agricultural stories in Marathi, agrowon, agromoney, aarthkatha, Nehe family yashkatha in onion farming | Agrowon

नेहे कुटुंबीयांनी कांदा पिकावर बसवले शेतीचे गणित
संदीप नवले
सोमवार, 6 मे 2019

नगर जिल्ह्यातील सावरगाव तळ (ता. संगमनेर) येथील नेहे कुटुंबीयांनी कमी पाणी, कमी कालावधीच्या कांदा पिकावर आपल्या शेतीचे गणित बसवले आहे. शेततळ्याच्या माध्यमातून सहा कोटी लिटर संरक्षित पाणी, ठिबक सिंचन, कांदा लागवडीच्या दोन पद्धती यातून उत्पादनामध्ये शाश्वतता साधली आहे. कांदाचाळीत साठवण करून उत्तम दर मिळताच विक्री केल्याने नफ्याचे प्रमाणही चांगले राहते. 

नगर जिल्ह्यातील सावरगाव तळ (ता. संगमनेर) हे डोंगर पायथ्याशी व पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिमेस सुमारे चार ते पाच किलोमीटर अंतरावरील छोटेसे गाव. लोकसंख्या पाच हजार असून, पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने सातत्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. कोरडवाहू शेतीमध्ये पावसावर आधारीत पारंपरिक पिकातून शेतकरी कुटुंबाचा आर्थिक उदरनिर्वाह साधण्यात अडचणी येतात. अशा स्थितीतही येथील नेहे कुटूंबीय तालुक्यात प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जाते. चार भावांच्या एकत्रित कुटूंबात यशवंत बाळाजी नेहे हे सर्वांत मोठे, त्यानंतर दिनकर, जगन्नाथ, सकाहरी यांची एकूण ४५ एकर शेती आहे. पूर्वी त्यात बाजरी, ज्वारी अशी पिके घेत. कालांतराने पाण्याची सुविधा झाल्यानतर पीकबदल केला. आता त्यांच्याकडे टोमॅटो, टरबूज, कांदा, डाळिंब, वांगे अशी पिके आहेत. पिकांची निवड करताना कमी पाण्यावर येणारी, कमी कालावधीची व कमी उत्पादन खर्च असे निकष लावले आहेत.

    कमी पाण्यासाठी कांदा पिकावर भर
पावसाची सरासरी ४५० मिलिमीटर एवढी असली तरी प्रत्यक्षात त्याचे वितरण अनियमित असते. शेतीउपयोगी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. पाणीटंचाई ही पाचवीलाच पूजलेली असल्याने कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांवर प्रामुख्याने भर आहे. नेहे यांनी १९८९ पासून कांदा लागवड करत असून, एक एकर पासून सुरवात केली होती. ही कांदा लागवड आता ३५ एकरपर्यंत पोचली. २००५ मध्ये शेती संपूर्ण बागायत केली. सुपीकतेसाठी पोल्ट्री त व शेणखताचा वापर दरवर्षी सुरू केला. खरीप हंगामात १ ते १५ जुलै या काळात ३५ एकरावर लाल कांद्याची लागवड केली होती. पाण्याची उपलब्धता कमी असल्याने रब्बी हंगामात १ ते १५ नोव्हेंबर या काळात गावठी कांदा (पुना फुरसुंगी ) कांद्याची लागवड केली.

