मासे ओळखू शकतात आरशातील आपली प्रतिमा

मासे ओळखू शकतात आरशातील आपली प्रतिमा
मासे ओळखू शकतात आरशातील आपली प्रतिमा

आरशातील आपली प्रतिमा न्याहाळण्याचे कौतुक केवळ मानवामध्येच नाही, तर अन्य बुद्धिमान मानल्या जाणाऱ्या सजीवांमध्येही दिसून येते. आरशातील आपली प्रतिमा ओळखण्याची क्षमता माशांमध्ये असल्याचे संशोधनात आढळले आहे. या गोष्टीवरून माशांच्या बुद्धिमत्तेविषयी मानवाला अनेक गोष्टी अद्याप ज्ञात नसल्याची बाब स्पष्ट झाली आहे. आरशातील आपली प्रतिमा ओळखणे ही बाब मानसशास्त्र किंवा बुद्धिमत्तेच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ती स्वतःविषयी जाणीव असल्याची खूण मानतात. यामुळे १९७० मध्ये मानसशास्त्रज्ञ गोर्डन गॅल्लप ज्यू. यांनी विकसित केलेली आरसा चाचणी ही वर्तणूकशास्त्रात महत्त्वाची ठरते. प्राण्यांसमोर त्याची प्रतिकृती ठेवून याबाबत पहिली चाचणी घेतली जाते. त्याच्या प्रतिसादानुसार आरशासमोर चाचणी घेतात. जे काही प्राणी ही चाचणी उत्तीर्ण होतात, त्यांची गणना हुशार या सदरात होते. उदा. माकडांमध्ये चिंपाझी, बोनोबो आणि डॉल्फिन, हत्ती इ. पक्ष्यांमध्ये कबुतरांनंतर मॅगपीज या एका पक्ष्याने नुकतीच ही चाचणी उत्तीर्ण केली आहे. काही मुंग्या या चाचणीतून पुढे जात असल्या तरी माशांच्या क्लिनर व्रॅस्से (शा. नाव - Labroides dimidiatus) या प्रजातीने हे आव्हान पार केले आहे. या माशांनी प्रतिमेकडे पाहून शरीरावरील खूणा साफ करण्याचा प्रयत्न चाचणीमध्ये केला. ही बाब २०१८ मध्ये आढळली असली तरी अधिक अभ्यासानंतर आता सिद्ध करण्यात आली आहे. याविषयी माहिती देताना संशोधक डॉ. अलेक्स जॉर्डन यांनी सांगितले, की माशांच्या वर्तनामध्ये आम्हाला ही बाब प्रथम आढळल्यानंतर किचिंत शंका होती. त्यामुळे अधिक चाचण्या घेत खात्री करण्यात आली. अर्थात, केवळ यावरून माशांमध्ये स्वतःविषयी काही जाणीव असल्याचा निष्कर्ष घाईने काढता येणार नाही. त्यासाठी त्यांना अन्य प्राण्यांप्रमाणे अधिक चाचण्या पार कराव्या लागतील. हे संशोधन ‘प्लॉस बायोलॉजी’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com