स्टार्च शिजवण्यासह खाण्याचे पहिले पुरावे आढळले

स्टार्च शिजवण्यासह खाण्याचे पहिले पुरावे आढळले
स्टार्च शिजवण्यासह खाण्याचे पहिले पुरावे आढळले

दक्षिण आफ्रिकेतील क्लासीज नदी परिसरातील गुहांमध्ये जळलेल्या अन्नांचे नमुने संशोधकांना मिळाले असून, हा वनस्पतीजन्य स्टार्च भाजणे आणि खाण्यासंदर्भातील पहिला पुरावा मानण्यात येत आहे. याचा कालावधी १.२० लाख वर्षांपूर्वीचा असून, या काळात माणूस कंदमुळे भाजून, त्याचे स्टार्च खात असल्याचे दिसून आले आहे. हे आंतरराष्ट्रीय पुरातत्त्व शास्त्रज्ञांचे संशोधन जर्नल ऑफ ह्युमन इव्हॅल्युएशनमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. मानवामध्ये स्टार्च पचवणाऱ्या जनुकांचे गुणन हे पुढे आहारामध्ये स्टार्चचे प्रमाण वाढल्याने झाल्याचे एक गृहितक मांडले जात होते. मात्र, त्यासाठी कोणताही पुरावा उपलब्ध होत नव्हता. मात्र, दक्षिण आफ्रिकेतील क्लासीज नदी परिसरातील गुहांमध्ये आंतरराष्ट्रीय पुरातत्त्व शास्त्रज्ञांसह आंतरशाखीय संशोधकांच्या गटाने उत्खनन केले. या उत्खननामध्ये कंदमुळे आणि अन्य घटक भाजून त्यापासून तयार खाद्यपदार्थांचे जळलेले अवशेष मिळाले आहेत. या विषयी माहिती देताना केम्ब्रिज विद्यापीठातील पुरातत्त्व विभागातील संशोधिका सिंथिया लार्बे यांनी सांगितले, की सुरवातीच्या काळामध्ये माणूस हा स्टार्चयुक्त आहार घेत असल्याचे प्रथमच समोर आले आहे. हे पुरावे जनुकीय आणि जैविकदृष्ट्या महत्त्वाचे आहेत. मध्य अश्मयुगातील समुदायांमध्ये वनस्पती आणि अग्नी यांची भूमिका शोधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. १.२० लाख ते ६५ हजार वर्षांपूर्वीच्या काळामध्ये दक्षिण आफ्रिकेतील या प्रदेशातील मानवाच्या आहारामध्ये विविध पदार्थांचा समावेश दिसून येतो. त्यामध्ये शिजवलेले अन्न आणि स्टार्च असलेली मुळे आणि कंद यांचाही समावेश आहे. या काळामध्ये दगडाच्या अवजारांमुळे शिकारीच्या पद्धतीमध्ये बदल झाला असला तरी ते मुळे आणि कंद शिजवत असल्याचे दिसून येते. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील पुरातत्त्व आणि पर्यावरणशास्त्र अभ्यास यातील प्रो. साराह वुर्झ यांनी सांगितले, की सुरवातीच्या काळामध्ये मानव जमात ही संतुलित आहार घेत होती. या लोकांनी अत्यंत हुशारीने पर्यावरणाच्या सहकार्याने योग्य त्या अन्न आणि औषधांचा वापर सुरू केला होता. आहारामध्ये शिजवलेल्या मुळे आणि कंदासोबत शेलफिश, मासे आणि लहान मोठ्या वनस्पती यातून प्रथिने आणि मेद यांची गरज भागवली जात होती. या समुदायांनी १.२० लाख वर्षांपूर्वी दाखवलेली पर्यावरणविषयी बुद्धिमत्ता ही अचंबित करणारी आहे. लार्बे म्हणाल्या की, यातून एक महत्त्वाची बाब पुढे येते ती म्हणजे शेती सुरू झाल्यानंतर स्टार्चयुक्त आहाराचा वापर सुरू झाल्याचे गृहितक मागे पडते. स्टार्चचा वापर मानवाच्या इतिहासामध्ये आणखी मागे जातो. गेल्या १० हजार वर्षांपूर्वी आफ्रिकेमध्ये शेतीला सुरवात झाली आहे. त्याच्या कितीतरी आधी मानवाचा आहार वनस्पतीच्या साह्याने संतुलित करण्याचा प्रयत्न यातून दिसून येतो. संशोधनातील महत्त्वाचे...

  • पुरातत्त्व संशोधनाच्या दृष्टीने क्लासीज नदीचा परिसर अत्यंत महत्त्वाचा असून, दक्षिण आफ्रिकेतील या भागामध्ये मानवी प्रजाती लहान लहान समूहामध्ये राहत होत्या. क्लासीज नदीच्या परिसरातील काही मानवी सांगाडे व अवशेषांचा कालावधी कार्बन डेटींगद्वारे १.२० लाख वर्षापर्यंत मागे जातो. हे मानव आजच्या आधुनिक मानवाप्रमाणेच दिसत असल्याचे एकंदरीत सांगाड्यांच्या आकारावरून दिसून येते. येथे वुर्झ आणि सुसान मेन्टझर यांना अर्धा फूट व्यासाचे हर्थ आढळले आहेत. या हर्थमध्ये असलेले वनस्पतींचे अवशेष जळालेल्या स्वरूपामध्ये आढळले आहेत.
  • प्रथम १९९० मध्ये प्रो. हिलरी डेकॉन यांनी या जागेवर उत्खननाला सुरवात केली होती. या उत्खननामध्ये त्यांनी वनस्पतीजन्य घटक आणि भोवतातील असलेले हर्थ याकडे निर्देश केला होता. त्या काळामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या अभावामुळे केवळ गृहितके मांडण्यात आली होती. आताच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रत्येक घटकांचा कालावधी निश्चित करणे शक्य झाले.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com