वायदे बाजारातून शेतमाल विक्री व्यवस्था बळकटीचे प्रयत्न

वायदे बाजारातून विक्री व्यवस्था बळकटीचे प्रयत्न
वायदे बाजारातून विक्री व्यवस्था बळकटीचे प्रयत्न

उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती असले तरी विक्री आणि तत्पश्चात विपणन व्यवस्थेमुळे तो अनेकवेळा परावलंबी बनतो. या व्यवस्थेमध्ये शेतकरी व त्यांच्या कंपन्यांनी उतरणे आवश्यक आहे. त्याचा फायदा केवळ त्या कंपनीलाच नाही, तर एकूणच सर्व शेतकऱ्यांना होऊ शकतो. अकोला जिल्ह्यातील वाडेगाव (ता. बाळापूर) येथील जागेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी वायदेबाजारात उतरली आहे. पहिल्या दीड वर्षामध्येच बाजारभावापेक्षा अधिक दर मिळवण्यात यश आले आहे. अकोला जिल्ह्यातील वाडेगाव (ता. बाळापूर) हे गाव लिंबू बाजारासाठी राज्यभर प्रसिद्ध आहे. येथे लिंबासह सोयाबीन, तूर, उडीद, मूग, हरभरा या पिकांचेही मोठे उत्पादन होते. या शेतमालाची विक्री प्रामुख्याने अकोला येथे केली जाते. विक्री व्यवस्थेतील व्यापाऱ्यांची साखळी, आवक अशा बाबींमुळे शेतकऱ्यांच्या हाती नेहमीच कमी किंमत मिळते. यासाठी काहीतरी केले पाहिजे, या विचारातून येथील शेतकरी एकत्र आले. संघटनेतून उद्यमशिलतेमध्ये वाढ व्हावी, यासाठी शेतकरी कंपन्यांचे जाळे उभारले जात आहे. अकोला जिल्ह्यात महाराष्ट्र कृषी स्पर्धाक्षम प्रकल्पाच्या माध्यमातून जागेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी उभी राहिली. ही कंपनी गेल्या हंगामापासून वायदे बाजारात उतरली. त्यातील टक्के टोणपे खात, अनुभव घेत त्यांची वाटचाल सुरू झाली. पहिल्या वर्षातील एकंदरीत विचार करता उत्साहवर्धक कामगिरी झाली. शेतकरी सामूहिक सुविधा केंद्राची निर्मिती सन २०१५-१६ मध्ये महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत वाडेगावमध्ये प्रशिक्षण झाले. प्रकल्पामार्फत वाडेगाव, बटवाडी, तामसीया या तीन गावांमध्ये निवडक शेतकऱ्यांचे पीकनिहाय १६ गट स्थापन करण्यात आले. या गटांना बाजाराभिमुख बनवण्यासाठी जागेश्वर शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये रूपांतर केले गेले. सुरवातीला २८५ शेतकरी कंपनीचे भागधारक होते. आता भागधारकांचे प्रमाण ५०२ पर्यंत पोचले आहे. त्यातून शेतकरी सामूहीक सुविधा केंद्राची उभारणी केली. असे पडले वायदे बाजारात पाऊल २०१६-१७ च्या रब्बी हंगामापासून व्यवसायवृद्धीच्या दिशेने प्रयत्न सुरू झाले. या हंगामात पायाभूत ते प्रमाणित हरभरा ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम ३० एकरवर घेतला. मात्र, याच वर्षी राज्यशासनाकडून बीजोत्पादनासाठीचे अनुदान बंद झाले. नव्याने सुरू झालेल्या या शेतकरी उत्पादक कंपनीसमोर मोठे संकट उभे ठाकले. त्या वेळी हरभऱ्याचे स्थानिक बाजारात दरही कमी होते. चर्चेतून हे उत्पादित बियाणे वायदे बाजारात नोंदणी करून विकण्याचा धाडसी निर्णय घेतला. कंपनीने प्रकल्पाच्या साह्याने उत्पादित झालेला ११४ क्विंटल हरभरा वायदे बाजारात ई-मार्केटींग प्रणालीद्वारे विकला. यासाठी त्यांना प्रतिक्विटंल ३८०० रुपये दर स्थानिक बाजारपेठेपेक्षा प्रतिक्विंटल ३०० रुपये अधिक दर मिळाला. वायदेबाजारातून पर्यायी विपणनाची नवी संधी दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह वाढला. खरेदी-विक्री झाली सुरू पहिल्याच प्रयत्नात चांगला अनुभव आल्याने शेतकरी कंपनीने शेतमाल विपणनाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला. यासाठी नॅब किसान व प्रकल्पाच्या मदतीने २५ लाखांचे कर्ज स्वरूपात भांडवल उभे केले. सभासदांचा वेगवेगळ्या दर्जाचा शेतमाल १० टक्के अधिक दराने खरेदी केला. कंपनीने उभारलेल्या धान्य स्वच्छता व प्रतवारी यंत्राच्या साह्याने वायदे बाजारासाठी आवश्यक दर्जा व पॅकिंगमध्ये उपलब्ध केला. त्याची विक्री ऑक्टोबर २०१७ ते मार्च २०१८ या काळात एनसीडीईएक्सच्या फ्युचर मार्केट प्रणालीद्वारे विक्री केली. हा व्यवहार ९० लाखांपर्यंत झाला. यात प्रामुख्याने सोयाबीनला ३०० रुपये प्रतिक्विंटल अधिक दर मिळाल्याने बाजारभावाच्या तुलनेमध्ये तीन लाखांचा नफा या शेतकरी कंपनीस झाला. ई-प्रणालीद्वारे विक्री केलेला शेतमाल