कांद्याची दोन प्रकारे केली जाते लागवड ः

 • कमी पाण्यातही चांगले उत्पादन घेण्यसाठी नेहे कुटुंबीयांनी कांदा लागवड पद्धतीत बदल केला आहे.
 • खरीप हंगामात ३५ एकरपैकी सुमारे १७ एकरवर सरी पद्धतीने, तर उर्वरित १७-१८ एकरावर वाफे पद्धतीने कांदा लागवड करतात. कांद्याच्या दोन रोपांतील अंतर चार इंच ठेवतात. खरिपात दोन प्रकारे लागवड केल्यामुळे कमी अधिक पाऊस झाला तरी नुकसानीची शक्यता कमी होते. याशिवाय पिकांचे व्यवस्थापन करताना खते, पाणी, फवारणी, काढणी करण्यास सोपे होत असल्याचे जगन्नाथ नेहे यांचे यांनी सांगितले.  
 • कांद्यासाठी कमी खर्च, अधिक उत्पादनावर भर
 • एवढ्या मोठ्या क्षेत्रावर कांदा लावणे धोक्याचे वाटत नाही का, असे विचारल्यानंतर जगन्नाथ नेहे म्हणाले, की कांदा पीक तीन ते चार महिन्याचे आहे. अगदी नांगरटीपासून काढणीपर्यंत २५ ते ३० हजार रुपयांपर्यंत उत्पादन खर्च होतो. वेळेवर लागवड, पाणी, खत, खुरपणी, कीड रोग नियंत्रण अशा उत्तम व्यवस्थापनामुळे कांद्याची प्रत व दर्जा चांगला मिळतो. खरीप हंगामात एकरी सुमारे १५० क्विंटल, रब्बी (उन्हाळी) हंगामातील १७५ क्विटंलपर्यंत उत्पादन मिळते. तर सरासरी एकरी १६० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.  त्यांना २०१४ पर्यत चांगले दर असल्याने उत्पन्नही भरघोस मिळाले. मात्र, त्यानंतर उत्पन्नात घट होत गेली.   

उत्तम पाणी नियोजन

 • सिंचनासाठी प्रवरा नदीवरून २५ हजार फुटांची कुटुंबाची स्वतंत्र पाइपलाइन केली आहे. तसेच सामुदायिक सहा इंचाच्या दोन पाइपलाइन केलेल्या आहेत. ३५ एकरांपैकी १७ एकरपर्यंत ठिंबक सिंचन सुविधा केली आहे. संरक्षित पाण्यासाठी दोन कोटी लीटर क्षमतेची तीन शेततळी केली आहेत. या शेततळ्यातील पाण्याचा ठिंबक सिंचनाचा वापर करून यंदा ३५ एकरांतील कांद्याचे उत्पादन घेतले आहे.
 • कांद्याची साठवणूक व विक्रीच्या नियोजनामुळे वाढतो नफा
 • पावसाळ्यातील कांद्याची काढणी केल्यानंतर लगेच विक्री केली जाते. त्याला चांगला दर मिळतो असा त्याचा अनुभव आहे. मात्र, उन्हाळी हंगामातील कांद्याची काढणी केल्यानंतर त्याची साठवणूक केली जाते. त्यासाठी लोखंडी पत्र्यांचे ५० बाय २० फुटांचे शेड बांधले असून, त्यात कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळ तयार केली आहे. त्यामध्ये उत्तम प्रतिच्या सुमारे २०० क्विंटल कांद्याची साठवणूक करतात.
 • संगमनेर या तालुक्याच्या ठिकाणी बाजारातील दराची माहिती घेऊन, योग्य दर आल्यानंतर विक्री करतात. बाजारात चांगले दर असल्यास एकाच वेळी सर्व कांद्याची विक्री करतात. अन्यथा, टप्प्याटप्प्याने कांदा विक्री करत जातात. त्यामुळे एकदम नुकसान होणे टळते. पैसेही खेळते राहतात.
 • गेल्या वर्षी उन्हाळी हंगामातील कांद्याला कमी दर मिळाले. तर खरीप हंगामातील कांद्याला प्रति क्विंटल सरासरी १३०० ते १४०० रुपये दर मिळाले.
 • २०१४ पर्यंत कांद्याला बाजारात प्रति क्विंटलला चार ते साडे चार हजार रुपये एवढा दर मिळत होता. त्यानंतर दरामध्ये काही प्रमाणात घसरण होत गेली, असे ते आवर्जून सांगतात. २०१८ मध्ये प्रति क्विटंल सरासरी केवळ १४०० रुपये दर मिळाला. खर्च वजा जाता चालू वर्षी एकरी एक लाख रुपये उत्पन्न मिळाले. सध्या बाजारात प्रति क्विंटल १००० ते ११०० रु. असा दर आहे. परिणामी  कांद्याची साठवण करून योग्य दर येण्याची वाट पाहत असल्याचे जगन्नाथ यांनी सांगितले.
 • कांद्याच्या उत्पन्नामुळे कुटुंबाचा उंचावला स्तर
 • कमी पाणी व कालावधीमध्ये कांद्यापासून चांगले उत्पन्न मिळत आहे. पूर्वीच्या तुलनेमध्ये दर कमी झाले असून, नफ्याचे प्रमाण घसरले असले तरी कमी पावसाच्या भागामध्ये कांदा हे पीक परवडते. खरिपातील अन्य पिकांचीही जोड होते. चार भावांसाठी अडीच हजार स्क्वेअर फुटांचे चार बंगले शेतात बांधले आहेत. पाण्याचे उत्तम नियोजन आणि कांदा पिकातील उत्तम शेतकरी असला नावलौकिक परिसरामध्ये झाला आहे.

