इडा पिडा टळो

पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाची सावली गडद होत असली तरी सारेच काही अंधकारमय आहे, असेही नाही.
संपादकीय
संपादकीय

दिवाळीची धामधुम सर्वत्र चालू आहे. बळीच्या राज्यात प्रजा सुखाने नांदत असून वर्षातून एकदा बळीने पृथ्वीतलावर येऊन आपली प्रजा कशी सुखात आहे, हे पाहण्यास सांगितले. बळिराजा प्रतिपदेला येऊन प्रजा कशी आहे ते पाहतात, तो दिवस म्हणजे बलिप्रतिपदा. त्यामुळेच या दिवशी घरोघरी रोषणाई केली जाते, गोडधोड पदार्थ केले जातात. वास्तवात आज भारत दुष्काळाने तर इंडिया महागाईने होरपळत आहे. परिस्थिती कितीही अभावात्मक असली तरी दिवाळी साजरी करणे चुकत नाही. सुख-दुख, अडी-अडचणी, संकटे, पेच हे सर्व किमान पाच दिवस विसरून दिवाळी साजरी केली जाते. खरे तर ही सकारात्मक परंपराच आपल्याला पुढील संघर्षासाठी बळ देत आली आहे. राज्यात १५१ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

दुष्काळाची व्याप्ती आणि तीव्रता राज्य शासनाने खात्री केलेल्या परिस्थितीपेक्षाही भीषण आहे. त्यामुळेच प्रत्यक्ष दुष्काळाने पोळत असलेली; परंतु शासनाच्या दृष्टीस न पडलेली अनेक तालुके आंदोलन करीत आहेत. केवळ दुष्काळ घोषीत करून त्यासाठीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवून आपले काम संपले, असे राज्य शासनाने समजू नये. यापूर्वी अनेक वेळा राज्याचे दुष्काळाचे प्रस्ताव केंद्र शासनाने फेटाळले आहेत. आता तर दुष्काळाचे निकषही बदलले आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर राज्यात दुष्काळाची पाहणी करण्यासाठी येणाऱ्या केंद्र शासनाच्या पथकाला दुष्काळाची व्याप्ती आणि तीव्रता पटवून द्यावी लागेल. दुष्काळी उपाययोजनांसाठी पाठविलेल्या प्रस्तावाबाबतही योग्य तो पाठपुरावा करावा लागेल. दुष्काळ म्हणजे अत्यंत कठीण काळ, याचा अनुभव राज्यातील शेतकऱ्यांना मागील दुष्काळात आला आहे. दुष्काळात पाण्याच्या शोधात लोक सैरभैर होतात. गुरांना चारा-पाणी मिळत नसल्याने ती सोडून द्यावी लागतात. हंगामी पिके नाही तर अत्यंत कष्टाने जगविलेल्या फळांच्या बागाही वाळू लागतात. हाताला काम नसल्याने शेत-शिवार, वाड्या-वस्त्या रिकाम्या होऊन तेथे भयान शांतता पसरते. दिवाळीमध्ये ‘इडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे’ असे म्हणून ओवाळण्याची प्रथा आहे. सध्याच्या भीषण दुष्काळी परिस्थितीमध्ये अन्नपाण्याविना कोणीही दगावू नये, शेतकऱ्यांच्या बागा फळा-फुलांनी बहरल्या नाही तरी त्या टिकून राहाव्यात, गुरा-ढोरांना वेळेवर चारा-पाणी मिळावा, त्यांची आबाळ होऊ नये, एवढी माफक अपेक्षा राज्य शासनाकडून आहे.

दुष्काळासारख्या कठीण काळात सर्व काही शासनाच्या भरवशावरही सोडून चालणार नाही. पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाची सावली गडद होत असली तरी सारेच काही अंधकारमय आहे, असेही नाही. दुष्काळातही अत्यंत कमी पाण्यावर, अथवा केवळ उपलब्ध ओलाव्यावर तंत्र आणि प्रयत्नांच्या संयोगातून काही शेतात हिरवाई फुलत आहे. अशा उमेद वाढविणाऱ्या यशोगाथांकडे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी डोळसपणे पाहून त्याचे अनुकरण करायला हवे. असे झाले तर खऱ्या अर्थाने बळीचे राज्य राज्यात अवतरेल आणि बळिराजाला प्रजा (शेतकरी) सुखात असल्याचे समाधानही लाभेल.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com