दुष्काळाची चाहूल; जपून उचला पाऊल

दिवसा उन्हाच्या तीव्र झळा आणि रात्री थोडा थंडावा, तर अधूनमधून परतीच्या पावसाच्या सरी, असे ऑक्टोबर हीटचे विषम वातावरण शेतातील पिकांसह मानवी आरोग्यासाठीसुद्धा चांगले नाही.
संपादकीय
संपादकीय

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी राजस्थानमधील मुक्काम हलवून दोन दिवसांपूर्वीच परतीच्या प्रवासाला सुरवात केली आहे. मॉन्सूनचा परतीचा प्रवास सर्वसाधारणपणे १ सप्टेंबरला सुरू होतो. या वर्षी मात्र महिनाभराच्या उशिराने मॉन्सून माघारी फिरत आहे. परतीचा मॉन्सून महाराष्ट्रासह खासकरून दक्षिणेकडील राज्यांमध्ये पाऊस पाडतो. राज्यामध्ये सध्या कोकण, पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. विदर्भ, मराठवाड्यातील काही भागात चार दिवसांपूर्वी पाऊस पडून आता हवामान कोरडे झाले आहे. त्यामुळे तापमान वाढत आहे. अर्थात ऑक्टोबर हीटचा तडाखा राज्याला जाणवू लागला आहे. सप्टेंबरअखेर परतीच्या पावसास सुरवात झाल्यानंतर हवेत अचानक उष्मा वाढतो, त्यालाच ऑक्टोबर हीट म्हणतात. पाऊस कमी झाल्याने ही उष्णता वाढते. हवेतला दमटपणा कमी होतो आणि कोरडेपणा वाढतो. आकाश निरभ्र होते. त्यामुळे सूर्यकिरणांचा परिणाम अधिक जाणवून उकाडा वाढतो. नोव्हेंबरपासून सूर्य मकरवृत्ताकडे सरकू लागतो. त्यानंतर तापमान कमी होण्यास सुरवात होऊन थंडीची चाहूल लागते. दिवसा उन्हाच्या तीव्र झळा आणि रात्री थोडा थंडावा, तर अधूनमधून परतीच्या पावसाच्या सरी, असे ऑक्टोबर हीटचे विषम वातावरण शेतातील पिकांसह मानवी आरोग्यासाठीसुद्धा चांगले नाही. सर्दी, खोकला, पोटाचे विकार, ताप, डेंगीच्या साथीने ग्रामीण जनता त्रस्त आहे. तर दिवस रात्रीच्या विषम हवामानात पिकांवर रोग-किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच अचानक येणारा परतीचा पाऊस कापूस, तूर या पिकांबरोबर रब्बीसाठी चांगला असला, तरी खरिपातील काढणीला आलेल्या, काढणी चालू असलेल्या पिकांसाठी नुकसानकारकच ठरत आहे.

ऑक्टोबर महिना हा शेतीसाठी संक्रमणाचा काळ मानला जातो. खरीप हंगाम आटोपत असताना रब्बीला नुकतीच सुरवात झालेली असते. या काळात खरिपातील पिकांची काढणी, मळणी, विक्री करण्याबरोबर रब्बीची मशागत, पेरणी अशी शेतकऱ्यांची कामांची धावपळ असते. अशात हवामान बदलाने आजारपणाने ग्रासले म्हणजे एकंदरीतच कामाचा खोळंबा होतो. त्यामुळे या काळात आरोग्याची योग्य ती काळजी घेतलेलीच बरी! पिकांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास या वर्षीचे पाऊसमान हवामान विभागाने वर्तविलेल्या सर्वसामान्य अंदाजापेक्षा ९ टक्क्यांनी कमी राहिले आहे. त्याहून गंभीर बाब म्हणजे पावसाचे राज्यातील वितरण खूपच असमान आहे. दोन मोठे खंड तर अल्प काळात दोन वेळा झालेल्या अतिवृष्टिने खरीप हंगामाचे अधिक नुकसानच झाले आहे. पावसाच्या ओढीने रब्बी हंगामावरही संकटाचे ढग घोंघावत आहेत. अलीकडे हवामानाचे अल्पकालीन अंदाज बऱ्यापैकी खरे ठरत असताना दीर्घकालीन अंदाजात मात्र अजूनही अचूकता साधण्यात हवामान विभागाला यश आलेले दिसत नाही, ही बाब चिंताजनक म्हणावी लागेल. अपुऱ्या आणि अनियमित पावसाने राज्यातील बहुतांश भागातील भूजलपातळी खालीच आहे. धरणसाठ्यातही अपेक्षित प्रमाणात वाढ झालेली नाही. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी पट्ट्यात समाधानकारक पाऊस नसल्याने पाणीटंचाईच्या झळा वाढलेल्या आहेत. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतून तर आत्ताच दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. एकंदरीत सध्या ऑक्टोबर हीटमुळे वाढते तापमान आणि पुढील उन्हाळ्यासह एकूण नऊ महिन्यांच्या कालावधीत उद्योग, शेती आणि पिण्यासाठीसुद्धा पाण्याची मागणी वाढतच जाणार आहे. अशा वेळी शासन, प्रशासनाने पाण्याचे योग्य नियोजन केल्यास पुढे दुष्काळाचे फारसे चटके बसणार नाहीत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com