दुग्धव्यवसायातून देगावकरांनी केला शेतीवरील भार कमी

दुग्धव्यवसायातून देगावकरांनी केला शेतीवरील भार कमी
दुग्धव्यवसायातून देगावकरांनी केला शेतीवरील भार कमी

वाशिम जिल्ह्यात देगावच्या अर्थकारणात ‘दूध’ हा महत्त्वाचा घटक ठरतो अाहे. काही कुटुंबांकडे शेतीचे अधिक क्षेत्र असतानाही पूरक म्हणून त्यांनी दुग्ध व्यवसायावर लक्ष केंद्रित केले. अाज या व्यवसायातील उत्पन्नातून शेतीवरील भार कमी करणे त्यांना शक्य झाले आहे. वाशिम जिल्ह्यातील देगाव हे साधारणतः दीड हजार लोकवस्तीचे गाव. बारमाही सिंचनाच्या सुविधा नसल्याने हंगामी सिंचनाद्वारे बहुतांश शेती कसली जाते. बहुतांश भार खरीप हंगामावरच अवलंबून अाहे. गेल्या काही वर्षांत गावच्या अर्थकारणात ‘दूध’ हा महत्त्वाचा घटक ठरत चालला अाहे. काही कुटुंबांकडे शेतीचे मोठे क्षेत्र असतानाही जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. अाज या व्यवसायातील कमाईमुळे शेतीवरील भार कमी करणे त्यांना शक्य झालेच. शिवाय कुटुंबांच्या अर्थकारण वाढीस मोठा हातभार लागत अाहे. कुटुंबाची अार्थिक भरभराट होत अाहे. भुतेकर, गायकवाड कुटुंबांनी या व्यवसायात चांगला जम बसविला अाहे. भुतेकर कुटुंबाचा दूग्ध व्यवसायात प्रवेश देगावमध्ये गजानन भुतेकर यांचे चौघा भावांचे कुटुंब राहते. त्यांच्याकडे ३५ एकर शेती अाहे. सोयाबीन, तूर, हळद ही खरिपातील मुख्य पिके तर रब्बीत गहू, हरभरा ते पिकवतात. सन २०१५ मध्ये चार म्हशी विकत घेत त्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला. अाज ही वाटचाल दहा म्हशी व दोन गायीपर्यंत येऊन पोचली अाहे. दररोज सुमारे ११० लिटर दुधाचे संकलन होते. हे दूध गजानन रिसोडला नेऊन घरोघरी रतीब देतात. आपले ३५ एकर क्षेत्र असतानाही दुग्धव्यवसायच चांगला आधार देत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. ते पूर्णवेळ दुग्धव्यवसायाची जबाबादारी सांभाळतात. दुग्धव्यवसायाचे नियोजन दुधाळ म्हशींना दररोज सरकी ढेप, अोला-कोरडा चारा दिला जातो. बारमाही अोला चारा मिळावा यासाठी गोठ्यालगतच्या शेतात मका, चारा पिकाची लागवड केली आहे. शेतातून चारा कापून त्याची कुट्टी जनावरांना दिली जाते. यासोबतच पाणी, अारोग्याचीही विशेष काळजी घेतली जाते. करडा कृषी विज्ञान केंद्रातील पशुविज्ञान विषयातील तज्ज्ञ डॉ. डी. एल. रामटेके यांच्याशी सातत्याने संपर्कात राहून सल्ला घेतला जातो. गरजेनुसार डॉ. रामटेकेदेखील देगावला येऊन मार्गदर्शन करतात. योग्य व्यवस्थापनामुळे दुधाचे उत्पादन कायम टिकून राहते. म्हशीचा दुभता काळ संपल्यानंतर तिची विक्री करून नवी म्हैस खरेदी केली जाते. शेतीला फायदा दुग्ध व्यवसायाचा फायदा शेतीलाही होत अाहे. गरजेच्यावेळी त्यातून पैसे उपलब्ध असतात. दरवर्षी सुमारे ५० ट्रॉली शेणखत मिळते. त्याचा वापर शेतात होत असल्याने जमिनीची