अळिंबी उत्पादनातून केली संकटांवर मात

अळिंबी उत्पादनातून केली संकटांवर मात
अळिंबी उत्पादनातून केली संकटांवर मात

लोणी (जि. जळगाव) येथील अनिल माळी यांच्याकडे कृषी क्षेत्रातील आचार्य पदवी असूनही संकटाने पाठ सोडली नाही. न खचता अळिंबी उत्पादनासारख्या अनवट कृषिपूरक उत्पादनाची वाट चोखाळत त्यांनी मार्ग काढला आहे. १५ लाखांचे कर्ज घेत अळिंबी उत्पादनाचा देवकेश हा ब्रॅण्ड तयार केला आहे. चिकाटी, सातत्य आणि कष्टाला नावीन्यतेची जोड देत आपला व्यवसाय वाढवत आहेत. जळगांव शहरापासून ३५ किलोमीटर अंतरावरील लोणी (ता. चोपडा) येथील अनिल केशव माळी यांनी कृषी कीटक शास्त्रामध्ये पीएच. डी. मिळवली असून, सुरवातीची काही वर्षे खासगी कंपनीमध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम केले. मात्र, तो प्रकल्प काही कारणाने बंद झाला. मग त्यांनी २०१५ मध्ये अडावद (ता. चोपडा) येथे कृषी सेवा केंद्र सुरू केले. या अडचणीच्या काळात संपूर्ण कुटुंबाने आधार दिला. मात्र, एकाच उत्पन्न स्रोतावर अवलबूंन राहण्यापेक्षा अन्य पूरक व्यवसायाचाही शोध सुरू केला. २०१७-१८ मध्ये लोणी येथेच अळिंबी उत्पादन व्यवसाय सुरू केला. या व्यवसायासाठी बॅंकेकडून १५ लाख रुपये इतके कर्ज घेत भांडवल उभारले. अळिंबी उत्पादन, विक्री आणि प्रक्रिया उद्योगासाठी त्यांना ज्येष्ठ बंधू शशिकांत, भावजय सौ. कल्पना, पत्नी सौ. वंदना आणि मामेभाऊ प्रमोद माळी यांचे मोठे सहकार्य मिळते. अळिंबी उत्पादनातील महत्त्वाचे...

  • अळिंबी उत्पादनामध्ये निर्जंतुकीकरणाला मोठे महत्त्व आहे. अगदी शेतातून मिळवलेले गव्हाचे काड पाण्यात १० ते १२ तास भिजवून निचरा झाल्यानंतर निर्जंतूक टाकीमध्ये ठेवले जाते. त्यानंतर बॉयलरमध्ये वाफेच्या साह्याने गव्हाचे काड पूर्णपणे निर्जंतूक केले जाते. ते नैसर्गिकरीत्या थंड झाल्यानंतर १८ x २४ इंच आकाराच्या पिशव्यांमध्ये भरतात.
  • फॉरमॅलिनने निर्जंतूक केलेल्या हाताने निर्जंतूक काडाचे प्लॅस्टिक पिशवीत थर दिले जातात. त्यात प्रत्येक २-३ इंच थरानंतर स्पॉन्स (बी) टाकले जातात. पिशवी भरल्यावर दोऱ्याने तोंड बांधून, पिशवीला सुईने २५-३० छिद्रे केली जातात.
  • या पिशव्या निर्जंतूक अंधाऱ्या खोलीत साधारण तापमान २२ ते २६ अंश सेल्सियस आणि ७०-८५ % आर्द्रतापूर्ण वातारणात ठेवतात. आर्द्रता टिकवण्यासाठी भिंतीवर लावलेल्या पोत्यांवर दिवसातून ३-४ वेळा पाण्याची फवारणी केली जाते.
  • साधारण २० दिवसांनंतर पिशवीमध्ये बुरशीची पूर्ण वाढ झाल्यावर ती पांढरी दिसते. पिशवी ब्लेडने कापून टांगत्या रॅकवर ठेवली जाते. खोलीमध्ये अप्रत्यक्ष सूर्यप्रकाश (संधीप्रकाश) व हवा खेळती ठेवली जाते. या पिशवीतून काढलेल्या बेडवर एक दिवसानंतर पाण्याची हळुवार फवारणी करावी. पुढे दिवसातून ३-४ वेळा पाण्याची फवारणी करतात.
