर्णी झाडांवर (उदा. पाईन, ओक आणि बिचेस) वाढतात. अर्ब्युस्कर ः अन्य झाडांवर (उदा. मॅपल) वाढतात.
  • झू यांनी अमेरिकेच्या फॉरेस्ट इन्व्हेंटरी अॅंड अॅनालिसिस प्रोग्रॅममधून मातीतील कार्बन आणि नायट्रोजनच्या पातळीमध्ये होत असलेल्या बदलांची माहिती मिळवली. त्यात वरील दोन्ही बुरशींशी संबंधित झाडांच्या किंवा वनस्पतींच्या वाढीचा सहसंबंध तपासण्यात आला. विशेषत एक्टोमायकोरायझल वाढणाऱ्या आणि अर्ब्युस्कर बुरशी वाढणाऱ्या वनस्पती यांच्या वाढीचा वेध घेण्यात आला. झू यांना मातीमध्ये नत्राचे प्रमाण अधिक असलेल्या पर्यावरणातील झाडांवर वातावरणातील बदलांच्या होणाऱ्या परीणामांविषयी माहिती मिळाली.
  • मातीतील कर्ब - नत्र गुणोत्तर वाढले की इसीएम बुरशींच्या प्रमाण वाढते. त्यावर हवामान, मातीचा पोत आणि पाने पडून निर्माण होणारे नत्र यांचा काही प्रमाणात परिणाम होत असला तरी त्यांचे प्रमाण लक्षणीय वाढते. थोडक्यात, मातीतील कर्बाचे वाढलेले प्रमाणापेक्षाही कमी झालेल्या नत्रामुळे इसीएम बुरशींचे प्रमाण वाढते.
  • एएम आणि इसीएम प्रकारच्या झाडांच्या बाबतीत नत्राची उपलब्धता असतानाही वाढीमध्ये फरक पडतो. कारण त्यावरील बुरशींची नत्राच्या शोषणामध्ये मोलाची भूमिका असते. या बुरशी संदेश पोचवण्यासोबतच पोषक घटकांची उपलब्धता करण्यासाठी एकाच वेळी प्रयत्न करतात.
  • जमिनीतील प्रक्रिया वेध घेण्यामध्ये अनेक अडचणी असल्या तरी झाडांच्या वाढीवरील परिणाम बाह्य साधनांच्या साह्याने मोजता येऊ शकतो. त्यामुळे जंगले वातावरणातील बदलांना कसा प्रतिसाद देतील, याचा अंदाज घेणे शक्य होईल.
  • जागतिक तापमान बदलामध्ये अमेरिकेच्या पूर्व भागातील जंगलाचे विस्थापन अधिक उंचीकडे होणार असल्याचा दावा अनेकजण करत असले तरी त्याबाबतचे पुरावे मिळालेले नसल्याचे झू यांनी सांगितले. बॉटम अपपेक्षाही टॉप बॉटम अॅप्रोच फायद्याचा ठरू शकत असल्याचे त्यांचे मत आहे. हे संशोधन जर्नल ऑफ इकॉलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com