उत्पन्न आणि खर्चाचा ताळेबंद

 • कांदा पिकातून एकरी एक ते दीड लाख रुपये उत्पन्न मिळते. दरवर्षी सुमारे ३५ एकर कांदा असतो.
 • याशिवाय चार एकर टोमॅटो असून, एकरी उत्पादन खर्च सव्वा ते दीड लाख होतो. उन्हाळी टोमॅटोचे उत्पादन ३० ते ३५ टन मिळते. सरासरी दर ८ ते १२ रुपये प्रतिकिलो प्रमाणे मिळतो. त्यापासून एकरी ३.५ ते ४.२ लाख रुपये उत्पन्न मिळते.
 • चार एकर टरबूज असून, त्यासाठी एकरी ५० हजार रु. खर्च होतो. उत्पादन ३० टनापर्यंत मिळते. सरासरी दर ८.५ रुपये प्रतिकिलो प्रमाणे खर्ज वजा जाता एकरी अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.
 • कुटुंबातील १२ मुलांचे शिक्षण असून, त्यासाठी सुमारे ९-१० लाख रुपयांचा खर्च होतो. याशिवाय कुटुंबाचा आर्थिक खर्च सुमारे १८-२० लाख रुपयांचा खर्च होतो. शेतीसाठी १५ -२० लाख रुपयांचा खर्च होतो. खर्चासाठीची रक्कम बाजूला ठेवल्यानंतर चार भावांच्या नावे मुदत ठेव ठेवली जाते. अडीअडचणी वेळी ही शिल्लक रक्कम वापरली जाते.

कांदा पिकाचा संपूर्ण ताळेबंद

वर्ष   क्षेत्र (एकर)   उत्पादन (क्विंटल)   सरासरी दर (रु.)  खर्च
(एकरी,रु.) 
उत्पन्न
(लाख रु.)
२०१०  १५   १५०० २०००  ८०००  ३०
२०१४ २५ २४००   १६००  २०५००  ३८.४०
२०१७ ३०   ४००० २२०० २६००० ८८
२०१८   ३५  ६०००  ८००  ३००००  ४८

     : जगन्नाथ नेहे, ९८६०४४१८०५

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
‘कृष्णा’ आली दिघंचीच्या अंगणीदिघंची, जि. सांगली ः  अनेक वर्षे दिवास्वप्न...
जनावरांच्या बाजारातील व्यवहार उधारीवरचपरभणी: खरिपाच्या पेरणीच्या तोंडावर काहीशी...
सहकार विभाग आयुक्तांविना पोरकापुणे : गेल्या आठ महिन्यांपासून राज्याच्या सहकार...
आत्मा प्रकल्प संचालक चौकशीत दोषीपुणे: कृषी खात्यातील वादग्रस्त अधिकारी बी. एन....
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ‘व्होट शेअर’...पुणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता...
खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड सुरू जळगाव ः खानदेशात मुबलक जलसाठे किंवा कृत्रिम...
कोकण वगळता उष्ण लाटेचा इशारापुणे : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या...
शेतकऱ्यांनो विकते ते पिकवाः डॉ. भालेअकोला ः येत्या हंगामात पीक लागवड करताना...
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
हरवले जलभान कोनाड्यात‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’...
मोदी लाटेचे गारुडसतराव्या लोकसभेचे भवितव्य स्पष्ट झालेले आहे. खरे...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...
राजू शेट्टींच्या पराभवाने शेतकरी...कोल्हापूर ः शेतीविषयक विविध प्रश्‍नांबाबत देश...
मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित...नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...