अभ्यासू, प्रयोगशील युवकाची एकात्मिक, व्यावसायिक शेती

 अभ्यासू, प्रयोगशील युवकाची एकात्मिक, व्यावसायिक शेती
अभ्यासू, प्रयोगशील युवकाची एकात्मिक, व्यावसायिक शेती

‘बीएस्सी ॲग्री’ची पदवी, त्यानंतर सुमारे १० वर्षे नोकरी केलेल्या संजय राऊत या तरुणाने आता पूर्णवेळ व्यावसायिक शेतीवर लक्ष केंद्रित केले आहे. अत्यंत सकारात्मक व उत्साहवर्धक वृत्ती, प्रयोग करण्याची धडपड यातून एकात्मिक व व्यावसायिक पीकपद्धतीचा आदर्श त्याने उभा केला आहे. नगर जिल्ह्यात कोल्हारपासून जवळच असलेल्या भगवतीपूर (ता. राहाता) येथील संजय राऊत या युवा शेतकऱ्याची बारा एकर शेती आहे. आपले आई-वडील व बंधू यांच्या मदतीने तो शेती करतो. पूर्वी या शेतीत पारंपरिक शेती व्हायची. मात्र, शेतीत बदल घडवल्याशिवाय आपली प्रगती होणार नाही हे संजय यांनी जाणले. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले. संजय यांची पीकपद्धती

  • जोखीम कमी करण्यासाठी एकात्मिक शेती वा पीकपद्धतीचा अंगीकार
  • यात सहा एकर ऊस, दोन एकर लसूणघास, एक एकर पेरु व अलिकडेच वीस गुंठे क्षेत्रात सघन पद्धतीने शेवगा लागवड
  • प्रत्येक पीक वेगळ्या प्रकारचे. कमी कालावधीत, कमी देखभाल खर्चात येईल अशा पिकाची निवड
  • सहा एकरांतील उसाचे एकरी ६० टनांपर्यंत उत्पादन मिळते. हे पीक दीर्घ कालावधीचे आहे. मात्र ते शाश्वत उत्पन्न देऊ शकते.
  • शेवग्याचे उत्तम नियोजन

  • संजय यांची जमीन भारी, काळी कसदार आहे. हा भाग अवर्षणग्रस्त असला तरी भंडादरऱ्याचे पाणी मिळत असल्याने पाणी उपलब्ध होते. खरे तर मध्यंतरी शेवगा पिकाचे दर अत्यंत पडले होते. अनेकांनी हे पीक काढून टाकले होते. मात्र कोणतेही पीक घेतले तर तीन वर्षांत एखाद्या वर्षी तरी दर सापडू शकतो असा अनुभव संजय यांच्याकडे जमेस होता. दोन वर्षांत दर मिळाला नाही, यंदा तो मिळेल असा अंदाज त्यांनी घेतला.
  • बिगरहंगामात शेवगा बाजारात आला पाहिजे असे नियोजन केले. रमजान काळात फळे बाजारात आली तर जास्तीचा दर मिळतो. हा फळातील ट्रेंड शेवगा पिकासाठी उपयोगात आणला. जूनमध्ये लागवड केल्याने पहिला शेवगा बिगरहंगामी काळात १५ एप्रिलच्या सुमारास बाजारात आला. पुढे २७ जुलैपर्यंत शेवगा सुरू होता.
  • लागवडीमध्ये सघन पद्धत वापरली. १२ बाय ६ फूट अंतर ठेवले. एकरी ३०० झाडे बसवली.
  • शेवगा घेण्यापूर्वी बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ पुरुषोत्तम हेंद्रे, शांताराम सोनवणे, सुनील बोरुडे आणि भरंत दवंगे यांच्याशी चर्चा केली. संजय यांनी येथेच दहा वर्षे नोकरी केली.
  • घरी रोपे तयार केली. प्रत्येक रोपापासून दीड फूट अंतरावर ठिबकचे ड्रीपर ठेवले.
  • संजय सांगतात की शेवगा हलक्या जमिनीतील कमी पाण्यात येणारे पीक आहे. परंतु माझी जमीन भारी, काळी कसदार, पाण्याचा निचरा न होणारी असल्याने बेडवर रोपे लावली. त्यामुळे पाऊस जास्त झाला तरी पाण्याचा निचरा व्हावा हा उद्देश साध्य झाला.
  • सुरवातीला शेणखत व गांडूळखताचा वापर केला. प्रत्येक रोपास दोन ते तीन किलो गांडूळखत दिले. व्हर्मी वाॅश आणि जिवाणू स्लरीचा वापर केला.
  • रसशोषक किडीच्या बंदोबस्तासाठी करंज तेल आणि निंबोळी तेलाचा वापर केला.
  • उत्पादन, विक्री व दर

