agricultural stories in Marathi, agrowon, Aasood - model of water distribution | Agrowon

आसूद : पाणी वितरणाचे अनोखे मॉडेल
अमित गद्रे
सोमवार, 22 एप्रिल 2019

रत्नागिरी जिल्ह्यात दापोली-हर्णे रस्त्यावर दोन डोंगररांगांमध्ये सुपारी, नारळाच्या झावळ्यांत लपलेलं निसर्गरम्य आसूद गाव. सुपारी बागांतून जाणारे चिऱ्याचे रस्ते तसेच केशवराज देवस्थानामुळे पर्यटकांची पावले आपोआप या गावाकडे वळतातच. कोणतीही शासकीय मदत न घेता, एकमेकांच्या विश्‍वासावर नैसर्गिक पद्धतीने पाटपाणी वाटपाची प्रणाली येथील शेतकऱ्यांनी साधली. दीडशे वर्षांपासून लोकसहभागातून पाणीवाटपाची ही अनोखी पद्धत आजही अखंडपणे सुरू आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात दापोली-हर्णे रस्त्यावर दोन डोंगररांगांमध्ये सुपारी, नारळाच्या झावळ्यांत लपलेलं निसर्गरम्य आसूद गाव. सुपारी बागांतून जाणारे चिऱ्याचे रस्ते तसेच केशवराज देवस्थानामुळे पर्यटकांची पावले आपोआप या गावाकडे वळतातच. कोणतीही शासकीय मदत न घेता, एकमेकांच्या विश्‍वासावर नैसर्गिक पद्धतीने पाटपाणी वाटपाची प्रणाली येथील शेतकऱ्यांनी साधली. दीडशे वर्षांपासून लोकसहभागातून पाणीवाटपाची ही अनोखी पद्धत आजही अखंडपणे सुरू आहे.

को कण म्हटलं की डोळ्यासमोर येतात नारळ, सुपारीच्या बागा आणि जांभा दगडात बांधलेली घरं. घरासमोर अंगण, त्यात वाळवण किंवा सुपारी पसरलेली...दापोली(जि. रत्नागिरी)पासून सुमारे सहा किलोमीटवर घाटरस्त्याच्या उजव्या बाजूस असलेल्या डोंगर उतारावर सुपारी बागा दिसायला सुरू झाल्या की ओळखायचं आसूद गाव आलं. केशवराज मंदिराकडे जाणारी पाटी थेट गावात घेऊन जाते. डोंगर उतारावर सुपारी बागा मध्येच एखादा नारळ आणि बागेतून जाणारी चिऱ्यांची वाट. या वाटेच्या शेजारील पाटातून वाहणारे स्वच्छ पाणी सुपारीच्या बागेत सोडलेले दिसते. ही आहे पाट पद्धतीने पाणीवाटपाची पद्धत. पण त्याला चक्क दीडशे वर्षांचा इतिहास आहे. डोंगर माथ्यापासून ते अगदी ३०० मीटर तळाला असलेल्या सुपारी बागेच्या शेवटच्या टोकापर्यंत असलेल्या पाटातून हे पाणी नैसर्गिक उतार, साधन सामग्री आणि गावकऱ्यांच्या कल्पकतेने बांधापर्यंत पोचले आहे. विशेष म्हणजे शासनाचे कोणतेही अनुदान किंवा पाठबळ या पाणीवाटप व्यवस्थेला नाही. केवळ आहे गावकऱ्यांचा एकमेकांवरील विश्वास आणि मिनिटांच्या नियोजनावरील विनातक्रारीची पाणीवाटप प्रणाली.

पूर्वजांची दूरदृष्टी  
आसूद हे सुपारीचे आगर. काही प्रमाणात नारळ, आंबा कलमे दिसतात. वरकस जमिनीत भात, नाचणीची लागवड. सुमारे पन्नास शेतकऱ्यांचे मिळून तीस हेक्टर सुपारीचे क्षेत्र. दापोली कृषी महाविद्यालयातील निवृत्त मृदा शास्त्रज्ञ दिलीप जगन्नाथ दाबके गावातील प्रयोगशील शेतकरीदेखील आहेत. गावाने उभारलेल्या पाणीवाटप पद्धतीबाबत दाबके म्हणाले की, इथली जमीन मुरमाड, कमी गाळाची आहे. दीडशे वर्षांपूर्वी पूर्वजांनी डोंगर उताराची जमीन लागवडीखाली आणण्यासाठी बांध घालून मजगे तयार केले. त्यात बाहेरून माती भरून सुपारी लागवड केली. डोंगर उतारावरून गावात उतरणाऱ्या अनामिका नदीवर पूर्वजांनी मातीचा बंधारा घातला. त्याच्या एका बाजूने दगड, मातीच्या साहाय्याने पाट काढून पाणी नैसर्गिक उताराचा फायदा घेत संपूर्ण तीस हेक्टर सुपारी लागवडीच्या बागांमधून फिरवले. डोंगर माथा ते खाली बागेतील पायथ्यापर्यंतची खोली सुमारे ३०० फूट आहे. या पाणीवाटप पद्धतीचे व्यवस्थापन करणारी आमची तेरावी पिढी असल्याचे दाबके यांनी सांगितले.

