नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम
संपादकीय
लष्करी अळीचा प्रवेश राज्यात झालेला असताना आता तिचा प्रसार इतर जिल्ह्यांत होणार नाही, ही खबरदारी घ्यावी लागेल.
हवामान बदलाचा हा काळ आहे. या काळात पिकांवर रोग-किडींचा प्रादुर्भाव प्रचंड वाढतोय. अनेक दुय्यम समजल्या जाणाऱ्या किडीसुद्धा अधिक नुकसानकारक ठरत आहेत. मुख्य किडी तर कीडनाशकांना प्रतिकारक होऊन त्यांचे नियंत्रण फारच कठीण होत चालले आहे. अशा परिस्थितीमध्ये जगभरात अत्यंत घातक समजल्या जाणाऱ्या ‘अमेरिकन लष्करी अळी’ या नव्या किडीने आपल्या देशात नव्हे तर आता राज्यातही प्रवेश केला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या मका पिकावरील प्रादुर्भावानंतर फॉल आर्मी वर्म नावाने ओळखल्या जाणाऱ्या लष्करी अळीची डीएनए सिक्वेंसिंग तंत्राद्वारे ओळख पटली आहे. ही कीड २०१६ मध्ये आफ्रिकेतील नायजेरिया या देशात प्रथम आढळून आली. आफ्रिका खंडात या किडीने कहर केल्यानंतर आपला मोर्चा आशिया खंडाकडे वळविला आहे. आशिया खंडात सर्वप्रथम भारतातच ही कीड दाखल झाली. भारतातील कर्नाटक, तेलंगणापाठोपाठ आता आपल्या राज्यातसुद्धा ही कीड पोचली आहे. या किडीचा प्रसार एका देशातून दुसऱ्या देशात प्रामुख्याने आयात-निर्यातीतून होतो. याचा अर्थ आपल्या येथील क्वारंटाइन विभागाला या किडीच्या देशातील प्रवेश रोखण्यास अपयश आले आहे. आता राज्याराज्यांमध्येही लष्करी अळीचा प्रसार झपाट्याने होतोय. विशेष म्हणजे आफ्रिका, आशिया खंडांत या किडीचा झालेला उद्रेक आणि त्यातून होत असलेले नुकसान पाहता एफएओने भारतासह संपूर्ण आशिया खंडातील अन्नसुरक्षा धोक्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. असे असताना घातक अशा लष्करी अळीला आपण अजूनही गांभीर्याने घेत नाही, ही बाब दुर्दैवी म्हणावी लागेल.
लष्करी अळी ही बहुभक्षी कीड असून, या किडीचा प्रादुर्भाव मका, भात, ऊस, कापूस, ज्वारी, सोयाबीन, भुईमूग, स्वीटकॉर्न यांसह अनेक भाजीपाला पिकांवर होतो. या किडीचे प्रजनन आणि प्रसार अत्यंत झपाट्याने होतो. लष्करी अळी रात्रीच्या वेळी समूहाने पिकांवर हल्ला चढविते. काही वेळात पिकांचा फडशा पाडणे, हे या किडीचे वैशिष्ट्य आहे. दिवसा ही कीड जमिनीत लपून बसते. आपल्या राज्यात किडींच्या नियंत्रणासाठी प्रामुख्याने कीडनाशकांची फवारणी केली जाते. परंतु हा उपाय या किडीवर फारसा परिणामकारक असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे राज्यात या किडीचे नियंत्रण कठीण काम आहे. राज्याचा विचार करता जवळपास सर्वच प्रमुख पिकांवर या किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. राज्यातील बहुतांश शेतकरी अल्प-अत्यल्प भूधारक आहेत. अशा वेळी या किडीचा प्रादुर्भाव वाढला तर येथील शेतकऱ्यांची अन्नसुरक्षा तर धोक्यात येईलच, तसेच तो आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होईल. या किडीपासूनचे हे सर्व धोके पाहता तिचा प्रसार इतर जिल्ह्यात होणार नाही, ही खबरदारी घेणेच अधिक योग्य ठरेल. लष्करी अळीचा प्रसार रोखण्याबरोबर प्रभावी नियंत्रणासाठी चारही अवस्थांची ओळख शेतकऱ्यांना करून द्यायला हवी. प्रत्येक अवस्थेतील किडीचे एकात्मिक नियंत्रण कसे करायचे याबाबतचा अभ्यास कृषी विद्यापीठे, कृषी विभागाने एकत्र बसून करायला हवे. यातून पुढे आलेली माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचवावी लागेल. महत्त्वाचे म्हणजे या किडीच्या प्रतिबंध तसेच नियंत्रणासाठी आफ्रिकी देशांसह जगभर काय पावले उचलली गेली, तेही पाहावे लागतील. त्या तत्त्वांचा अवलंब आपल्या देशात, राज्यातही करावा लागेल. असे झाले तरच लष्करी अळीचा हमला आपण थांबवू शकू, हे लक्षात घ्यायला हवे.
- 1 of 38
- ››