माॅन्सून येता घरा...

पावसाच्या पाण्यावर येणाऱ्या एकाद-दुसऱ्या पिकावर जिरायची शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो. एवढेच नव्हे, तर वर्षभरासाठीच्या घरखर्चाची तजवीजही यातूनच करावी लागते.
संपादकीय
संपादकीय

विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाचे थैमान सुरू आहे. हा पाऊस आंबा, केळी, संत्रा, मोसंबी आदी फळपिकांसाठी नुकसानकारकच ठरत आहे. पूर्वहंगामी पावसाच्या सरीने राज्यात अनेक भागांत नांगरून ठेवलेल्या जमिनीत तास काढण्याच्या कामाला (वखरपाळी) वेग आला आहे. अशातच एक शुभवार्तांकन म्हणजे मॉन्सूनच्या वाटचालीस सध्या पोषक वातावरण अाहे. त्यामुळे २९ मेपर्यंत म्हणजे आपल्या निश्चित वेळेच्या (१ जून) दोन दिवस अगोदरच मॉन्सून केरळमध्ये दाखल होणार, असे हवामान विभागातर्फे सांगण्यात आलेले आहे. भारतीय मॉन्सूनचे प्रवेशद्वार असलेल्या केरळात मॉन्सून दाखल होणे ही महत्त्वाची घटना मानली जाते. एकदा केरळात मॉन्सून आला, की त्याची पुढील वाटचाल ही निश्चित असते. केरळमध्ये दाखल झालेला मॉन्सून ८ ते १० दिवसांत महाराष्ट्रात पोचतो. या वर्षी चांगल्या पाऊसमानाचा अंदाज हवामान विभागाने आधीच वर्तविला आहे. त्यात मॉन्सूनचे लवकरच होत असलेले आगमन ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब म्हणावी लागेल. असे असले तरी मॉन्सूनच्या वाटेत अडसर आणणारे अनेक घटक पण आहेत. त्यामुळे कधी पावसास लवकर सुरवात होते, पण मध्ये मोठे खंडही पडतात. तर कधी उशिरा आगमन होऊन तो लवकर काढता पाय घेतो. तर, कधी वेळेवर सुरवात होऊन अनेक भागांत अतिवृष्टी होते. या सर्व परिस्थितीमध्ये देशभरातील जिरायती शेतीचे मोठे नुकसान होते.

जिरायती शेती ही केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. या शेतीत खरीप हंगाम हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पावसाच्या पाण्यावर येणाऱ्या एकाद-दुसऱ्या पिकावर जिरायची शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो. एवढेच नव्हे, तर वर्षभरासाठीच्या घरखर्चाची तजवीजही यातूनच करावी लागते. शेतीप्रधान आपल्या देशाचा विचार करता मॉन्सूनवरच आपली एकंदरीत अर्थव्यवस्था अवलंबून आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले, तर शेती आधारित उद्योग-व्यवसायाची सुद्धा भरभराट होते. उत्पादक शेतकऱ्यांपासून उद्योग-व्यवसायत रोजगार करणाऱ्या अनेकांची क्रयशक्ती वाढते. सर्वसामान्य लोकांची क्रयशक्ती वाढली, तरच बाजारात चैतन्याचे वातावरण असते. बाजारातील उत्पादनांचा खप वाढून देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते. अशा वेळी खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी शेतकरी, शासन-प्रशासनाने कंबर कसायला हवी. महत्त्वाचे म्हणजे पावसाळ्यात येणाऱ्या कुठल्याही आपत्तीशी दोन हात करण्यासाठी सर्वांनीच सजग राहायला हवे. खरीप हंगामाच्या अनुषंगाने महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते आणि कीडनाशके या निविष्ठांचा वेळेत, पुरेशा प्रमाणात आणि उत्तम गुणवत्तेत पुरवठा व्हायला हवा. मागील काही वर्षांपासून निविष्ठांमध्ये भेसळ, बोगस, अप्रमाणित यांचे प्रमाण वाढले आहे. या हंगामात त्यास आळा बसायला हवा. शेतीचे घटते उत्पादन, शेतमालास मिळणारा अत्यंत कमी दर, तर तूर, हरभरा खरेदीअभावी शेतकऱ्यांच्या घरातच पडून असल्याने बहुतांश शेतकऱ्यांजवळ पेरणीस पैसाच नाही. अशा वेळी पीककर्जाचा विषय मार्गी लावून ते शेतकऱ्यांना तत्काळ उपलब्ध व्हायला हवे. अनिश्चित पाऊसमानाच्या काळातही जिरायती शेतीतून उत्पादनाची हमी मिळवायची असेल, तर संरक्षित सिंचनाची सोय व्हायलाच हवी. याकरिता शेतकरी आपापले प्रयत्न करीत असतातच. अत्यंत कमी पावसाच्या प्रदेशात सामूहिकरीत्या पिके वाचविण्यासाठी शासनानेसुद्धा प्रयत्न करायला हवे. या खरीप हंगामात यावरही विचार व्हायला हवा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com