अधिवास वाचवा; निसर्ग वाचेल

संपादकीय
संपादकीय

दुर्मीळ होत चाललेल्या पक्ष्यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास प्रत्येक गावाने पक्ष्यांचा स्थानिक, नैसर्गिक अधिवास, अर्थात गाव परिसरातील मोठे वृक्ष, नदी, नाले, ओढ्यातील झाडे झुडूपे यांचे संवर्धन करायला पाहिजे. माळढोक, घार, साळुंखी या पक्ष्यांसह राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात आढळणारे पोपटही आता दुर्मीळ होत चालले आहेत. मुंग्यांपासून मधमाश्‍यांपर्यंत निसर्गात आढळणाऱ्या प्रत्येक जिवाला महत्त्व आहे. निसर्गातील एखादा जीव घटक धोक्‍यात आला तर पूर्ण निसर्ग चक्र, पर्यावरणाचा समतोल बिघडतो. शेतीत होणारा अनियंत्रित कीडनाशकांचा वापर, विकासाच्या नावाखाली होत असलेली वाढती प्रामुख्याने जुन्या वृक्षांची तोड, वाढती शिकार, महत्वाचे म्हणजे पक्ष्यांचे स्थानिक अधिवास समजले जाणारे मोठे वृक्ष, नदी, नाले, ओढे, माळरान, जंगल नष्ट होत आहेत. त्यामुळे पक्ष्यांचा अन्न, वस्त्र, निवाराच धोक्‍यात आला आहे. बोर, बाभूळ, वड, उंबरासारख्या जुन्या मोठ्या झाडांची फळे पक्षी खातात. अशा जुन्या-मोठ्या झाडांवरच पक्षी आपली घरटी बांधतात. अशा वृक्षांच्या तोडीने पक्ष्यांना अन्न मिळत नसून ते उघड्यावरही पडत आहेत. शेतात कीडनाशके फवारल्याने शत्रू-मित्र कीटकही मरतात. या विषारी कीटकांना पक्षी खाऊन तेही मरत आहेत. वाढत्या तापमानाने पर्यावरणाचा समतोल बिघडत असून, त्याचे सर्वांत जास्त दुष्परिणाम शेती क्षेत्र भोगत आहे. अशा वेळी स्थानिक अधिवासही नष्ट करून त्यावरील जीवसृष्टी धोक्‍यात आणून आपण निसर्ग चक्र, पर्यावरणाचा समतोल अधिकच बिघडवत चाललो आहोत. निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे. जेथे जंगल-जैवविविधता अधिक तेथे जगण्याचा आनंदही जास्त, हे अनेक देशांत सिद्ध झाले आहे. असे असताना निसर्गाला वाचवायचे सोडून त्यास ओरबडण्याचे काम आपण मागील अनेक वर्षांपासून करीत आहोत. पर्यावरणाच्या योग्य समतोलासाठी देशात एकूण क्षेत्राच्या किमान ३३ टक्के क्षेत्र वनाखाली असणे गरजेचे आहे. अशावेळी देशात जंगलाचे प्रमाण गरजेच्या जवळपास निम्म्यावरच येऊन पोचले असून दिवसागणिक या क्षेत्रात घट होत आहे. दुर्मीळ होत चाललेल्या पक्ष्यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास प्रत्येक गावाने पक्ष्यांचा स्थानिक, नैसर्गिक अधिवास अर्थात गाव परिसरातील मोठे वृक्ष, नदी, नाले, ओढ्यातील झाडेझुडपे यांचे संवर्धन करायला पाहिजे. स्थानिक अधिवासांच्या महत्त्वाबाबत गावातील प्रत्येक नागरिकांमध्ये प्रबोधन व्हायला हवे. गावातील शाळा, ग्राम पंचायत कार्यालय यातून निसर्ग शिक्षणाचे धडे गावकऱ्यांना मिळायला हवेत. आपल्या गावचा निसर्ग काय सांगतो? हे कळल्याशिवाय त्यांचे महत्त्व गावकऱ्यांना समजणार नाही. आज आपण पाहतोय वाढते शहरीकरण, रस्ते इतर कामांसाठी जुनी झाडे तोडून त्याऐवजी एकतर काहीच लावले जात नाही, अथवा विदेशी झाडे लावली जात आहेत. अशा बहुतांश झाडांना फळे तर येतच नाहीत, त्यावर पक्षीही घरटे बांधत नाहीत. त्यामुळे विकास कामांसाठी जी झाडे तोडली तीच झाडे तोडलेल्या प्रमाणात दुसरीकडे लावायला हवीत. शेतीत कीडनाशकांच्या अनियंत्रित वापरावरही मर्यादा यायला हव्यात. कीडनाशकांचा वापर सुरक्षित व्हायला हवा. त्यातून मित्र कीटकांबरोबर पक्षी मरणार नाहीत, याची काळजी घ्यायला पाहिजे. निसर्गाला आपल्या मनाप्रमाणे राहू दिल्यास, त्यातील जीवसृष्टीही टिकून राहील आणि निसर्गही आपल्याला भरभरून देईल, हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com