agricultural stories in Marathi, agrowon, agromoney, aarthkatha, Hemant pingale yashktha, lakhmapur, nashik | Agrowon

हेमंतरावांची शेती नव्हे ‘कंपनी’च!
ज्ञानेश उगले
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

लखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत पिंगळे यांनी एखाद्या कंपनीप्रमाणे द्राक्ष शेतीतील सिंचन, मजूर, अन्नद्रव्ये, पीक संरक्षण यांचे अत्यंत काटेकोर व अचूक व्यवस्थापन ठेवले आहे. गेल्या ६५ वर्षांपासून जमाखर्चाच्या नोंदीच त्यांच्या काटेकोर नियोजनाची साक्ष देतात. यामुळेच शेतीतील उत्पन्नाच्या आलेखाकडे बारकाईने लक्ष ठेवणे शक्‍य झाले आहे.

लखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत पिंगळे यांनी एखाद्या कंपनीप्रमाणे द्राक्ष शेतीतील सिंचन, मजूर, अन्नद्रव्ये, पीक संरक्षण यांचे अत्यंत काटेकोर व अचूक व्यवस्थापन ठेवले आहे. गेल्या ६५ वर्षांपासून जमाखर्चाच्या नोंदीच त्यांच्या काटेकोर नियोजनाची साक्ष देतात. यामुळेच शेतीतील उत्पन्नाच्या आलेखाकडे बारकाईने लक्ष ठेवणे शक्‍य झाले आहे.

नाशिक ते वणी या मुख्य रस्त्यालगत दिंडोरी रस्त्यावर लखमापूर गाव लागते. या गावापासून उत्तर दिशेला पुढे आल्यानंतर एक भव्य प्रवेशद्वार लागते. त्यावरील मानसी ग्रीन स्क्वेअर फार्म यार्ड आपले स्वागत करत असल्याचा फलक लक्ष वेधून घेतो. येथूनच हेमंत पिंगळे यांच्या शेताचे वेगळेपण मनात ठसू लागते. दुतर्फा सिल्व्हर ओकच्या झाडांच्या रांगांतून पुढे आल्यानंतर सुरू होतात द्राक्षबागा. एखाद्या सुव्यवस्थित कंपनीमध्ये प्रवेश करत आहोत, याचा भास होत राहतो. येथे पिंगळे यांची ४५ एकर शेती असून, त्यातील ३८ एकर द्राक्षे, तर ६ एकर टोमॅटो पीक घेतले जाते. अत्यंत काटेकोर व्यवस्थापनातून सुमारे ८० टक्के द्राक्ष उत्पादन निर्यात केले जाते.

हेमंत पिंगळे यांचे मूळ गाव मखमलाबाद असून, बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर पूर्णपणे शेतीमध्ये झोकून दिले. १९९७-९८ मध्ये व्यावसायिक विचार करत पारंपरिक ओनरुट पद्धतीऐवजी रूट स्टॉकवर द्राक्षाची लागवड केली. पुढे २००४ मध्ये मखमलाबाद येथील ४ एकर क्षेत्राची विक्री करत लखमापूर (ता. दिंडोरी) येथे शेती घेतली. पुढे हळूहळू खरेदी करत ४५ एकरपर्यंत वाढवले. टप्प्याटप्प्याने ३८ एकर क्षेत्रावर द्राक्ष लागवड केली. यात तास ए गणेश, क्‍लोन टू ए, शरद सीडलेस, जम्बो सीडलेस, थामॅसन या खाण्याच्या द्राक्षांसह कॅबरनेट या वाइन द्राक्षांचा समावेश आहे. वाइनच्या करार शेतीत अडचणींमुळे हे क्षेत्र कमी केले. सिंचनासाठी करंजवण व ओझरखेड या धरणांवरून पाइपलाइन केली.