पाटाच्या रचनेत सुधारणा
डोंगर उतार आणि जोराचा पाऊस यामुळे दरवर्षी बंधारा वाहून जायचा. पाटाचे दगड, माती निसटायची. त्याची सातत्याने दुरुस्ती करायला लागायची. हे लक्षात घेऊन गावकऱ्यांनी चाळीस वर्षांपूर्वी त्यातही सुधारणा केली. दाबके म्हणाले की डोंगरावरील नदीवर सिमेंटचा बंधारा बांधला. दगड, मातीचे कच्चे पाट जांभा दगडाचा वापर करून काम पक्के केले. पुढे असे लक्षात आले की पाण्याच्या वेगाने जांभा दगड झिजतो. मग पाच वर्षांपूर्वी पाटाच्या तळाशी कडाप्पा दगडाचा वापर केला. त्यामुळे पाटाची मोडतोड होत नाही, पाणी वाया जात नाही. दरवर्षी २०० मीटर नव्याने पाट करण्याचे काम होते.  

पाणीवाटपाची अनोखी पद्धत
पाटपाणीवाटप प्रणालीअंतर्गत डोंगर उतारावरील सुमारे तीस हेक्टर क्षेत्र भिजते. सर्वांना पुरेसे पाणी मिळावे यासाठी सात दिवसांत प्रत्येक शेतकऱ्याच्या लागवड क्षेत्राचे गुंठ्यानुसार वर्गीकरण केले. दाबके म्हणाले की, पूर्वी पाणीवाटपाचे गणित घटिका आणि पळे या पारंपरिक सूत्रावर होते. आता घड्याळातील वेळेनुसार आज सकाळी सहा ते उद्या सकाळी सहा (२४ तास) असा संबंधित क्षेत्रासाठी पाणीवाटपाचा कालावधी असतो. संबंधित क्षेत्र आणि आठवड्यातील वारानुसार सर्वांना आपापल्या लागवड क्षेत्रानुसार पाणी मिळते.

विश्‍वासावर चालणारी पद्धत
समजा एका शेतकऱ्याला त्याच्या सुपारी लागवड क्षेत्रानुसार एक तास पाणी मिळाले, तो त्याच्या बागेत पाटाचे पाणी वळवून घेण्यासाठी ठरलेल्या वेळेच्या पाच मिनिटे आधी बागेतून जाणाऱ्या पाटापाशी उपस्थित राहतो. वेळ झाली की तो त्याच्या आधीच्या शेतकऱ्याच्या बागेतील पाट बंद करून आपल्या बागेत पाणी फिरवून घेतो. पुढील शेतकरीही असाच ठरलेल्या वेळी पाच मिनिटे हजर राहून आपल्या बागेत पाणी घेतो. एकमेकांच्या विश्वासावर चालणारी ही पद्धत १५० वर्षांपासूनची सुरू आहे.

पाणी, वेळ व क्षेत्र यांचे बसविले गणित
दाबके म्हणाले की, माझी ३१ गुंठे सुपारी बाग आहे. मला दर
गुरुवारी (साडेचार तास) आणि शनिवारी (दीड तास) पाणी मिळते. गुरुवारी पाणी मिळणारे खातेदार, त्यांचे क्षेत्र आणि सकाळी सहा ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा या (२४ तास) वेळात त्या विभागातील खातेदाराचे संपूर्ण क्षेत्र भिजण्यासाठी किती वेळ लागेल याचे गणित काढले आहे. गावातील संपूर्ण क्षेत्र भिजण्यासाठी सोमवार ते रविवार असे पाणीवाटपाचे गणित आम्ही बसविले.
साधारणपणे २४ तासांत साडेतीन ते चार हेक्टर क्षेत्र पाटपाण्याने भिजते. संबंधित क्षेत्रातील शेतकरी त्याच्या वेळेनुसारच पाटपाणी आपल्या बागेत फिरवून घेतो. रात्रीच्या वेळी बागेला पाणी देण्यासाठी काही शेतकऱ्यांनी पाटकऱ्याची नेमणूक केली आहे. प्रत्येक शेतकऱ्याला महिन्यातून चार वेळा पाण्याचा फेर येतो. यात दोन वेळा दिवसा तर दोन वेळा रात्री पाणी मिळते.

