शेडनेटमधील भरीत वांग्याची आश्वासक गटशेती

मित्रांची अशी दिलदारी म्हणूनच शेळीपालनात भरारी
मित्रांची अशी दिलदारी म्हणूनच शेळीपालनात भरारी

लोहा तालुक्यातील (जि. नांदेड) आधुनिक विचाराने चालणाऱ्या संकल्प शेतकरी गटाने बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन शेडनेटमधील भरीत वांग्याच्या शेतीत पाऊल टाकले आहे. यापूर्वी शेडनेटमध्ये ढोबळी मिरची, काकडी घेतल्यानंतर या तिसऱ्या व्यावसायिक पिकावर गटातील सहा शेतकऱ्यांनी भर दिला. पहिल्या प्रयत्नात ते यशस्वी ठरलेच. शिवाय अजून प्राविण्य मिळवण्याचा मार्ग त्यांना मिळाला आहे. भरताचे वांगे म्हटले की आठवतो तो खानदेशच. अर्थात राज्यात इतरत्रदेखील या वांग्याची शेती असंख्य शेतकरी करीत आहेतच. पण नांदेड जिल्ह्यात हे वांगे घेण्याचा फारसा कल नाही. मात्र बाजारपेठेचा कल, ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन या भागातील शेतकरीदेखील आपल्या भागासाठी अपारंपरिक असलेल्या पिकांचा शोध घेऊ लागले आहेत. जिल्ह्यातील लोहा तालुक्यात संकल्प शेतकरी गट कार्यरत आहे. त्यांनीही हेच उद्दिष्ट ठेवून पीक बदलावर भर दिला आहे. ढोबळी, काकडीनंतर भरताचे वांगे गट सुमारे तीन-चार वर्षांपासून नव्या पिकांच्या प्रयोगात व्यस्त आहे. सुमारे नऊ सदस्यांनी शेडनेटमध्ये ढोबळी मिरची तर सात जणांनी काकडी घेतली. मागील वर्षी सहा जणांनी एकूण पाच एकरांत शेडनेटमध्ये भरताचे वांगे घेण्याचा प्रयोग केला. गटाचे अध्यक्ष माधव सूर्यवंशी (चितळी), भालचंद्र कदम (हळद), गोविंद डांगे (पोखरभोसी), नरहरी हरिचंद्र कोटलवार (धानोरा) यांच्याकडे प्रत्येकी एक एकर तर हरी शिंदे (हळदव) व वसंत ढगे (पिंपळगाव) यांच्याकडे प्रत्येकी अर्धा एकरात वांग्याची लागवड होती. शेती व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी (प्रातिनिधिक)