६५ वर्षांच्या जमाखर्चाच्या नोंदी...
आर्थिक नियोजन हाच शेती व्यवसायाचा पाया असल्याचे हेमंतरावांचे मत आहे. त्यामुळे उद्योगाप्रमाणे जमाखर्चाचा हिशेब ठेवला आहे. त्यांच्याकजे गत ६५ वर्षांतील जमाखर्च नोंदी जपलेल्या आहेत. यात घर खर्च आणि शेती खर्च या दोन बाबी वेगळ्या केल्या
आहेत. कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या जमाखर्चाची स्वतंत्र नोंद होते. शेतीमध्येही मजूर, कीडनाशके, पाणी, खते अशा प्रत्येक बाबींसाठी वेगळ्या फाइल्स केल्या आहेत. शेती आणि आर्थिक नियोजनाची पूर्ण वेळ जबाबदारी नामदेवराव घोरपडे यांच्याकडे असते. गेल्या वर्षी हे काम संगणकावरील एका सॉफ्टवेअरच्या साह्याने करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अपेक्षेप्रमाणे नोंदी होत नसल्याने ते थांबवले आहे. घोरपडे यांच्याकडे अगदी कोणत्या वर्षी कशावर किती खर्च झाला, याची काही क्षणात अचूक माहिती मिळते. या साऱ्या नोंदीचा उपयोग दरवर्षी आर्थिक नियोजन करतेवेळी होतो. महागाईतील वाढ आणि उत्पन्न यांचा ताळमेळ बसवत योग्य ते निर्णय घेता येतात.

समस्या सर्वांना सारख्याच...
पाण्याचा ताण, विजेची समस्या, नैसर्गिक आपत्ती, वाढता उत्पादन खर्च, मजूरटंचाई अशा अनेक समस्यांशी हेमंतरावांनाही सातत्याने झुंजावे लागते. वर्ष २००६ ते २०१८ या बारा वर्षांत द्राक्ष उत्पादनामध्ये एकरी १० ते ११ टन असे सातत्य ठेवले. त्यातील ८० टक्के उत्पादन निर्यातक्षम असून, युरोप बाजारपेठेत जाते. २००८ मध्ये फयान वादळाने मोठे नुकसान केले. वर्षभराचा खर्च आणि उत्पन्न हे दोन्ही गेले. मागील २०१६ व २०१७ या वर्षातही बाजारात अपेक्षित दर मिळाला नाही. मात्र व्यवसायात हे होतच असते. प्रत्येक टप्प्यावरील अचूक व्यवस्थापन व आर्थिक नियोजन यामुळे अडचणीतही तग धरता आला. अशा वेळी सकारात्मक दृष्टिकोन सर्वाधिक उपयोगी ठरत असल्याचे हेमंतराव सांगतात.

यांत्रिकीकरणामुळे खर्चावर नियंत्रण
विजेच्या समस्येवर मात करण्यासाठी वीज कंपनीकडून मेनलाइन व ट्रान्स्फॉर्मर घेतला आहे. त्याजवळच विहीर व फर्टिगेशन व्यवस्था आहे. संपूर्ण स्वयंचलित व संगणकीय पद्धतीने खते व पाण्याचे व्यवस्थापन केले जाते.
शेतीच्या सर्व निविष्ठांसह अन्य खर्चात दरवर्षी १० ते ३० टक्‍क्‍यांपर्यंत वाढ होत आहे. हा वाढता खर्च मोठे आव्हान ठरत आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी गेल्या सहा वर्षांपासून यांत्रिकीकरणावर अधिक भर दिला. फवारणीसाठी अत्याधुनिक इलेक्‍ट्रोस्टॅटिक स्प्रेअर, तण काढण्यासाठी ग्रासकटर यासह कोळपणी यंत्र, रोटाव्हेटर, शेणस्लरी गाडा अशा यंत्राचा वापर केला जातो.

द्राक्ष थेट विक्रीचा प्रयोग

  • ३८ एकरांतून दरवर्षी ४०० टन द्राक्ष उत्पादन. ८० टक्के द्राक्ष निर्यात होतात.
  • ८० टन द्राक्षे ही देशांतर्गत बाजारात विकली. मात्र, अपेक्षित दर मिळत नसल्याने मागील दोन वर्षांपासून मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर व पुणे ऑरगॅनिक बाजार येथे थेट विक्रीचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या विक्री कमी (५ ते ७ क्विंटल) असली, तरी हळूहळू मागणी वाढेल असा अंदाज आहे. त्यासाठी "मानसी फार्म' हा ब्रॅंड करण्याचे नियोजन आहे.