सुपीकता वाढत चालली अाहे. पिकांच्या उत्पादनवाढीला त्याची मदत होत आहे. भुतेकर कुटुंबाने दोन शेततळी घेतली असून त्यात मत्स्यपालन सुरू केले आहे. पूर्वी पारंपरिक पिकांच्या भरवशावर अवलंबून असलेले भुतेकर यांचे अार्थिक नियोजन दुग्धव्यवसाय, मत्स्यपालन अशा जोड व्यवसायांमुळे अधिक सुकर झाले आहे. अाता कुक्कुटपालनाकडेही त्यांनी लक्ष केंद्रित केले अाहे. गायकवाड यांचाच पहिला आदर्श देगावमध्ये सर्वात प्रथम ज्ञानेश्वर गायकवाड यांनी काळाची पावले अोळखत दुग्धव्यवसायाला सुरवात केली. मागील १६ वर्षांपासून ते यामध्ये व्यस्त अाहेत. दोन म्हशींपासून त्यांनी व्यवसायाची सुरवात केली होती. सध्या १५ म्हशींचा ते सांभाळ करतात. गायकवाड यांचा तिघा भावांचा परिवार आहे. कुटुंबाची १८ एकर शेती अाहे. त्यापैकी सहा एकरात सिंचनाची सोय अाहे. दोघे भाऊ मिळून शेती व दुग्धव्यवसाय हाताळतात. दररोज सुमारे १०० लिटर दूध काढले जाते. रिसोड येथे ग्राहकांना ते घरपोच नेऊन दिले जाते. पैकी अर्धे दूध ग्राहकांना घरपोच व अर्धे हॉटेल व्यावसायिकांना दिले जाते. देगाव झाले दूध पुरवठादार गाव रिसोड या तालुका मुख्यालयापासून अवघ्या अाठ किलोमीटरवर देगाव अाहे. गावात १०० हून अधिक म्हशी व अन्य दुधाळ जनावरे अाहेत. सकाळ-संध्याकाळ मिळून गावातून पाचशे लिटरहून अधिक दूध रिसोड शहरात जाते. यातील बहुतांश दुधाचे घरोघरी रतीब घातले जाते. त्यातून ग्राहकांना चांगल्या दर्जाचे दूध ५० रुपये प्रतीलिटर दराने उपलब्ध होते. या शहरातील असंख्य ग्राहक देगावमधील दुधावरच अवलंबून अाहेत, असे भुतेकर व गायकवाड यांनी सांगितले. देगावची भरभराटीकडे वाटचाल देगावचे अर्थकारण पूर्वी शेतीवरच अवलंबून होते; परंतु अाता या छोट्याशा गावात दुधाळ जनावरांचे संगोपन करणाऱ्यांची संख्या वाढत चालली अाहे. यामुळे दररोज पैसा गावात येतो. गावकऱ्यांनी एकजुटीतून विकासाकडेही वाटचाल सुरू केली आहे. गावातील बहुतांश अंतर्गत रस्ते चकचकीत झालेले असून स्मार्टग्राम योजनेतही गाव चमकले अाहे. पूरक व्यवसायांची कास धरल्याने शेतीवरील भार कमी होण्यास मदत झाली अाहे. शिवाय रोजगार निर्मितीलाही चालना मिळत अाहे. अनेक कुटुंबांचे अार्थिक नियोजन सुधारत अाहे. करडा कृषी विज्ञान केंद्राकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनाचाही व्यवसायाला फायदा होत असल्याचे शेतकरी सांगतात. देगाव- दुग्ध व्यवसाय वैशिष्ट्ये

  • देगाव ते रिसोड अंतर ८ किलोमीटर
  • दुधाचे घरोघरी वितरण
  • दुधाला ५० रुपये प्रतिलिटर दर
  • गावात १०० हून अधिक अधिक म्हशींचे पालनपोषण
  • गावातील कुटुंबांच्या अर्थकारणाला बळकटी
  • रोजगारनिर्मिती
  • शेतीवरील भार कमी होण्यास मदत
  • गजानन श्रीराम भुतेकर-८६०५६५३८८२ डॉ. डी. एल. रामटेके-८८८८०४०२३६

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com