खाद्य व्यवस्थापनात साधली प्रति किलो १८ रुपयांची बचत

खाद्य व्यवस्थापनात साधली प्रति किलो १८ रुपयांची बचत
खाद्य व्यवस्थापनात साधली प्रति किलो १८ रुपयांची बचत

निरा (जि. पुणे) येथील पंडित चव्हाण यांच्याकडे एकूण २० एकर शेती आहे. त्यातील एक एकर आकाराचे पाच शेततळ्यांमध्ये मत्स्यपालन करतात. त्यातील तीन एकरमध्ये गिफ्ट तिलापियाचे परवाना घेऊन पालन करतात. पूर्वी गोड्या पाण्यातील कोळंबी उत्पादनाचा अत्याधुनिक प्लॅंट होता. स्वतःची प्रयोगशाळाही आहे. खाद्य व्यवस्थापनामध्ये अनुभवातून अनेक बदल केले असून, काटेकोरपणातून प्रति किलो १८ रुपयांची बचत त्यांनी साधली आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा राज्यातील अन्य शेतकऱ्यांनाही होऊ शकेल. त्यांनी सांगितलेल्या मत्स्यपालनाच्या टिप्स...

  • गोड्या पाण्यातील मत्स्यपालनासाठी शेततळ्याची खोली आणि पाण्याचे प्रमाण यापेक्षाही पृष्ठभागाचे क्षेत्रफळ अधिक महत्त्वाचे ठरते. मत्स्यशेतीसाठी उथळ तळी आवश्‍यक.
  • आपल्याकडे शेततळ्याच्या निर्मितीसाठी प्लॅस्टिक कागदाचा वापर प्रामुख्याने होतो. मात्र, त्यात खाली माती नसल्याने मातीमुळे तयार होणारी नैसर्गिक जैवसंस्था तयार होत नाही. ती तयार होण्यासाठी मातीमध्ये उपलब्ध असलेले बॅक्टेरिया पाण्यात सोडावे लागतात. माशांना दिलेल्या एक किलो खाद्यातील सुमारे ३०० ग्रॅम खाद्य (वेस्ट) शिल्लक राहते. ते पाण्यात तळाला साठते. मातीच्या तळ्यामध्ये नैसर्गिकरित्या जिवाणू तयार होऊन खाद्य कुजण्याची प्रक्रिया होते. या प्रक्रियेत बिनविषारी वायू तयार होतात. मात्र, प्लॅस्टिकच्या तळ्यात खाद्य योग्य पद्धतीने कुजण्यासाठी आवश्‍यक जिवाणू तयार होत नाहीत. परिणामी त्यातून हायड्रोजन सल्फाईड, नायट्रेट सारखे अनावश्‍यक व माशांना हानीकारक वायू तयार होतात. हे टाळण्यासाठी अावश्‍यक जिवाणू (प्रोबायोटिक्स) वरून साेडावे लागतात.
  • रहू, कटला, मृगळ या भारतीय जातीच्या माशांची निवड करावी. शेततळ्यांमध्ये एकरी चार हजार म्हणजेच एक गुंठा क्षेत्रामध्ये १०० मासे वाढवावेत.
  • मत्स्यबीज पाण्यात सोडण्यापूर्वी पाण्याचे तापमान, सामू (पीएच), अमोनिया, पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासून घेतो.
  • एक एकर क्षेत्रामध्ये चार हजार मासे वाढविण्यासाठी साधारणत: दीड पट म्हणजेच सहा हजार मत्स्यबीज सोडतो. त्याअाधी हॅचरीजमधून मत्स्यबीज काटेकारपणे मोजून घ्यावी लागतात. कमी पिल्ले मिळाल्यास व्यवसायात मोठे नुकसान होऊ शकते. त्यासाठी मध्यस्थाकडून पिल्ले घेण्यापेक्षा स्वत: हॅचरीजमधून आणणे पसंत करतो.
  • ज्या पाण्यातून पिल्ले शेततळ्यापर्यंत आणली आहेत, त्या पाण्यात आणि शेततळ्यातील पाण्याच्या गुणधर्मात फरक असतो. त्याचे तापमान, सामू वेगळे असतात, त्यामुळे मत्स्यबीज थेट पाण्यात न सोडता या पिशव्या सुमारे तीस मिनिटे तळ्याच्या पाण्यावर तरंगत ठेवतो. दोन्ही पाण्याचे तापमान एकसारखे झाल्यानंतर त्या बॅगा सोडून मत्स्यबीज एका ड्रममध्ये घेतो. ड्रममधील पाण्याचा आणि तळ्यातील पाण्याचा सामू मोजतो. त्यातही फरक असल्यास ठराविक वेळाने तळ्यातील थोडे थोडे पाणी त्या ड्रममध्ये मिसळत राहतो. दोन्ही पाण्याचा सामू एका पातळीवर आल्यानंतरही सुमारे तासभर हे बीज तसेच ठेवतो. नंतर हे बीज तळ्यात सोडतो.
  • बीज संपूर्ण तळ्याच्या पाण्यात न सोडता मच्छरदाणीपासून तयार केलेल्या नर्सरीत ठेवले जाते. हे बीज तळ्याच्या पाण्यात असले तरी संरक्षित क्षेत्रात राहते. त्यांच्या वाढीवर, मरतुकीवर लक्ष ठेवता येते. साधारणत: हॅचरीमधून आणलेले बीज हे एक ग्रॅम वजनाचे असते, ते दहा ग्राम वजनाचे हाेईपर्यंत या नर्सरीत ठेवले जाते. हा कालावधी सुमारे तीस दिवसांचा असतो. या कालावधीत पिल्लांच्या मरतुकीचे प्रमाण जास्त असते. या टप्प्यातून जगलेल्या पिल्लाची मर होण्याचे प्रमाण नंतर अत्यल्प असते. मेलेली पिले पाण्यावर तरंगतात. ती मोजून काढून टाकली जातात. तीस दिवसांनंतर जिवंत पिले मोजून तळ्यात सोडावीत. सुरवातीला मत्स्यबीज तळ्यात सोडल्यास माशांचे नैसर्गिक शत्रू त्यांना जगू देत नाहीत. दहा ग्रॅम वजनाची पिल्ले तळ्यातील पाण्यात सहजपणे जीवन जगू शकतात.
  • खाद्य व्यवस्थापन