  • पिशवी फाडल्यानंतर ४-५ दिवसांत अळिंबीची पूर्ण वाढ होते. ही वाढलेली अळिंबी हाताने वळवून काढतात.
  • अळिंबी काढल्यानंतर बेड एक ते दीड इंच खरडून हलके पाणी दिले जाते. यातून १० दिवसांनी दुसरे पीक, परत १० दिवसांनी तिसरे अशी तीन पिके मिळतात.
  • शिल्लक राहिलेल्या बेडचा वापर झाडांना खत, जनावरांना पौष्टिक चारा म्हणून होतो.
  • अळिंबीची साठवण ः ताजी अळिंबी छिद्रे पाडलेल्या प्लॅस्टिक पिशवीत साठवतात. ताजी अळिंबी फ्रिजमध्ये ४-५ दिवस उत्तम राहते. ती वाळवण्यासाठी ४५-५० अंश सेल्सिअस तापमानामध्ये ठेवली जाते. वाळवलेल्या अळिंबी पिशवीत भरून सीलबंद करतात.
  • उत्पन्न व आर्थिक बाबी : योग्य वातावरण व वेळेचे नियोजन केल्यास अळिंबीचे चांगले उत्पादन मिळते. अनिल माळी यांच्या प्रकल्पातून प्रति माह सुमारे ४००- ५०० किलो ओली अळिंबी आणि ४० ते ५० किलो वाळलेली अळिंबी इतके अळिंबी उत्पादन होते. महिन्याकाठी ओले व वाळवलेल्या अळिंबींची १० ते २० हजार रुपयांपर्यंत विक्री होते. मात्र, एवढ्यावरच न थांबता अळिंबीपासून मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती केली जात आहे. त्यात वाळविलेल्या अळिंबीपासून भुकटी तयार करून, सूप, बिस्किट फार्मवर तयार करतात. भुकटी देऊन अन्य उत्पादकाकडून पापड, लोणचे, प्रो-विटा पावडर, बासुंदी, जॅम इ. अशी उत्पादने तयार करून घेतात. अशा उत्पादनांना बाजारात ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. मूल्यवर्धित उत्पादनामुळे फायद्यामध्ये वाढ होते. देवकेश ब्रॅंडची निर्मिती आणि विक्री नियोजन :

  • डॉ. अनिल यांनी आपल्या आई देवकी आणि वडील केशव यांच्या नावावरून देवकेश हा ब्रॅंड तयार केला आहे. त्याअंतर्गत ओल्या अळिंबीची विक्री रिटेलमध्ये चारशे रुपये प्रति किलो, तर सुक्या अळिंबीची १६०० ते २००० प्रति किलो प्रमाणे केली जाते.
  • आपल्याकडे ठराविक वर्ग वगळता अळिंबीचा वापर भाजीसाठी फारसा होत नाही. त्यामुळे अळिंबीचे आरोग्यासाठी फायदे, महत्त्व पटवून देण्याचे काम अनिल यांना सातत्याने करावे लागते. लोकांमध्ये अळिंबी उत्पादनाविषयी जागरुकता निर्माण होण्यासाठी शेतकरी अभ्यास सहली, शेतकरी मशरूम उत्पादक कार्यशाळा यांच्या आयोजनासह विविध प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला जातो.
  • उत्पादनासाठी खात्री, शुद्धता पटवण्यासाठी देवकेश मशरूम्स तर्फे ठराविक टप्प्यानंतर गुणवत्ता पडताळणी गुण नियंत्रक प्रयोगशाळेकडून तपासण्या केल्या जातात. त्याची माहिती उत्पादनाच्या लेबलसह विविध सामाजिक माध्यमातून दिली जाते.
