अठरा गावांनी केली कचऱ्यापासून गांडूळखत निर्मिती

अठरा गावांनी केली कचऱ्यापासून गांडूळखत निर्मिती
अठरा गावांनी केली कचऱ्यापासून गांडूळखत निर्मिती

गावे आणि वाडीवस्त्याही स्वच्छतेत अग्रभागी असाव्यात, गावच्या कचऱ्याचे गावातच विघटन होऊन खत निर्मिती करून गावे स्वयंपूर्ण व्हावीत, यासाठी सातारा जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून गावोगावी जनजागृती करण्यात येत आहे. कऱ्हाड तालुक्यातील बनवडी गावाची प्रेरणा घेत जिल्ह्यातील तीन हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या २२३ ग्रामपंचायतींची पहिल्या टप्प्यात निवड करण्यात आली आहे. त्यातील १४० गावांमध्ये कार्यवाही सुरू झाली असून उर्वरीत ५५ गावांतील प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. संबंधित गावांपैकी १८ गावांमधून आत्तापर्यंत तब्बल १०६ टन खतांची निर्मिती झाली आहे. कऱ्हाड तालुक्यातील बनवडी (जि. सातारा) गावाने गावातील कचऱ्याचे विघटन करून त्यापासून खत निर्मिती सुरू केली. कचऱ्याची समस्या वेळीच अोळखली वाढत्या नागरीकरणाच्या काळात गावांसह वाडी-वस्त्यांमध्ये कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. अनेक शहरातील कचरा शेजारील गावच्या हद्दीत उघड्यावरच टाकला जात आहे. त्यावरून अनेक गावे आणि शहरांत वादावादी सुरू आहे. अनेक ठिकाणी त्यावरुन खटलेही दाखल झाले आहेत. ही समस्या भविष्यात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे काळाची पावले ओळखून त्यावर उपाय शोधणे गरजेचे होते. सातारा जिल्हा परिषदेने त्याच हेतूने कचऱ्यापासून खत निर्मिती करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यासाठी आत्तापर्यंत जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत पंचायत समित्यांच्या पुढाकारातून गावोगावी, वाड्या- वस्त्यांवर जनजागृती करण्यात आली आहे. गावचा कचरा गावातच जिरला पाहिजे, त्याची विल्हेवाट गावातच लागली पाहिजे यासाठी प्रत्येक पंचायत समितीने प्रयत्न सुरू केले आहेत. कार्यपद्धती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, सर्व गटविकास अधिकारी व सहकाऱ्यांनी त्याचा आराखडा तयार करून काम सुरू केले. त्यासाठी जिल्ह्यातील तीन हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या २२३ ग्रामपंचायती पहिल्या टप्प्यात निवडल्या. त्यांच्यात सातत्याने प्रबोधन करण्यात आले. त्यासाठी ग्रामपंचायतींना प्रोत्साहीत करण्यात आले आहे. त्यातून आज जिल्ह्यातील १४० गावांमध्ये खत निर्मितीची कार्यवाही सुरू झाली आहे. उर्वरीत ५५ गावांतील प्रकल्प प्रगतीपथावर असून २८ गावांत प्रक्रिया सुरू होण्याच्या मार्गावर आहे. ठळक बाबी

  • संबंधित १४० गावांमधील १८ गावांमधून १०६ टन खतनिर्मीती
  • खत पॅकिंग, ग्रेडिंगद्वारे ग्रामपंचायतींककडून १० रुपये प्रति किलो दराने विक्रीसाठी उपलब्ध
  • त्याद्वारे संबंधित ग्रामपंचायतींना १० लाख ६० हजारांचे उत्पन्न अपेक्षित
  • कचऱ्यापासून मोठ्या प्रमाणात खतनिर्मितीसाठी सातारा जिल्हा ‘रोलमाॅडेल’ म्हणून पुढे येत अाहे. त्यास ग्रामपंचायतींची चांगली साथ
  • शेतकऱ्यांकडून गांडूळखताची मागणी
  • कचरा घेण्यास ग्रामपंचायती इच्छुक कमी खर्चात कचऱ्याची समस्या मार्गी लागून ग्रामपंचायतीलाही उत्पन्नाचे साधन उपलब्ध होत असल्याने अनेक ग्रामपंचायती त्यासाठी पुढे आल्या आहेत. कऱ्हाड तालुक्यातील बनवडी, सातारा तालुक्यातील नागठाणेसह अन्य ग्रामपंचायतींचे नाव त्यात घ्यावे लागेल. ग्रामपंचायतींनी अन्य ग्रामपंचायतींकडे कचऱ्याची मागणी केली आहे. त्याद्वारे शेजारील गावच्या कचऱ्याचाही प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. उत्पन्नाचे हे साधन कायमस्वरुपी उपलब्ध होणार असून त्याचा उपयोग गावांना विकासकामांसाठी करता येणार आहे. खत निर्मिती करणारी गावे बावधन (ता. वाई), मल्हारपेठ (ता. पाटण), कोळकी, वाठारा निंबळक (ता. फलटण), अतित, नागठाणे, शिवथर, पाटखळ, शेंद्रे, खोजेवाडी (ता. सातारा), निमसोड (ता. खटाव), बनवडी, किवळ, हजारमाची, पार्ले, येळगाव, गोळेश्वर (ता. कऱ्हाड) प्रतिक्रिया सातारा जिल्हा परिषदेने केलेल्या आवाहनाला जिल्ह्यातील सर्व गावांनी खत निर्मितीसाठी संमती दर्शवली. कचऱ्याची समस्या मार्गी लागत असल्याने नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होत आहे. टप्याटप्याने जिल्ह्यातील सर्व गावात ही मोहीम राबवण्यात येईल. - डाॅ. कैलास शिंदे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा नागठाणे ग्रामपंचायतीने गांडूळखत तयार करण्याचा उपक्रम सुरु केला. एक एकरातं आले पिकात त्याचा वापर केला. सेंद्रिय पद्धतीचा वापर त्यात झाला आहे. मालाची गुणवत्ता व उत्पादन वाढण्यामध्ये त्याचा निश्चित उपयोग होईल. - अधिकराव साळुंखे-पाटील नागठाणे ऊस, फ्लाॅवरसाठी या खताचा वापर केला. वर्षभरापासून त्याचा वापर करीत असून त्याचा ‘रिझल्ट’ समाधानकारक दिसू लागला आहे. - गणेश चव्हाण कोपर्डे हवेली

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com