पीक क्विंटल स्थानिक बाजारातील दर, रु. प्रति क्विंटल वायदे बाजारातील दर रु. प्रति क्विंटल फरक
सोयाबीन १००० ३१०० ३४०० ३००
हरभरा १०० ३६०० ३८११ २१४

अजून शिकतोच आहोत...

  • सर्व कंपनी पदाधिकारी हे ग्रामीण भागातील असून, वायदेबाजाराविषयी नवीन होते. वायदे बाजारात उतरणे म्हणजे धाडसच होते. वायदेबाजाराचे शेतीमालाचे निकष जाणून घेण्यात गडबड झाली. केवळ ११४ क्विंटल हरभरा विक्री झाला. उर्वरित तूर, हरभऱ्याचा एक लॉट रिजेक्ट झाला. सर्वांना धक्का बसला. मात्र, थांबून चालणार नव्हतेच. कंपनीने ३४०० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला २०० क्विंटल हरभरा खुल्या बाजारात ३२०० ते ३४०० रुपये प्रतिक्लिंटलप्रमाणे विकावा लागला. मग डाळ बनवण्याचा निर्णय घेतला. १०० क्विंटलची डाळ बनवली. ३० किलोचे पॅकिंग करून विक्री केली. त्याला ४०.५ रुपये प्रतिकिलो असा दर मिळाला. पॅकिंगचा व अन्य खर्च वजा करता कंपनीला प्रतिक्विंटल ३७५० रुपये दर मिळाला.
  • हे सर्व व्यवहार करण्यासाठी भांडवलाची गरज होती, यासाठी राष्ट्रीयकृत बँकेत वारंवार चकरा मारल्या. शेवटी खासगी फायनान्स कंपनीकडून महागड्या व्याजदराने १५ लाख रुपये कर्ज उचलावे लागले. त्या भांडवलावर व्यवहार केले. या घेतलेल्या कर्जापैकी १० लाख रुपयांची परतफेडही झाली असून, उर्वरित रकमेचीही परतफेड लवकरच करणार असल्याचे सचिव विवेक सोनटक्के यांनी सांगितले.
  • यावर्षी अधिक जोमाने उतरणार मागील हंगामातील चांगल्या-वाईट अनुभवांची शिदोरी आता कंपनीकडे आहे. यावर्षी स्थानिक पातळीवरील सोयाबीन, मूग, उडीद यांची योग्य दरात खरेदी करून वायदे बाजारात उतरणार आहे. गेल्या वेळी हरभऱ्यातील माती, खडे यांचे प्रमाण अधिक होते. त्याचा फटका बसला. यावर्षी क्लिनिंग व ग्रेडिंगवर चांगले लक्ष देण्यात येणार आहे. माल खरेदी, क्लिनिंग, ग्रेंडिग आणि पॅकिंग यासाठी आशिष पिंपळे आणि श्रीकृष्ण पिंपळे यांची मदत होत असल्याचे कंपनीचे सहायक सचिव अनंता सोनटक्के यांनी सांगितले. जागेश्वर फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे संचालक व प्रमोटर्स अध्यक्ष मोहनराव सरप, उपाध्यक्ष नित्यानंद लोखंडे, सचिव विवेक सोनटक्के, सहायक सचिव अनंता सोनटक्के, संचालक संतोष सरप, श्रीधर सरप, संजय सरप, सुरेंद्र सोनटक्के, देवलाल सोनटक्के, दीपक सरप, सौ. वर्षाताई रा. घाटोळ, प्रमोटर्स विवेक सोनटक्के, अनंता सोनटक्के, संतोष सरप, सीईओ प्रवीण जावरकर. कंपनीमध्ये सहभागी बचत गट

  • एकूण ११ बचतगट ः सिद्धेश्वर शेतकरी बचत गट, माऊली शेतकरी बचत गट, जय शिवाजी शेतकरी बचत गट, माँ भवानी शेतकरी बचत गट, बजरंग शेतकरी बचत गट, अहल्याबाई होळकर शेतकरी बचत गट, मोरेश्वर शेतकरी बचत गट, अश्विनी शेतकरी बचत गट, आदर्श शेतकरी बचत गट, कृषी महिला बचत गट . यातील सदस्य संख्या - २१६.
  • यांच्यासह वाडेगाव, देगाव, खिरपूरी, बाळापूर, शेगाव, अकोला, गोरेगाव, पारस येथील अन्य सभासद सदस्य - २८७
  • एकूण सभासद - ५०२.
  • संपर्क ः अनंता सोनटक्के, ९९७००१११८३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com