मिनिटावर पाणीपट्टी
डोंगर उतारावरील पाट, मुसळधार पावसामुळे दरवर्षी बंधारा आणि पाटातील गाळ काढणे किंवा किरकोळ दुरुस्ती करावी लागते. यासाठी शेतकरी गटाने दुरुस्तीसाठी पैसे जमा करण्यासाठी अनोखी पद्धत वापरली आहे. मिनिटाला दहा रुपये या पद्धतीने पाणीवाटपाची पट्टी जमा केली जाते. बागांना १५ ऑक्टोबरनंतर पाट पाणी देण्यास सुरवात होते. हे वाटप १५ जूनपर्यंत चालते. दरवर्षी ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये पाणी सुरू करण्याआधी सर्व खातेदारांच्या घरी जाऊन वही फिरवितो. त्यात लागवड क्षेत्र, पाण्याची गरज, पाणी देण्यासाठी लागणारा मिनिटांमध्ये वेळ आणि त्यानुसार नऊ महिन्यांची होणारी पाणीपट्टी नोंदवून घेतो. संबंधित शेतकरी हिशेब करून पाणीपट्टी जमा करतो. बागांची नोंदणी आणि पैशाच्या हिशेबाच्या कामाची जबाबदारी दरवर्षी एका शेतकऱ्याकडे असते. प्रत्येक वाडीनुसार दरवर्षी हा सालदार बदलतो. प्रत्येक शेतकऱ्याला या प्रणाली व्यवस्थापन कामाची माहिती होते.

शिल्लक रकमेतून कामे
पूर्वी बागेला पाणी देण्याच्या वेळेनुसार मिनिटाला एक रुपया अशी पाणीपट्टी होती. आता ती प्रति मिनीट दहा रुपये आहे. मला ३१ गुंठ्यासाठी नऊ महिन्यांच्या हिशेबाने ३,४५० रुपये पाणीपट्टी येते. अशा पद्धतीने पन्नास शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी सालदाराकडे जमा होते. दरवर्षी त्यातून सत्तर हजार रुपये जमा होतात. त्यातून १० हजार रुपये शिल्लक राहतात. त्यातून बंधाऱ्याची दुरुस्ती, गाळ काढणे, फुटलेले पाट नव्याने बांधणे, सिमेंट लावणे, पाटात आलेली माती, दगड काढणे, पाटातील गवत साफ करणे, पाटात नव्याने कड्डपा लावणे ही कामे होतात. गावकऱ्यांनी डोंगर आणि गाव परिसरातील वनसंपदा जपली आहे. त्यामुळे डोंगरातील झरे जिवंत राहिले आहेत.

सुपारीचे गाव 'आसूद'

 • वाण : आसूद लोकल
 • हंगाम : १५ ऑक्टोबर ते मार्च.
 • प्रति झाड उत्पादन ः
 •   झाडाच्या वयानुसार अर्धा किलो ते दहा किलो प्रति वर्ष.
 •   पहिली पाच वर्षे बागेतील रोपवाटिकेत संगोपन करतात. मग रोपांची पुनर्लागवड. पाच वर्षांनी उत्पादन सुरू.
 •   दहाव्या वर्षी अर्धा किलो उत्पादन. झाडाचे वय, व्यवस्थापनानुसार दरवर्षी पाव किलो पटीत उत्पादनात वाढ.
 •   वीस वर्षांच्या झाडापासून ओल्या सुपारीचे सहा किलो उत्पादन. त्यातून ३० टक्के वाळलेल्या सुपारीचा उतारा.

प्रतवारी :
१) झिनी (लहान सुपारी), २) वच्छरास ३) सुपारी ४) मोहरा ५) फटोड ( सुपारी चांगली, थोडी तडकलेली), ६) खोका (कोवळी सुपारी)
  मुंबई बाजारपेठेतील सरासरी दर (प्रति २० किलो) (सोललेली सुपारी)
१) झिनी- १८०० रु.  २) मोहरा- ३५०० ते ४००० रु. ३) गावपातळीवरील असोली सुपारी (टरफलासहीत) दर- (२६ किलो)- २८०० ते ३००० रु.
  स्थानिक व्यापारी दर ठरवून खरेदी करतात. काही व्यापारी खरेदीपूर्वी आगाऊ रक्कम देतात.