  • साधारण २० गुंठ्यांत १४०० किलो किंवा प्रति झाड ६ किलो उत्पादन मिळाले.
  • त्याला सुरवातीला ४० रुपये प्रति किलो दर सुरू होता. हा दर किमान २० रुपयांपासून कमाल ८० रुपये असाही मिळाला.
  • आता पुन्हा छाटणी केली आहे. शेंग पुन्हा पुढील जानेवारीनंतर बाजारात येईल. ती बिगरहंगामी असेल. त्यामुळे दर चांगला मिळू शकेल असे संजय यांना वाटते. स्थानिक बाजारपेठेबरोबरच संगमनेर, राहाता, राहुरी या बाजारपेठा नजिक असल्याने विक्री करणे सोपे होते. पाच किलोच्या शेंगांचे पॅकिंग केले. एका वेळेस पन्नास किलोपर्यंतच काढणी केली. पहिल्याच वर्षी साधारण ७० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. अधिकाधिक सेंद्रिय शेवगाच होता.
  • व्यावसायिक गांडूळखत प्रकल्प : उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्यासाठी चार टन क्षमतेचा गांडूळखत प्रकल्प २०१५ मध्ये सुरू केला. त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला. मग गेल्यावर्षी सहा टन क्षमतेचा आणखी एका शेडमध्ये प्रकल्प सुरू केला. आज दोन्ही शेडस मिळून दहा टन गांडूळखत साधारण दोन महिन्यांत तयार होते. चाळीस किलोला ३२५ रुपये या दराने वर्षाला साधारण ४० टनांपर्यंत विक्री होते. त्यातून चांगले उत्पन्न मिळते. घरी पाच जनावरे आहेत. उर्वरीत शेणखत विकत घेतले जाते. पेरू सघन पद्धतीने दोन वर्षांपूर्वी पेरूची लागवड केली आहे. एका एकरात सुमारे ३०२ झाडे बसली आहेत. यंदा ५ ते ६ क्रेट उत्पादन घेतले. मात्र पुढील वर्षापासून खऱ्या उत्पादनास प्रारंभ होईल. लसूणघास दोन एकरांत लसूणघास घेतला आहे. पुणे, मुंबई येथे तो घोड्यांना खाद्य म्हणून जातो. त्यास प्रति किलो २.७५ रुपये दर मिळतो. त्यातील एक रुपया खर्च धरल्यास उर्वरित रक्कम नफा असते. थेट शेतात येऊन घास नेला जातो. वर्षभरात सुमारे तेरा ते पंधरा कापण्या होतात. प्रत्येक कापणीस चार टन घास मिळतो. वर्षभरात साठ टन घासाची विक्री होते. शेती व्यवस्थापनात भाऊ विजय, भावजय सौ. स्वाती, पत्नी सौ. स्वाती, वडील बबन व आई रुक्मिणीबाई राऊत यांची मोठी मदत संजय यांना होते. संपर्क - संजय राऊत - ९९७०९८७१०७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com