दूध दर कमी असतानाही मूल्यवर्धित शेणखताने तारले

दूध दर कमी असतानाही मूल्यवर्धित शेणखताने तारले
दूध दर कमी असतानाही मूल्यवर्धित शेणखताने तारले

वाढता उत्पादन खर्च, तुलनेने कमी झालेले दूध दर यामुळे दूध उत्पादक शेतकरी हतबल झाले अाहेत. मात्र, सातारा जिल्ह्यातील आदर्की (ता. फलटण) येथील धनाजी जाधव यांनी न खचता मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. शेणावर सेंद्रिय घटकांच्या प्रक्रिया करून मूल्यवर्धन केले आहे. एक ते ५० किलो पॅकिंगमध्ये विक्री करतात. साध्या शेणखताच्या तुलनेत उत्तम दर मिळाल्याने वर्षअखेर चार ते सहा लाख रुपयांची उलाढाल होत आहे.  

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात दुग्ध व्यवसाय चांगलाच बहरला आहे. येथील आदर्की (बुद्रुक) हे सातारा-फलटण रस्त्यावरील सुमारे पाच हजार लोकसंख्येचे गावही दुग्धव्यवसायाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.  गावात शंभरपेक्षा अधिक बंदिस्त व मुक्तसंचार पद्धतीचे गाईचे गोठे आहेत. आदर्कीतील प्रगतशील शेतकरी धनाजी जाधव यांचाही २२ गुंठे क्षेत्रावर ६५ गाईंचा मुक्तसंचार गोठा आहे. स्वतःच्या १५ एकर शेतीमध्ये या जनावरांच्या चाऱ्यासाठी ज्वारी, मका, कडवळ व काही क्षेत्रावर ऊस घेतात. २००७ मध्ये मुक्तसंचार गोठा पद्धतीने सुरू केल्यानंतर टप्प्याटप्प्याने गाईंच्या संख्या वाढवत नेली. २०१४-१५ मध्ये दुधाचे दर १७ ते १८ रुपये प्रति लिटरवर आल्याने दुग्ध व्यवसाय परवडेनासा झाला. मग व्यवसाय किफायतशीर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. दरम्यान, कृषी विभागाच्या आत्माचे तत्कालीन संचालक गणेश घोरपडे, विस्तार अधिकारी युवराज सांगळे, फलटण येथील गोविंद डेअरीचे सहाय्यक व्यवस्थापक डॉ. शांताराम गायकवाड यांच्याशी संपर्क झाला. त्यांच्यासोबतच्या चर्चेतून शेणखताच्या मूल्यवर्धन व पॅकेजिंगची कल्पना पुढे आली. त्यानुसार, धनाजी यांनी शेणखत निर्मिती प्रयोग सुरू केले. त्याचे मार्केटिंगही केले. सध्या व्यवसायास चार वर्ष झाली असून, उत्तम विक्री व्यवस्थापनातून ४ ते ६ लाखांची उलाढाल होते.

जनावरांची संख्या व उत्पादन ः १) मुक्तसंचार पद्धतीचा गोठा व चाळण यंत्रणा यासाठी सुमारे २२ गुंठे जागा.  

  • लहान-मोठ्या ६५ गाई. (चार देशी, सहा जर्सी, उर्वरीत एचएफ.)
  •  दररोजचे सरासरी ३०० लिटर दूध उत्पादन.
  • २) शेळ्यांचा गोठा

  • मुक्तसंचार पद्धती.
  • एकूण ७० शेळ्या (पैदाशीसाठी ३२ शेळ्या असून, सध्या विक्रीयोग्य बोकड २७, शेळ्या १० आहेत.)
  • ३) कडकनाथ कोंबड्या - २५ (साधे शेड तयार केले आहे.) ४) देशी कोंबड्या - गोठ्यामध्ये मोकळ्या सोडल्या जातात. ५) शेततळे - १०० फूट बाय १०० फूट बाय ३० फूट. याला स्वतःचे जिवंत झरे आहेत. यात घरगुती वापरासाठी मत्स्यबीज सोडले आहेत.

    असे तयार होते मूल्यवर्धित शेणखत

  •  मुक्तसंचार गोठ्यात सर्वत्र पाचटाची कुट्टी, काडीकचरा आदी घटक पसरतात.
  •  दिवसभरात साधारणपणे २०० ते २५० लिटर गोमूत्र व ४०० ते ५०० किलो शेण गोठ्यात पडत राहते.
  • गायींच्या मुक्त वावरामुळे पाचट, शेणखत हे घटक एकत्र मिसळतात. हे मिश्रण सुमारे २५ दिवस तसेच ठेवले जाते.
  • या काळात ८ दिवसांच्या अंतराने दोन वेळा इ एम द्रावणाची फवारणी करतात. शेणखत चांगले कुजण्यास मदत होते.
  • २५ दिवसांनी जिवामृताची प्रक्रिया करतात.  
  • त्यानंतर हे सर्व शेणखत यंत्राच्या साह्याने चाळून घेतले जाते. ढीग लावून प्लॅस्टिक पेपरने हवाबंद करून एक ते दीड महिना ठेवतात.
  • अधूनमधून पाणी शिंपडून आवश्यक अोलावा ठेवला जातो.
  • सर्व प्रक्रियेनंतर शेणखत पूर्णपणे चांगले कुजते.
  • उत्पादन