थोडक्‍यात ताळेबंद ः
एकरी सरासरी वार्षिक उत्पादन : १० टन
मागील १२ वर्षांत मिळालेला प्रतिकिलोला मिळालेला सरासरी दर
देशांतर्गत बाजारात : ४० रुपये
निर्यातीच्या बाजारात : ६५ रुपये
(२००८, २०१६, २०१७ या वर्षात मोठे नुकसान झाले.)

द्राक्षपिकाला येणारा वार्षिक एकरी खर्च (रु.) : २ लाख
या खर्चाची विभागणी
मजुरी : २० टक्के
अन्नद्रव्य : ३५ टक्के
पीक संरक्षण : ३५ टक्के
इंधनादी खर्च (पेट्रोल, डिझेल, वीज) : १० टक्के

शेती व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये
दरवर्षी माती पाणी परिक्षण,
हवामान अंदाजाचा अभ्यास
आर्थिक व्यवस्थापनावर विशेष भर
मागील १२ वर्षांत उत्पादनात सातत्य
यांत्रिकीकरणातून खर्चावर नियंत्रण
प्रत्येक काम वेळेवर व अचूक करण्यावर भर

संपर्क ः हेमंत पिंगळे, ९८५०२२६६७१

फोटो गॅलरी

इतर अॅग्रोमनी
कापूस, हरभऱ्याची मागणी वाढतीया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन व...
देशात ३४० लाख कापूस गाठी उत्पादनाचा...जळगाव : देशात सप्टेंबरच्या पावसासंबंधी अनियमितता...
द्राक्षाच्या तिहेरी विक्री व्यवस्थापनात...मालगाव (जि. सांगली) येथील संजय भीमराव बरगाले...
वायदे बाजार : सोयाबीन, कापसाचा लांबवरचा...या सप्ताहात सोयाबीन, हळद, साखर व गवार बी यांचे...
वाढताहेत लिंबू निर्यातीच्या संधी जागतिक लिंबू बाजारपेठेचा आढावा फ्रेंच मोटार...
साखरेचा कल घसरताया सप्ताहात कापूस, सोयाबीन, हळद, साखर व गवार बी...
कापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...
हळद वगळता सर्व शेतमालाचे भाव तेजीतया सप्ताहात साखर, सोयबीन व हळद वगळता सर्व पिकांचे...
कापूस कोंडी टाळण्यासाठी मिशन मोडवर काम...भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा कापूस उत्पादक...
हळद, हरभऱ्याच्या फ्युचर्स भावात चढ -...या सप्ताहात कापूस, गवार बी व हरभरा वगळता सर्व...
इंटरनेटद्वारे कृषिमालाचे प्रभावी विपणनएकविसाव्या शतकातील माणूसही इंटरनेटच्या वेगाने...
पुढील काही महिने हळदीच्या दरावर ठेवा...या सप्ताहात सोयाबीन व गहू वगळता सर्व पिकांचे भाव...
ऑक्टोबरमध्ये प्रथमच ब्रॉयलर बाजार...ब्रॉयलर्सचे बाजारभाव वर्षातील उच्चांकी पातळीवर...
सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची गोचीकोणतेही तातडीचे, आतबट्टायचे काम करायचे असेल तर...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
व्यापारी बँका वित्तीय निरक्षरतेचा फायदा...व्यापारी बँका सामान्य कर्जदारांमधील वित्तीय...
संतुलित पुरवठ्यामुळे ब्रॉयलर्सच्या...नवरात्रोत्सवामुळे चिकनच्या सर्वसाधारपण खपात मोठी...
नवीन हंगामात कापसाची अडखळती सुरवातदेशात कापसाच्या २०१८-१९ च्या नवीन विपणन हंगामाची...
हमीभाव मनमोहनसिंग सरकारपेक्षा कमी;...नरेंद्र मोदी सरकारने जुलै महिन्यात पिकांच्या...
तेल द्या आणि तांदूळ घ्या; भारताकडून '...अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया दररोज...