  • शेडनेटमध्ये चांगले उत्पादन येण्यासाठी गादीवाफा (बेड) काळजीपूर्वक तयार करावा लागतो.
  • उभी-आडवी नांगरणी केल्यानंतर एकरी २० ब्रास शेणखत व १० टन साळीचे तूस टाकले. या तुसामध्ये पाण्याचा निचरा चांगला होतो.
  • शेणखत व साळीचे तुस चांगले मातीत मिसळून घेतले. बेडचा टॉप दीड फुटाचा तर पाया तीन फुटांचा.
  • दोन बेडमध्ये पाच फुटांचा ‘पाथवे’.
  • बेडवर ठिबकची नळी अंथरून ३० मायक्रॉन जाडीचा मल्चिंग पेपर अंथरला जातो.
  • बेसल डोसमध्ये एकरी शेणखत २० ब्रास, एसएसपी १०० किलो, सेंद्रिय खत २०० किलो, मॅग्नेशियम
  • २५ किलो, पोटॅश ५० किलो असा वापर.
  • पुणे येथून प्रति रोप ८ रुपयांप्रमाणे आणली. एकरी साधारणतः चार हजार रोपे लागली.
  • लागवडीनंतर रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बुरशीनाशकांचे ड्रेचिंग, वेळोवेळी विद्राव्य खते
  • शेडनेटमध्ये नागअळी, पांढरी माशी आदींचा प्रादुर्भाव होतो. तापमान जास्त असताना कोळी, थ्रिप्स यांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी फवारण्या केल्या.
  • बांधणी झाडाच्या फांद्या ठिसूळ असल्याने व फुले नाजूक असल्याने बांधणीकडे लक्ष द्यावे लागते. थोड्याशा धक्‍क्‍यानेही फूलगळ होते. वांग्याची प्रमुख फांदी वरच्या बाजूला असलेल्या तारेला चाड्याच्या गाठीने बांधली जाते. रोपांची वाढ जसजशी होईल त्याप्रमाणे गाठ ढिली करून प्रमुख फांदी बांधता येते. वांग्याच्या दुय्यम फांद्या बांधण्यासाठी बेडच्या दोन्ही बाजूने प्रत्येकी दहा फुटांवर सात ते आठ फूट उंचीचे बांबू जमिनीत गाडले जातात. त्यावर प्रत्येक सव्वा फुटावर नायलॉनची दोरी सरळ रेषेत बांधली जाते. त्यानंतर दुसरी दोरी पुन्हा सव्वा फुटावर व तिसरी दोरी त्यानंतर दीड फुटावर बांधली जाते. या दोरीवर दुय्यम फांद्या चढवल्या जातात. यामुळे फांद्यांना आधार मिळून फूलगळ रोखता येते काढणी व मार्केटिंग सामूहिक शेती असल्याने वांग्याचे मार्केटिंग एकत्रित करणे गटाला शक्य झाले. जुलैमध्ये लागवड केली होती. साधारण फेब्रुवारीपर्यंत प्लॉट सुरू राहतो. पॅकिंग प्लॅस्टिक पन्नीमध्ये केली जाते. प्रति पन्नीत २० किलो वांगी असतात. सर्वांचा माल एकाच ट्रकमध्ये भरून हैदराबाद येथे पाठवण्यात आला. त्यामुळे वाहतुकीच्या खर्चात बचत झाली. दरही चांगला मिळण्यास मदत झाली. साधारण तीन ते चार दिवसांनी एक ट्रक हैदराबादला जायचा. माल विकल्यानंतर तीन दिवसांनी पट्टी मिळायची. दिवसा मजुरामार्फत तोडणी व पॅकिंग केले जायचे. रात्री ट्रकने माल रवाना व्हायचा. हैदराबादचे मार्केट लोहा भागातील शेतकऱ्यांना सुमारे तीनशे किलोमीटरवर आहे. किफायतशीर अर्थकारण

  • गटाचे अध्यक्ष सूर्यवंशी म्हणाले की, गटातील शेतकऱ्यांना वांग्याचे एकरी ३५ ते ४० टनांच्या दरम्यान उत्पादन मिळाले. दर प्रति किलो १८ ते २३ रुपये या दरम्यान राहिला. काही प्रसंगी तो कमाल ३५ रुपयेदेखील मिळाला. उत्पादन खर्च एकरी किमान अडीच लाख रुपयांपुढे आला.
  • आमच्या हाती एकरी सुमारे सहा लाख रुपयांचे उत्पन्न आले. गटशेतीतील सर्वांचे मिळून उत्पादन पाहायचे झाल्यास ते अडीच टनांच्या आसपास असावे. शेडनेट उभारणीसाठी सुमारे १२ लाख रुपयांचे
  • भांडवल लागले. त्यातील आठ लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळाले. यापूर्वी ढोबळी मिरची परवडली.
  • काकडीला यंदा दर कमी मिळाले. मात्र भरीताच्या वांग्याने आश्वासक उत्पन्न दिल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. या गटाकडे पूर्वी केवळ नऊ सभासद होते. परंतु एकमेकांची प्रेरणा मिळू लागल्याने शेतीत सुधारणा होत सभासदांची संख्या वाढत गेली. आज ती २० पर्यंत वाढली आहे. दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे.
  • गट असल्याने प्रोत्साहन सूर्यवंशी म्हणाले की, एकत्रित आल्याने विक्री व्यवस्था सोपी झाली आहे. एकट्या दुकट्या शेतकऱ्याला ही गोष्ट तेवढ्या तुलनेने शक्य झाली नसती. शिवाय एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण ही जमेची मुख्य बाब असल्याचे सूर्यवंशी म्हणाले. एकत्रित खरेदी व एकत्रित विक्री हे या गटाचे वैशिष्ट्य आहे. आता गटातील शेतकऱ्यांकडे शेडनेट क्षेत्र सुमारे ३० एकरांपर्यंत झाले आहे. संपर्क -माधव सूर्यवंशी- ९७६५३८६८६९ (लेखक नांदेडचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com