नियोजन, काटेकोर अंमलबजावणीतून साधला उत्पन्नाचा ताळमेळ

नियोजन, काटेकोर अंमलबजावणीतून साधला उत्पन्नाचा ताळमेळ
नियोजन, काटेकोर अंमलबजावणीतून साधला उत्पन्नाचा ताळमेळ

शेतीतील वाढता खर्च ही शेतकऱ्यांसमोरची मुख्य समस्या आहे. योग्य नियोजन केल्यास उत्पादन खर्च कमी करून निव्वळ नफा वाढवणे शक्य असल्याचे पेनूर (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथील सिद्धेश्वर माने यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी पाणी आणि मजुरांच्या कमतरतेवर मात करण्यासाठी पीक व व्यवस्थापनामध्ये बदल करत यांत्रिकीकरणाचा पर्याय स्वीकारला आहे. तसेच द्राक्ष, डाळिंब बागेतही शेवगा, झेंडू अशा आंतरपिकातून खेळता पैसा उभा केला.

सोलापूर जिल्ह्यातील पेनूर (ता. मोहोळ) येथे सोलापूर-पंढरपूर महामार्गावर सिद्धेश्वर माने यांची सात एकर शेती आहे. सिद्धेश्वर माने हे बी. एस्सी (केमिस्ट्री) पदवीधर असूनही गेल्या पंधरा वर्षांपासून पूर्णवेळ शेती करतात. योग्य नियोजन करण्यासोबत अंमलबजावणीतील काटेकोरपणा ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. परिसरामध्ये प्रयोगशील शेतकरी अशी ओळख मिळाली आहे. त्यांचा त्यांच्याकडे कालव्यालगतची विहीर आणि चार बोअरवेल असे पाण्याचे स्रोत आहेत. मात्र, २०१२-१३ पासून मजुरांची व पाण्याची कमतरता वाढू लागल्याने पिकामध्ये बदल केला. पूर्वी त्यांच्याकडे एक एकर ऊस, तीन एकर बोर आणि तीन एकर डाळिंब अशी पीक पद्धती होती. त्यातील ऊस आणि बोर पिकांऐवजी द्राक्ष (तीन एकर), एक एकर लिंबू आणि  तीन एकर डाळिंब अशी रचना केली. या फळबागेमध्ये आंतरपीक म्हणून झेंडू आणि शेवगा लागवड करतात. यातून नव्या बागेचा खर्च आणि उत्पन्न यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. संरक्षित पाण्यासाठी २.५ लाख रुपये खर्चून २५ लाख लिटर क्षमतेचे शेततळे केले आहे.

आंतरपिकातून खेळता राहतो पैसा

  •     गेल्या नऊ वर्षांपासून डाळिंब बागेमध्ये ते ओडिसी शेवग्याचे आंतरपीक घेतात. सात फूट बाय पाच फूट अंतरावर एकरी १२५० झाडे आहेत. यंदाही जूनमध्ये शेवग्याचा बहर त्यांनी धरला. सहा महिन्यांत डिसेंबरला त्याची काढणी सुरू झाली. या वर्षी एकरी सहा टन उत्पादन मिळाले. त्याला सरासरी १५ ते ३० रुपये प्रति किलो या प्रमाणे सरासरी २० रुपये दर मिळाला. शेवगा उत्पादनासाठी झालेला ५० हजार रुपये खर्च वजा जाता १ लाख ३० हजारांचा निव्वळ नफा मिळाला.
  •     डाळिंबाच्या दुसऱ्या एक एकर क्षेत्रामध्ये ऑागस्टमध्ये झेंडूची लागवड केली. सात फूट बाय दोन फूट अंतराप्रमाणे एकरी सहा हजार रोपे बसली. पुढे ऑाक्टोबरपासून ऐन दिवाळीमध्ये त्याची काढणी सुरू झाली. झेंडूचे सव्वाटन उत्पादन मिळाले असून, त्याला २० ते ३० रुपये प्रति किलो या प्रमाणे सरासरी २५ रुपये दर मिळाला. त्यातून ३१, २५० रुपये मिळाले. २० हजार रुपये उत्पादन खर्च वजा जाता ११,२५० रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले.
  •     आंतरपिकातून १ लाख ४१ हजार रुपये उत्पन्न हाती आले.
  •     आंतरपिके प्रामुख्याने खरीप आणि रब्बी हंगामामध्ये घेतली जातात. उन्हाळ्यामध्ये उपलब्ध पाणी केवळ फळबागेसाठी राखून ठेवले जाते. त्याच प्रमाणे उन्हाळ्यामध्ये जमीन चांगली तापून कीड व रोगाचे अंश नष्ट होतात.
  •     डाळिंब बागेमध्ये झेंडू उत्पादन घेत असल्यामुळे सूत्रकृमींचा प्रादुर्भाव होत नाही. डाळिंबाचेही उत्पादन उत्तम येण्यास मदत होते.
  • मजूर खर्चावर यांत्रिकीकरणाचा उपाय शेतीमध्ये कुशल मजुरांची कमतरता भासत आहे. परिणामी मजुरीवरील खर्चात वाढ होत आहे. द्राक्ष आणि डाळिंबासारख्या फळबागामध्ये  कुशल मजुरांशिवाय पर्यायच नाही. वर्षाकाठी फक्त मजुरीवर त्यांचा चार लाखापर्यंत खर्च होत होता. मात्र, अलीकडे बहुतांश कामांसाठी ट्रॅक्टरचा वापर वाढवला आहे. नांगरणी, खुरपणी, कोळपणी किंवा फवारणी यासाठी ट्रॅक्टरचा सर्रास वापर करत असल्याने खर्चात निम्म्यापर्यंत बचत झाली आहे.