पाटपाणी प्रणालीची वैशिष्ट्ये

 •   पूर्णपणे नैसर्गिक उताराचा फायदा घेत पाटाने पाणी वितरणाची पद्धत. बंधाऱ्यापासून ते गावातील शेवटच्या बागेत पाणी पोचते. या पद्धतीला विजेची गरज नाही.
 •   बंधाऱ्याची सोय आणि काटेकोर पाणी वापरण्याच्या पद्धतीमुळे वर्षभर २४ तास संपूर्ण सुपारी बागायतीला पाणीपुरवठा.
 •   लोकसहभागातून पाणीवाटप. अजूनपर्यंत सरकारी मदत घेतलेली नाही.
 •   शेतकऱ्यांनी दगडी पाट ठेवले आहेत. कारण दरवर्षी स्वच्छता सोपी होते. पीव्हीसी पाइप वापरले असते तर दर पावसात गाळ, पालापाचोळा अडकून, बंद पडून पाणी वाया गेले असते.
 •   बागेतील जमीन हलकी, रेताड. त्यामुळे पाणी मुरून पुन्हा नदीपात्रात प्रवाहीत होते. आसूद बागेखाली जोशी अळी, बिवलकर वाडी, बांद्रे वाडी याद्वारे अनामिका नदी पुढे जाते. या वाडीतील शेतकऱ्यांनीही आसूदप्रमाणेची पाटपाणी वापराची पद्धत अवलंबली आहे.

माझी आसूद बाग शिवारात तीन ठिकाणी सुपारी लागवड आहे. यात ११ गुंठ्याला एक तास, १५ गुंठ्याला पावणेदोन तास आणि २८ गुंठ्याला एक तास पाणी मिळते. मला २,२५० रुपये पाणीपट्टी येते. वर्षभराच्या नियोजनानुसार पुरेसे पाणी मिळते. परंपरेने चालत आलेली, विना वीज वापराची पाणी वाटपाची पद्धत पुढेही सुरू ठेवणार आहोत.
- राजेंद्र देपोलकर

 दिलीप दाबके  : ९४२१८०९७२५

 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
कान्हूरपठार, करंदी परिसरात वादळी वा-...टाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः पारनेर...
वर्धा : रोजगारासाठी स्थलांतरामुळे गावं...वर्धा : शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून...
गावाेगावी पाण्याच्या टॅंकरकडं नजरानगरः तलाव, धरणं कोरडी पडली. कधीच आटल्या नाहीत,...
दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची माहिती...मुंबई : दुष्काळासंदर्भात उत्तर देण्यासाठी...
सत्तर कारखान्यांना बजावली 'आरआरसी'पुणे : राज्यातील १९५ साखर कारखान्यांकडून...
सेवानिवृत्तीनंतर शिक्षकाची शेतीत सेवा...आयुष्यभर नोकरी करताना अनेक गोष्टींचा त्याग करावा...
पतआराखड्याची वाट न बघता खरिपासाठी कर्जपुणे : खरीप पीक कर्जवाटप नियोजनात मुख्य भूमिका...
गिलक्‍याने दिले अर्थकारणाला बळबाजारपेठेची गरज ओळखून कठोरा (ता. जि. जळगाव) येथील...
जरंडीत ‘एक गाव, एक वाण’ योजना फसलीनागपूर ः कापसाचे एक गाव एक वाण लावण्याचा आदर्श...
उन्हाचा चटका कायम राहणार पुणे : विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी...
आया मौसम बदली कामार्च ते मे हे तीन महिने शासकीय अधिकारी-...
आगीपासून वन वाचविण्याचा करूया निर्धारजंगलातील वाळलेला पालापाचोळा हा ज्वलनशील पदार्थ...
उद्योगाला साखर कडूचमहाराष्ट्रातील गळीत हंगामाची सांगता नुकतीच झाली...
‘एफआरपी'साठी शेतकरी संघटना पुन्हा...सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या...
विदर्भात उत्कृष्ट व्यवस्थापन असलेली २३...वर्धा जिल्ह्यात केळी पिकाला पुन्हा गतवैभव प्राप्त...
भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांची पुनर्वसन...पुणे : भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांसाठी पुनर्वसनाची...
वर्षभरात पाच हंगामात दर्जेदार कोथिंबीरपाणी व हवामान यांचा विचार करून वर्षभरात सुमारे...
राज्यात आता पीकविमा शेतकरी सहभाग अभियानपुणे: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी यंदा...
छावण्यातील जनावरांची आठवड्यातून एकदा...मुंबई ः दुष्काळी भागातील चारा छावण्यांमधील...
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला मागणीकोल्हापूर: निर्यातीच्या बाबतीत पिछाडलेल्या...