  • तळ्यातील माशांच्या संख्येवरच त्यांना दररोज खाद्य किती द्यायचे हे ठरवले जाते. यासाठीच तळ्यात सोडतानाच माशांची संख्या मोजून, नेमकी माहीत करून घ्यावी. मातीच्या तळ्यात नैसर्गिक पद्धतीने खाद्य तयार करता येते. मात्र कागदाच्या तळ्यात वरूनच खाद्य द्यावे लागते. शक्यतो पाण्यात तरंगणारे खाद्य द्यावे. शेंगदाणा पेंडीसारखे खाद्य बुडून, विरघळून जाते. परिणामी खाद्याची नासाडी जास्त होते. पाणीही खराब होते. बुडणारे खाद्य मासा खातोय की नाही, हे कळत नाही. हा खर्च विनाकारण होऊन अंतिम नफा कमी होतो.
  • खाद्य देण्याचे सर्वसाधारण सूत्र असे - माशांची संख्या गुणिले सरासरी वजन करून येणाऱ्या संख्येच्या दहा टक्के खाद्य द्यावे. म्हणजे एक ग्रॅम वजनाची सहा हजार पिले असतील तर त्यांचे वजन सहा किलो होते. त्याच्या दहा टक्के म्हणजे सहाशे ग्रॅम खाद्य द्यावे लागेल. हे खाद्य एकदा न देता दिवसातून सहा वेळा विभागून द्यावे. मासा खाद्य कुरतडून खात नाही, तर गिळतो. त्यामुळे खाद्य देताना माशाच्या तोंडाचा आकार विचारात घेतला जातो.
  • पहिल्या महिन्यामध्ये खाद्याचे काटेकोर नियाेजन करावे लागते. तरंगते खाद्य असेल आणि ते शिल्लक राहते का हे कळते. तर त्यानुसार ते कमी अधिक करण्याचा अंदाज बांधता येतो. खाद्य व्यवस्थापनातून कमी कमी खाद्यामध्ये मासा मोठा वाढतो.
  • तीन महिन्यांनंतर पुढे दर १५ दिवसांनी साडे बारा किलो ‘जीओलाईट’ (सच्छिद्र ॲल्यिमिनोसिलिकेट खनिज) पावडर पाण्यात मिसळून ती तळ्यात पसरविणे गरजेचे आहे. त्यामुळे पाण्याच्या तळाशी साठलेले खाद्य व टाकाऊ भाग कुजून जाते. टाकाऊ भागातून अमोनियासह अन्य हानीकारक वायू निर्माण होणे रोखले जाते. तळ स्वच्छ राहतो. प्लॅस्टिक कागदाचे तळे असलेल्या शेतकऱ्यांनी जिओलाईट वापरणे आवश्‍यकच आहे. त्याने पाण्याची गुणवत्ताही टिकून राहते. याशिवाय दर महिन्याला उपयुक्त जिवाणू तळ्यात सोडावेत.
  • माशांना बाहेरच्या शत्रूपासून वाचविण्यासाठी पूर्ण तळ्यावर बर्ड नेट अंथरावी. पक्ष्यापासून माशांचा बचाव होतो. खेकड्यांची संख्या अधिक असल्यास बाजूने क्रॅब नेटही टाकावी.
  • नवीन मत्स्यपालन करताना...