  •  खतनिर्मिती हा वर्षभराचा व्यवसाय असला तरी पावसाळ्यात जनावरांचे मूत्र वाहून जाते. परिणामी डिसेंबर ते जूनपर्यंत खत निर्मिती करतात.
  •  जुलै ते नोव्हेंबर या काळात खताला मागणी असते.  
  •  एका बॅचमध्ये (सुमारे ३० दिवस कालावधी) सुमारे पाच ते सहा टन प्रक्रियायुक्त शेणखत तयार होते.
  • दर्जामुळे किमतीमध्ये मिळते चांगली वाढ :

  • दोन वर्षांपूर्वी बारामती कृषी विज्ञान केंद्रातून प्रक्रियायुक्त शेणखताची तपासणी केली. त्यामध्ये नत्र-स्फुरद व पालाश यांचे प्रमाण भरपूर आहे. या शेणखताचे शेतातील वापराचे निष्कर्ष चांगले मिळत असल्याचे नियमित ग्राहक शेतकऱ्यांचे मत आहे. कच्चे शेणखत साधारणपणे पाच हजार रुपये प्रति ट्रेलर जाते. प्रति किलो सुमारे अडीच रुपये दर होतो. त्याच शेणखतावर प्रक्रिया व पॅकेजिंग केल्याने त्याचा दर किलोमागे सरासरी ७.५ रुपयांनी वाढत असल्याचे धनाजी यांनी सांगितले.
  • उत्तम पॅकेजिंग : धनाजी यांनी मूल्यवर्धित शेणखताचे साई समुद्धी नावाने एक किलोपासून ५० किलोपर्यंत पॅकिंग केले आहे. त्याची विक्री १० रुपये प्रति किलो दराने होते. एक टन खत निर्मितीसाठी इ एम द्रावण, जीवामृत, चाळणी असा सर्व खर्च सुमारे २ हजार रुपयांपर्यंत येतो.
  • सेंद्रिय शेतीचे प्रमाण वाढत असले तरी शेणखताची उपलब्धता तुलनेने कमी आहे. अनेक शेतकरी प्रक्रियायुक्त शेणखतांचा वापर करतात. महाबळेश्र्वर तालुक्यातील स्ट्राँबेरी उत्पादकांकडून सर्वाधिक मागणी असून, अगदी सांगली, पुणे येथील शेतकऱ्यांकडून मागणी वाढत आहे.
  • पुणे शहरातून बागकामासाठी एक ते दहा किलो पॅकिंगला  मागणी असून, तिथे कायमस्वरुपी स्टॉल सुरू करण्याचे नियोजन आहे.
  • दर्जात वाढ आणि खर्चातील बचतीसाठीच्या उपाययोजना ः

  •  खाद्यामध्ये ओला आणि वाळला चारा यांचे प्रमाण योग्य ठेवले जाते. त्यासाठी या वर्षी १० टन बगॅस (२६ हजार रु.), २००० पेंड्या कडबा, ४ ट्रेलर गव्हाचे काड, तुस, २ ट्रेलर हरभरा भुसकट, ४ ट्रेलर मका कुट्टी परिसरातील शेतकऱ्यांकडून स्वस्तामध्ये मिळवले आहे. ते चांगले वाळवून, प्रत्येक थरावर मीठ टाकून मूरघास तयार केला आहे. मार्च ते मेअखेर चांगले मुरल्यानंतर एक जूनपासून तो वाळलेला चारा जनावरांना सुरू केला.  यासाठी सुमारे ४० हजार रुपये खर्च झाला तरी उत्तम दर्जाचा वाळलेला चारा प्रति दिन व गाय दोन किलो प्रमाणे तो पावसाळ्याच्या पाच महिन्यासाठी जनावरांना पुरेल, असे धनाजी यांनी सांगितले.
  •  मुक्तसंचार पद्धतीमुळे मजुरांमध्ये बचत झाली.
  •  विविध कामांसाठी यंत्रांचा वापर करत असल्याने मनुष्यबळ आणि खर्चात बचत होते. उदा. शेण गोळा करण्यासाठी ट्रॅक्टर, भरणीसाठी जेसीबी, कडबा कुट्टी यंत्र (ओला चारा ४ टन प्रति तास क्षमता.) , मिल्किंग मशीन (दोन बकेट. दीड तासात दूध काढणे शक्य होते.), शेणखत चाळणी यंत्र.  
  • संकलन केंद्र

  • धनाजी यांनी परिसरामध्ये अनेक शेतकऱ्यांना मुक्त संचार गोठे उभारणी, गोठ्यात शेणखतावरील प्रक्रिया करण्यासंदर्भात मदत करतात.
  • दुधासाठी २००० लिटर क्षमतेचा बल्क कुलर व संबंधित सर्व यंत्रणा आहे. स्वतःचे प्रति दिन ३०० लिटर दुधासह परिसरातील शेतकऱ्यांचे ११०० लिटर दूध गोळा होते. प्रति लिटर दोन रुपये कमिशन दूध संघाकडून मिळतात. या कमिशनमधील २५ पैसे दूधउत्पादक शेतकऱ्यांना दराव्यतिरीक्त दिले जातात. अन्य वीजबिल, देखभाल व मनुष्यबळ असा सर्व खर्च ७५ पैसे गेला तरी एक रुपये प्रति लिटर शिल्लक राहतात.
  • संपर्क ः धनाजी जाधव, ७५०७५६६६३०

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com