वाढत्या तापमानाचा जनावरांवर होणारा परिणाम

वाढत्या तापमानाचा जनावरांवर होणारा परिणाम
वाढत्या तापमानाचा जनावरांवर होणारा परिणाम

जनावरांमध्ये दिसून येणाऱ्या उष्मा तणावासाठी प्रामुख्याने वातावरणातील वाढते तापमान व उच्च आर्द्रता हे घटक कारणीभूत असतात. एका विशिष्ट तापमानाला जनावरे आपल्या शरीरातील उष्णता विशिष्ट प्रमाणात शरीराबाहेर टाकू शकत नाहीत. त्यामुळे जनावरांच्या शरीर तापमानाचे संतुलन बिघडते आणि जनावरांच्या शरीरावर आणि उत्पादन क्षमतेवर परिणाम होतो. वातावरणात होणाऱ्या कमी-अधिक तापमानास जनावरे स्वतःला समायोजित करत असतात. परंतु उन्हाळ्यात एकदम होणारी तापमान वाढ जनावरे सहन करू शकत नाहीत. उन्हाळ्यात रात्रीचे तापमान फारसे कमी होत नसल्याने जनावरे उष्मा तणावास बळी पडत असल्याचे दिसून येते. उष्मा तणाव जनावरांना प्रजनन व चांगल्या उत्पादन क्षमतेसाठी एका विशिष्ट तापमानाची आवश्यकता असते. माणसांमध्ये घाम नियंत्रण यंत्रणा विकसित असल्यामुळे तापमान वाढल्यास माणसांना घाम येतो. परिणामी शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते. परंतु दुधाळ जनावरांमध्ये विशेषतः म्हैस व गाय वर्गामध्ये घाम ग्रंथी योग्य प्रकारे विकसित झालेल्या नसतात व त्वचेमध्ये खोलवर असतात, त्यामुळे त्यांची घाम नियंत्रण यंत्रणा कमजोर असते. उन्हामध्ये घाम कमी येतो व शरीराचे तापमान कमी करण्यात व शरीर थंड करण्यात जनावरे पूर्णतः श्वसनावर अवलंबून असतात. रवंथ क्रियेदरम्यान होणाऱ्या फसफसण्याच्या क्रियेमुळेसुद्धा शरीरात अतिरिक्त उष्णता तयार होत असते. घाम नियंत्रण यंत्रणा अपुरी असल्यामुळे जनावर प्रभावीपणे शरीरातील उष्णता बाहेर टाकू शकत नाही, परिणामी दिवसाच्या वेळी शरीरात उष्णता साठत जाते व रात्रीच्या थंड वेळी ही उष्णता शरीराबाहेर टाकली जाते. परंतु जर तापमान रात्रीच्या वेळीसुद्धा अधिक असेल तर शरीरात साठलेली उष्णता बाहेर टाकली जात नाही व शरीरामध्ये अधिक उष्णता साठविली जाते. त्यामुळे जनावराची तापमान नियंत्रण यंत्रणा काम करीत नाही, परिणामी जनावर उष्मा तणावास बळी पडते. संशोधनानुसार असे दिसून आले आहे की, ४ ते २४ अंश सेल्सिअस तापमानात जनावरे सामान्य स्थितीत असतात व सोबतच अधिक प्रजननक्षम व उत्पादनक्षम असतात. या तापमानाला ‘थर्मोन्युट्रल झोन’ असे म्हणतात. उष्मा तणावास कारणीभूत घटक

  • तापमान २४ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक वाढल्यास जनावराच्या शरीराच्या तापमानातही वाढ होते. परिणामी जनवराच्या उत्पादन क्षमतेवर काही प्रमाणात विपरीत परिणाम होतो.
  • संकरीत गाई, म्हशींची तापमान नियंत्रण योजना वातावरणाच्या ३२ अंश सेल्सिअस तापमानावर, तर देशी गायी, म्हशींची तापमान नियंत्रण योजना वातावरणाच्या ४० ते ४५ अंश सेल्सिअस तापमानावर संपुष्टात येऊन जनावर उष्माघातास बळी पडू शकते. संशोधनानुसार असे दिसून येते की वातावरणातील सापेक्ष आर्द्रता ४५ टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास जनावरांच्या उष्मा तणावात एकूण वाढ होते. तापमान व सापेक्ष आर्द्रता निर्देशांक हा ७२ किंवा त्यापेक्षा कमी असल्यास जनावर स्वतःला आरामदायी स्थितीत अनुभवत असते, परंतु हा निर्देशांक जेव्हा ७८ किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास जनावरावर उष्मा तणावाचा परिणाम अधिक प्रमाणात होत असतो. परिणामी जनावराच्या नियमित शरीरक्रियेत बदल होऊन शरीराच्या अॅसिड बेस बॅलन्समध्ये बिघाड होतो व शरीराचे होमीओस्टॅसीस बिघडून शरीरातील सोडिअम, पोटॅशिअम आणि बायकार्बोनेटच्या प्रमाणात उलथापालथ होते, परिणामी उत्पादनक्षमता कमी होते.
  • उष्मा तणावाचा जनावरांवर होणारा परिणाम

  • जनावरांच्या शरीराचे तापमानात १०२ अंश सेल्सिअस फॅरेनाइटपर्यंत किंवा अधिक वाढ होते.
  • जनावर तोंड उघडे ठेवून श्वासोच्छवास करते, ज्याला आपण जनावराला धाप लागणे म्हणतो.
  • शरीरातील सामान्य तत्त्व, जसे सोडिअम, पोटॅशिअम आणि बायकार्बोनेटच्या मात्रेत कमतरता होऊन श्वसन दरात वाढ होते व तो ७० ते ८० प्रति मिनीटपेक्षा अधिक होतो.
  • जनावराला लागणाऱ्या ऊर्जेमध्ये २० ते ३० टक्के वाढ होते.
  • शरीराच्या तापमानावर नियंत्रण मिळविण्यासाठी त्वचेच्या रक्तप्रवाहात वाढ होते, तर शरीराच्या विविध भागात रक्तप्रवाह कमी होतो.
  • दुधाळ जनावराचे खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होते व त्याचाच परिणाम म्हणून दूध उत्पादनात घट होते.
  • दूध उत्पादनात १० ते २५ टक्के घट येते.
  • जनावराची प्रजनन क्षमता कमी होते. मादी जनावरे नियमित माजावर येत नाहीत.
  • नर जनावराची कार्यक्षमता कमी होते.
  • अधिक काळासाठी जनावर उष्मा तणावग्रस्त असल्यास त्याचे रूपांतर उष्माघातात होऊन जनावर मृत्युमुखी पडू शकते.
  • जनावरामधील उष्मा तणावाची तीव्रता जनावरामधील उष्मा तणावाची तीव्रता ही प्रामुख्याने वातावरणातील वास्तविक तापमान आणि सापेक्ष आर्द्रता, उष्मा तणावाचा कालावधी, रात्रीचे तापमान, जनावरांना देण्यात येणारा आहार, जनावराचा गोठा, पाण्याची उपलब्धतता, जनावराची जात, वजन, वय, रंग आणि हवेचा प्रवाह, दूध उत्पादनाचा टप्पा इत्यादीवर अवलंबून असते. तापमान सतत ३२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्यास संकरीत जनावराची उष्णता ४० ते ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्यास देशी जनावरे उष्माघातास बळी पडून मृत्युमुखी पडू शकतात. संपर्क ः डॉ. रणजित इंगोले, ९८२२८६६५४४ (सहायक प्राध्यापक व विभागप्रमुख, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com