  • कोळंबी मातीमध्ये खड्डा करून बसते. त्यामुळे कागदाच्या शेततळ्यामध्ये शक्यतो कोळंबी सोडू नये. गोड पाण्यातील कोळंबीच्या हॅचरीजही कमी आहेत. अशा शेतकऱ्यांनी कटला, मृगळ हे मासे घ्यावेत.
  • मातीचे शेततळे असल्यास कटला, मृगळ, रहू माश्‍यांचे उत्पादन घेता येते.
  • एक एकर क्षेत्रात साडे तीन हजार कटला आणि ५०० मृगळ मासे सोडावेत. कटला हा तरंगता मासा आहे. तर मृगळ हा पाण्याच्या तळाशी राहणारा मासा आहे. कटला तरंगलेले खाद्य खातो, तर मृगळ पाण्यात बुडून तळाशी गेलेले खाद्य खातो. दोन्ही एकच वेळी घेतल्यास खाद्याचे व्यवस्थापनही करता येतो.
  • काढणी :

  • साधारणत: माशाचे वजन आठशे ग्रॅम ते एक किलो झाल्यानंतर मासे विक्रीस काढतो. या माशांना अधिक मागणी असून, दरही चांगला मिळतो. मासे पकडताना मासा अडकणारी गिलनेट वापरू नये. ज्या जाळ्यात मासे गोळा होतात, अशा ओढ जाळीचा (ड्रग नेट) किंवा फेक जाळीचा (कास्टनेट) वापर करावा. त्यामुळे जेवढे पाहिजे तेवढेच मासे काढता येतात.
  • माशांची ठोक विक्री करण्यापेक्षा किरकोळ विक्रीतून अधिक नफा मिळतो. यासाठी तळ्यावरच विक्री व्यवस्था उभारली आहे. गरजेनुसार ग्राहकांना ताजे मासे काढून दिले जातात.
  • संपर्क : पंडीत चव्हाण, ९८६०८१२८००

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com