जनावरांना खाद्यामार्फत जास्तीची ऊर्जा पुरविणे संयुक्तीक

पशूसल्ला
पशूसल्ला

जनावरांनी खाल्लेल्या आहारापासून शरीरास लागणारी आणि वातावरणातील तापमानाशी समतोल राखण्यासाठी ऊर्जा निर्माण होते. तापमान जास्त प्रमाणात कमी झाल्यास शरीराचा समतोल राखण्याकरिता जास्तीची ऊर्जा खर्ची पडते. अशा वेळी दुधाळ जनावरे किंवा कालवडी मोठ्या प्रमाणात ऊर्जा शरिराचे तापमान टिकवून ठेवण्याकरिता वापरतात. त्यामुळे दुग्धोत्पादनाकरिता किंवा वाढीकरिता कमी ऊर्जा उपलब्ध होते आणि दुग्धोत्पादन व वजनवाढीमध्ये घट येते. हे टाळण्यासाठी जनावरांना खाद्यामार्फत जास्तीची ऊर्जा पुरविणे संयुक्तीक ठरते. थंडीमुळे जनावरांवर होणारे विपरित परिणाम आणि त्यामुळे होणारा ताण कमी करण्यासाठी करावे लागणारे व्यवस्थापन खालील प्रमाणे.

  • आजारी जनावरांवर थंडीमुळे अधिक ताण येतो. त्यामुळे अशी जनावरे गोठ्याच्या मध्यभागी किंवा आतील बाजूस इतर जनावरांपासून वेगळी बांधावीत. रात्रीच्या वेळी आजारी जनावराच्या अंगावर गोणपाट किंवा कापड टाकावे. एका जनावरास वापरलेले कापड दुसऱ्या जनावरासाठी वापरू नये, त्यामुळे रोग प्रसार होण्याची शक्यता असते.
  • रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये पोटाचे आजार होण्याची शक्यता जास्त असते. पोटफुगी झाल्यास जनावराला पशुवैद्यकाच्या सल्ल्याने ४० ग्रॅम सुंठ, १० ग्रॅम हिंग आणि ५०० मिली गोडेतेल याचे एकत्र मिश्रण करून हळूहळू पाजावे. त्यामुळे जनावराच्या पोटात वायू होणार नाही.
  • आहारातील कोरड्या चाऱ्याचे प्रमाण वाढवावे. कारण कोरड्या चाऱ्याचे पोटामध्ये विघटन होताना मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते. त्यामुळे जनावराला थंडीची तिव्रता जाणवत नाही. कडबा कुट्टी, मिश्र सुके गवत, भाताचा पेंढा इ सुक्या चाऱ्याचा आहारात समावेश करावा.
  • हिरवा लसूण घास जास्त प्रमाणात खाण्यास देऊ नये कारण लसूण घासामधील सॅपोनीन नावाच्या घटकाने जनावरांमध्ये पोटफुगीची समस्या वाढते. हे टाळण्यासाठी हिरवा लसूण घास दोन ते तीन तास सुकवावा व त्यानंतर जनावरास खायला द्यावा किंवा लसूण घासासोबत काही प्रमाणात सुका चारा द्यावा. असे केल्याने पोटफुगीची समस्या टाळता येते.
  • बरसीम चारा पिकामध्ये प्रथिने व कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असते. बरसीम चारा कापून जास्त वेळ ठेवला तर काळा पडतो. तो खाल्ला तर जनावराच्या पोटात वायू तयार होऊन जनावरे पोटफुगीला बळी पडतात. हे टाळण्यासाठी जनावरांना ताजा बरसीम चारा द्यावा.
  • गोठा ऊबदार राहण्यासाठी जमिनीवर वाळलेले गवत, भाताचे तूस टाकावे, गोठ्यामध्ये शेकोटी पेटवावी. जनावरांना अंघोळ न घालता खरारा करावा.
  • गाभण आणि विलेल्या जनावरांची स्वतंत्र व्यवस्था करावी. त्यांना उबदार ठिकाणी ठेवावे.
  • हिवाळ्यात गायी, म्हशी विण्याचे प्रमाण जास्त असते. वेलेल्या जनावराची वार पडली की नाही याकडे लक्ष ठेवावे. बऱ्याच वेळा वार पडत नाही, योनीमार्गातून दुर्गंधीयुक्त स्त्राव बाहेर पडताना दिसून येतो. कधी कधी जनावराला ताप येतो. जनावर अन्न पाणी सोडते. त्याचा विपरीत परिणाम दुग्धोत्पादनावर दिसून येतो. अशावेळी वार जोर लावून किंवा त्याला वजन बांधून काढू नये. असे केल्याने गर्भाशयाला इजा होऊन जनावराच्या पुढील प्रजननावर विपरीत परिणाम होऊ शकतो. हे टाळण्यासाठी पशुवैद्यकाचा सल्ला घेऊन उपचार करावेत.
  • प्रसूतीनंतर गायी, म्हशीच्या चिकातून व दूधातून मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम बाहेर पडते अशा वेळी कॅल्शिअमची कमतरता होऊन दुग्धज्वर होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी दुधाळ जनावरांना आहारातून कॅल्शिअमचा पुरवठा करावा.
  • थंडीमुळे दुधाळ जनावरांच्या कासेला चिरा पडून जखमा होण्याची शक्यता असते. त्यामुळे दूध काढताना जनावरांना वेदना होतात. हे टाळण्यासाठी दूध काढताना कास धुन्यासाठी गरम पाण्याचा वापर करावा. दूध काढण्याची प्रक्रिया कमी वेळात पूर्ण करावी.
  • संपर्क ः डॉ. गणेश गादेगावकर, ९९३०९०७८०६ (पशूपोषणशास्त्र विभाग, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com