कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या संरचनेवर होतो परिणाम

कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या संरचनेवर होतो परिणाम
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या संरचनेवर होतो परिणाम

कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात आगींमुळे मातीवर फारसे विपरीत परिणाम होत नसल्याचे दीर्घकाळापासून शास्त्रज्ञ आणि वन व्यवस्थापकांचे मत होते. मात्र, मर्सेड येथील कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि डेझर्ट रिसर्च इन्स्टिट्यूट येथे झालेल्या दोन अभ्यासामध्ये अशी स्थिती नसल्याचे स्पष्ट झाले आहे. येथे कमी तीव्रतेच्या आगीमुळे मातीची संरचना आणि सेंद्रिय घटकांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला. लास वेगास जवळच्या हमबोल्ड - तोयाबे राष्ट्रीय वनामध्ये जुलै आणि ऑगस्ट २०१३ या काळात मर्यादित स्वरूपाच्या व कमी कालावधीच्या आगींचा जमिनीवर होणारा परिणाम तपासण्यात आला. येथील अर्ध कोरड्या स्थितीमध्ये तापमानातील वाढही मर्यादित राहील व २५० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होणार नाही, याची काळजी घेतली होती. अशा आगी मातीसाठी हानीकारक ठरत असल्याचे अभ्यासात दिसून आले. याविषयी माहिती देताना कॅलिफोर्निया विद्यापीठातील सहायक प्रा. टीमरॅट घेझेहेई यांनी सांगितले, की जेव्हा अधिक तीव्रतेचे वणवे किंवा आगी लागतात, तेव्हा मातीतील सेंद्रिय कर्ब जळून जाऊन त्याचे त्वरित विपरीत परिणाम होतात. कमी तीव्रतेच्या आगीमुळे त्वरित असे कोणतेही परिणाम दिसत नाही. मात्र, अशा आगीमुळे मातीच्या संरचनेवर होणारा विपरीत परिणाम दीर्घकाळानंतर दिसून येतो. डेझर्ट रिसर्च इन्स्टिट्यूट येथील पर्यावरणशास्त्र संशोधक मार्कस बेर्ली हे २००९ पासून कमी तीव्रतेच्या आगीच्या परिणामांचा अभ्यास करत आहेत.

  • मातीमध्ये वाळू, चिकण, पोयटा या बरोबरच विविध खनिजांचे लहान मोठे कण असतात. ते एकमेकांशी सेंद्रिय पदार्थ, पाणी आणि अन्य घटकांनी बांधलेले असतात. तीव्र आगीच्या स्थितीमध्ये सेंद्रिय कर्ब जळून गेल्याने मातीच्या भौतिक संरचनेमध्ये बदल होतात. परिणामी धूप होण्याचा धोका वाढतो.
  • कमी तीव्रतेच्या आगीमुळे सेंद्रिय पदार्थ जळत नसल्याने भौतिक परिणाम त्वरित दिसत नाही. मात्र, या संशोधक गटाला मातीमध्ये असलेले पाणी उकळले जाऊन, संरचनेवर परिणाम होत असल्याचे आढळले. यामुळे मातीची धूप वाढते. प्रयोगासाठी माती १७५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानावर पंधरा मिनिटांसाठी गरम केली. त्यानंतर मातीच्या अंतर्गत कणांचा दाब आणि तन्यता शक्तीमधील फरक मोजण्यात आले. त्यात मातीतील पाणी उकळल्यामुळे व वाफेमुळे अंतर्गत कणांचा दाब एकदम वाढतो. त्यानंतर एकदम कमी होतो. यामुळे मातीतील विविध बंध तोडत ही वाफ बाहेर पडते. ओलसर मातीमध्ये केलेल्या प्रयोगामध्ये कोरड्या मातीच्या तुलनेमध्ये तन्यता शक्ती अधिक कमी झाल्याचे दिसून आले.
  • सेंद्रिय पदार्थाची फारशी हानी न झाल्यामुळे मातीच्या संरचनेच्या संरक्षणासाठी काही प्रमाणात उपयुक्त ठरते. सेंद्रिय कर्बामध्ये प्रामुख्याने पिकांचे कुजणारे अवशेष आणि सूक्ष्म जीव असतात. हे घटक मातीची एकूण स्थिरता आणि पाणी धारण क्षमतेसाठी कारणीभूत असतात. या अभ्यासाचे निष्कर्ष ‘एजीयू जिओफिजिकल रिसर्च लेटर्स’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.
  • दीर्घकालीन परिणाम दुसऱ्या अभ्यासामध्ये कमी तीव्रतेच्या उष्णतेचे मातीतील विविध प्रकारच्या सेंद्रिय घटकांचा दर्जा आणि प्रमाणावर होणारे परिणाम ७० दिवसांच्या कालावधीमध्ये तपासण्यात आले आहे. त्यात उष्णतेमध्ये सेंद्रिय कर्बाचे रूपांतर कार्बन डाय ऑक्साईडमध्ये होण्याच्या प्रक्रियेला वेग येतो. जेथे जमीन ओलसर होती, तेथे मातीची धूप होण्याचे प्रमाण अधिक आढळले आहे. त्याचप्रमाणे पाणी मुरण्याचा वेगही कमी होतो. त्यामुळे अपधाव (वाहत्या पाण्याचे प्रमाण) वाढतो. हे संशोधन ‘फ्रंटियर्स इन एन्व्हायर्नमेंटल सायन्स’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com