नत्राच्या कार्यक्षम वापरासाठी सेन्सरचा वापर शक्य

नत्राच्या कार्यक्षम वापरासाठी सेन्सरचा वापर शक्य
नत्राच्या कार्यक्षम वापरासाठी सेन्सरचा वापर शक्य

कृषी क्षेत्रातून होणाऱ्या नत्रांच्या प्रदूषणाची समस्येवर तीव्रतेने बोलले जात असून, यावर मार्ग काढण्याचे प्रयत्न जागतिक पातळीवर सुरू आहेत. मिन्निसोटा विद्यापीठातील संशोधकांनी कृषी क्षेत्रातील नत्राचे व्यवस्थापन करण्याचा आणि त्याचे पर्यावरणावरील विपरीत परिणाम कमी करण्याचा कार्यक्षम व पर्यावरणपूरक मार्ग शोधला आहे. पिकाच्या कॅनोपितून परावर्तित होणाऱ्या प्रकाशाचे ग्रहण आणि त्याचे विश्लेषण करणाऱ्या सेन्सर व संगणकीय प्रणालीचा त्यासाठी वापर केला आहे. ही पद्धत अन्य पद्धतींच्या तुलनेमध्ये अधिक कार्यक्षम असल्याचा दावा त्यांनी केला आहे. कोणत्याही चांगल्या गोष्टीचा अतिरेक हा वाईटाकडे नेणारा असतो. हीच बाब नत्रयुक्त खतांच्या बाबतीमध्ये कृषिक्षेत्रात दिसून येत आहे. या खतांच्या वापरामुळे पिकांच्या उत्पादनामध्ये चांगली वाढ मिळते. त्याशिवाय पिकांचे उत्पादन घटण्याचा धोका आहे. अशा स्थितीमध्ये नत्राचा अतिरिक्त किंवा शिफारशीपेक्षा अधिक वापर होत गेला. अतिरिक्त नत्राचे रूपांतक सूक्ष्मजीव नायट्रस ऑक्साईड या हरितगृह वायूमध्ये करतात. त्याचप्रमाणे वाहत्या पाण्याद्वारे वाहून पाण्याच्या स्रोतामध्ये प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. मिन्निसोटा विद्यापीठातील कृषिशास्त्रज्ञ युक्सिन मियावो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नत्राच्या कृषिक्षेत्रातील कार्यक्षम वापराच्या अनुषंगाने संशोधन केले आहे. त्यांनी त्यासाठी विविध पद्धतींचा तुलनात्मक अभ्यास केला असून, त्यात त्यांना सेन्सर आधारित नत्राचे व्यवस्थापन ही पद्धती पिकांच्या आरोग्याच्या निरीक्षणासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे दिसून आले. याविषयी माहिती देताना युक्सिन मियावो यांनी सांगितले, की नत्राचे व्यवस्थापन हा अन्नसुरक्षिततेच्या दृष्टीने, त्याचवेळी प्रदूषण आणि वातावरणातील बदल रोखण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. आम्ही पिकांच्या पानांपासून परावर्तित होणाऱ्या विविध तरंगलांबीच्या प्रकाशकिरणांचे मोजमाप करण्यासाठी सेन्सरचा वापर केला आहे. त्यातून पिकांचे आरोग्य चांगले ठेवण्यासोबतच अतिरिक्त खतांचा वापर कमी करता येऊ शकेल. सोपी, सुलभ आणि कार्यक्षम पद्धती ः पिकामध्ये लावलेल्या सेन्सरच्या साह्याने संगणकीय प्रणाली पिकासाठी आवश्यक तेवढ्या नत्राचे प्रमाण काढू शकेल. त्यातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना नत्रयुक्त खतांचा वापर करता येईल. त्यामुळे अतिरिक्त नत्र देणे टाळता आल्याने खतांवरील खर्चात बचत होण्यासोबतच पर्यावरणाच्या संरक्षणास मदत होईल. या पद्धतीचे अन्यही अनेक फायदे आहेत.

  • कॅनोपीमध्ये वापरलेले सेन्सर हा वेगवान असून, त्यापासून अन्य कोणताही त्रास होत नाही.
  • यासाठी सुरवातीला सेन्सरच्या खरेदीसाठी एकदाच खर्च करावा लागतो. त्याशिवाय पुढे कोणताही खर्च नाही.
  • अत्याधुनिक प्रकारच्या सेन्सर्सवर पर्यावरणातील अन्य प्रकाशाचा परिणाम होत नाही. त्यामुळे वातावरण ढगाळ, निरभ्र किंवा पावसाळी असले तरी चांगल्याप्रकारे काम करतात.
  • असे झाले संशोधन - मियाओ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २००८ ते २०१२ या काळात उत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील प्रक्षेत्रामध्ये नत्राच्या व्यवस्थापनाच्या विविध पद्धतीच्या चाचण्या घेतल्या. त्यांनी हिवाळी गहू आणि उन्हाळ्यामध्ये मका अशा पीक पद्धतीमध्ये चाचण्या घेतल्या. यातील काही पद्धतीद्वारे खतांचा वापर कमी झाला असला तरी त्याचे दुष्परिणाम पिकांच्या वाढीवर दिसून आले. एका पद्धतीमध्ये मातीच्या तपासणीतून नत्राचे प्रमाण मिळण्यात आले होते. मात्र, ही पद्धत मजूर, वेळ आणि खर्च या दृष्टीने योग्य ठरत नसल्याचे मियावो यांनी सांगितले.

  • काही पद्धती सध्याच्या पद्धतीच्या तुलनेमध्ये पिकाच्या उच्च उत्पादन वाढीसाठी अधिक योग्य आहे.
  • या पद्धतीमध्ये आणखी सुधारणा करण्याच्या दृष्टीने मियावो प्रयत्न करीत आहेत.
  • ही पद्धती विविध देशांमध्ये वापरणे शक्य आहे. विकसनशील देशांना याचा फायदा होण्यासाठी शेतकरी, संशोधक आणि सेवा पुरवठादार यांनी एकत्र येण्याची गरज आहे.
  • मियावो यांनी अमेरिकन सोसायटी ऑफ अॅग्रोनॉमी आणि क्रॉप सायन्स सोसायटी ऑफ अमेरिका यांच्या नोव्हेंबर २०१८ मध्ये बाल्टीमोर येथील परिषदेमध्ये या संशोधनाचे निष्कर्ष मांडले होते.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com