  • अळिंबी उत्पादन हे प्रामुख्ने सुपर मार्केट, रीटेल शॉप येथे विक्रीसाठी ठेवले जाते. आरोग्याप्रती जागरूक असलेल्या डॉक्टर, सरकारी अधिकारी, शिक्षक वर्गामध्ये अळिंबी विकत घेण्याचे प्रमाण वाढत असल्याचे डॉ. अनिल माळी यांनी सांगितले. अगदी निमशहरी भागामध्येही मागणी वाढत आहे. देवकेश मशरूमचे आऊट्लेट भुसावळ येथे सुरू केले आहे. लवकरच जळगाव, पुणे, मुंबई, चोपडा येथेही आऊटलेट सुरू करण्याचा मानस आहे.
  • सामाजिक माध्यमांच्या मदतीने (फेसबुक, व्हॉट्सॲप, पेपर मीडिया) अळिंबी ग्राहकांशी सातत्याने संपर्क ठेवला जातो. यावरून आलेल्या मागणीनुसार विक्री केली जाते.
  • अळिंबी उत्पादनाची ताळेबंद ः अ) अनावर्ती खर्च : (सर्वसाधारण ) २ शेड हाऊस (१५०० चौ. फूट प्रत्येकी), शेडची मांडणी, रॅक (पोते), रसायने, स्प्रे पंप, थर्मामीटर, हायग्रोमीटर व अवजारे, काड भिजवण्यासाठी टाक्या यांची खरेदी एकाच वेळी करावी लागते.   ब) आवर्ती खर्च : (सर्व साधारण )  १ पिशवी तयार करण्याकरिता येणारा खर्च : गहू भुस्सा, कुटार ः ३ किलो ः १५ रु. प्लॅस्टिक बॅग १ नग ः ३ रु. स्पॉन (१२५ ग्रॅम) ः १४ ते ३० रु. (अळिंबीच्या प्लुरोटस सजारकाजू आणि प्लुरोटस फ्लोरिडा अशा दोन प्रजाती असून, त्याचे दर अनुक्रमे ११० रुपये व २५० रुपये प्रति किलो असे आहेत. प्रजातीनुसार खर्च भिन्न येतो.) निर्जंतुकीकरण - ३ मजुरी - ५ इतर (सुतळी, पाणी, वीज अन्य) - २० एकूण - ६० ते ८० रुपये  क) अपेक्षित उत्पादन व उत्पन्न :  १) १ पिशवीपासून ८०० ते १००० ग्रॅम ताजी अळिंबी उत्पादन मिळते. ताज्या अळिंबीचा दर किरकोळ बाजारात ४०० रुपये प्रति किलो असला तरी घाऊक दर २०० रुपये प्रति किलो इतका आहे. २) १ किलो अळिंबी उत्पादनासाठी येणारा खर्च ः ६० ते ८० रु. ३) एखादी पिशवी खराब होणे, बिजांची उगवण न होणे, अन्य बुरशींची वाढ होणे या कारणांमुळे बॅचचे उत्पादन कमी होऊ शकते. याचा एकंदरित विचार करताना प्रति पिशवी साधारणपणे ७० ते ८० रुपये निव्वळ फायदा होतो. ४) पिशवी भरण्यापासून अळिंबी काढणीपर्यंत साधारण ३५ ते ४० दिवस लागतात. स्वच्छता व अन्य किरकोळ कामांचे दिवस धरले तर दोन महिन्यामध्ये अळिंबी उत्पादन हाती येते. वर्षात साधारण सहा बॅच होतात. ५) वर्षभर नियमित उत्पादनासाठी अनिल दर आठवड्याला १२० पिशव्या भरतात. (टीप : उत्पादन हे योग्य वातावरण व निगा यानुसार कमी अधिक होऊ शकते.) पाल कृषी विज्ञान केंद्राची मदत पाल कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावरही अळिंबी उत्पादन सुरू आहे. परिसरातील तरुण शेतकरी, महिलांसाठी अळिंबी उत्पादन प्रशिक्षणाची सोय उपलब्ध आहे. अळिंबी उत्पादनामध्ये येणाऱ्या अडचणीसाठी कृषी विज्ञान केंद्राची मदत होते. संपर्क : डॉ. अनिल माळी, ९४२०२२८०३५ (लेखक महेश महाजन हे कृषी विज्ञान केंद्र, पाल, ता. रावेर, जि. जळगांव येथे विषय विशेषज्ञ - पीक संरक्षण आहेत.)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com