    द्राक्ष, डाळिंबाच्या उत्पन्नावर नियोजन

  •     गेल्या वर्षी द्राक्षाचे एकरी १२ टन उत्पादन मिळाले. साधारणपणे प्रतिकिलो सरासरी ४९ रुपये इतका दर मिळाला. त्यातून एकरी सहा लाख रुपये मिळाले. या वर्षी द्राक्षाचे एकरी १७ टन उत्पादन अपेक्षित आहे. या वर्षी सुपर सोनाका वाणाला ५५ रुपये, तर माणिक चमन वाणाला ५१ रुपये प्रति किलो या प्रमाणे दर मिळाला आहे. सरासरी ५३ रुपये या प्रमाणे तीन एकरातून २७ लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.
  •     उत्पादनाच्या पहिल्या वर्षी डाळिंबाला सरासरी ४० ते ४५ रुपये इतका दर मिळाला होता. खर्च वजा जाता एकरी एक लाख रुपये मिळाले. यंदा आतापर्यंत दोन टन उत्पादन हाती आले असून, त्याला सरासरी ४२ रुपये दर मिळाला आहे. आणखी ८ टन उत्पादन मिळणे अपेक्षित आहे. डाळिंबातून १२.६० लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.
  •     मुख्य पीक असलेल्या द्राक्ष आणि डाळिंबाच्या एकूण उत्पन्नावरच संपूर्ण कुटूंबाची भिस्त असते. त्यातून पीक कर्ज भागवण्यासोबत चालू वर्षीचे अन्य खर्च भरून निघतात. आगामी वर्षासाठी तजवीज म्हणून तील नियोजन केले जाणार आहे.
  •     लिंबू बाग ही यंदा पाच वर्षाची झाली आहे. यावर्षापासून उत्पादन घेण्यास सुरवात केली असून, आतापर्यंत साधारण एक टन उत्पादन बाजारात पाठवले आहे. त्याला २० ते ६८ रुपये प्रति किलो (सरासरी ५० रुपये) असा दर मिळाला आहे. या बागेतून प्रति वर्ष ३ ते ४ लाख रुपये उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे.
  • वार्षिक नियोजन आणि आर्थिक तजवीज द्राक्ष फळबाग अत्यंत खर्चिक आहे. मजुरी, खते-बुरशीनाशके व अन्य असा एकरी दोन लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. तर डाळिंबाला एकरी ७० हजार रुपये आणि लिंबू बागेसाठी एकरी ३० हजार रुपये असा खर्च येतो. एकूण बागेचा वार्षिक खर्च ११ ते १२ लाख रुपये होतो. माने यांच्या उत्पन्नाचा आधार केवळ शेती आहे. उत्पादन खर्चाची तजवीज करताना पीक कर्ज उपयुक्त ठरते. दरम्यानच्या काळात आंतरपिकातून मिळणाऱ्या खेळत्या १.५ लाख रुपयांची प्रचंड मदत होते.  ः सिद्धेश्वर माने, ९९६०२७५३११, ९८३४४२२९११

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com