द्राक्षाच्या तिहेरी विक्री व्यवस्थापनात मिळवले यश

द्राक्षाच्या तिहेरी विक्री व्यवस्थापनात मिळवले यश
द्राक्षाच्या तिहेरी विक्री व्यवस्थापनात मिळवले यश

मालगाव (जि. सांगली) येथील संजय भीमराव बरगाले यांनी द्राक्ष पिकाच्या उत्तम नियोजनासह देशांतर्गत विक्री, निर्यात आणि बेदाणानिर्मिती अशा तीनही प्रकारे विक्री व्यवस्थापन साधले आहे. त्यांच्याकडे ५० एकर द्राक्ष बाग असून, द्राक्षाच्या उत्पन्नातून कर्नाटकात ६५ एकर शेती खरेदी केली. पूर्वी बेदाणानिर्मितीसाठी जुनोनी (ता. सांगोला) येथे शेड होते. मात्र अलीकडे गावातच बेदाणानिर्मितीला सुरवात केल्याने एकरी सुमारे २५ हजार रुपये बचत होत आहे. पूर्वी पानमळ्यासाठी प्रसिद्ध अशा मालगाव (ता. मिरज) येथे हळूहळू द्राक्ष बागा आल्या. येथील भीमराव बरगाले यांचा पानमळा होता. पानांच्या विक्रीसाठी मुंबईत अडते म्हणूनही हे कुटुंबीय प्रसिद्ध होते. या दोन्हींतून बरगाळे कुटुंबाने शेती विकत घेतली. या शेतीची जबाबदारी सन १९७८ मध्ये बाबासाहेब, बाळासाहेब, राजेंद्र आणि संजय या चार भावंडांवर आली. केवळ पानमळ्यावर अवलंबून राहण्याऐवजी नगदी पीक म्हणून १९८० मध्ये दोन एक द्राक्षाची लागवड केली. एकत्र कुटुंबाच्या कष्ट आणि नियोजनातून हळूहळू शेती वाढवत नेली. आज ५० एकर द्राक्ष बाग आहे. तसेच कर्नाटकातील नेज आणि बेडकहाळ येथे विकत घेतलेल्या ६५ एकर शेतीमध्ये ४५ एकर ऊस, तर ६ एकर डाळिंब लागवड आहे. आपल्या शेतीबद्दल माहिती देताना संजय म्हणाले, की द्राक्ष नगदी पीक असल्याने त्या क्षेत्रात वाढ केली. पुढे १९९३ मध्ये बेदाणा निर्मितीकडे वळलो. सांगोला तालुक्‍यातील जुणोनी येथे बेदाणा शेड केले. या ठिकाणी कोरडे वातावरण असल्याने बेदाणा चांगल्या प्रतिचा होतो. त्यामुळे भाडेतत्त्वावर जमीन घेत शेडची उभारणी केली. मात्र मालगाववरून हे अंतर साठ सत्तर किलोमीटर. येथे लक्ष ठेवण्यासाठी घरातील एका सदस्यासह मजूर ठेवावे लागते. जाणे येणे व नियोजन यात अडचणीबरोबरच खर्च वाढत होता. हा खर्च वाचविण्यासाठी गावातच शेड उभारणीचा निर्णय घेतला. आता द्राक्ष शेतीकडे लक्ष देताना बेदाणा निर्मितीही शक्य होते. दृष्टिक्षेपात शेती

  • द्राक्षे - ५० एकर
  • ऊस - ४५ एकर
  • डाळिंब-६ एकर
  • शेतीत हे केले बदल

  • अॉटोमायझेशन
  • नवनवीन फवारणी यंत्रे
  • हवामान केंद्राची उभारणी
  • यामुळे व्यवस्थापन खर्चात सुमारे ३० टक्के बचत
  • २० एकर क्षेत्रावरील बेदाणानिर्मिती
  • ३० एकर क्षेत्रावरील द्राक्षाची स्थानिक विक्री आणि निर्यात
  • उसातून एकरी ८० ते ९० टनांचे उत्पादन
  • निव्वळ नफ्याचे नियोजन

  • संजय बरगाले यांचे चार भावांचे संयुक्त कुटुंब आहे. कुटुंबात लहान-मोठे मिळून २० सदस्य आहेत.
  • शिक्षण, घरखर्च आणि आरोग्यासाठी ३० टक्के रक्कम
  • पुढील वर्षीच्या द्राक्ष, डाळिंब, आणि ऊस पिकासाठी २० टक्के
  • घेतलेली शेतीच्या डेव्हलपिंगसाठी २० टक्के
  • नवीन अवजारांसाठी १० ते १५ टक्के
  • उर्वरित शिल्लक ः १५ ते २० टक्के राखीव
  • द्राक्षाचे उत्पादन

  • गेल्या वर्षी २२ एकरांतील द्राक्षाची निर्यात.
  • निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन एकरी ९ टन.
  • निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनखर्च एकरी तीन लाख ते साडेतीन लाख रुपये.
  • दर ः प्रति किलोस ७० ते ८० रुपये
  • निव्वळ नफा ः एकरी ३ लाख. (टीप ः द्राक्षाच्या दरात दरवर्षी चढ-उतार होतात. रोग-कीड आणि अवकाळी पाऊस यामुळे नुकसानही होते. अशा वेळी राखीव निधी उपयोगी ठरतो.)
  • बेदाण्याचे उत्पादन

  • गेल्या वर्षी १६ एकरांवरील ६५ टन बेदाणानिर्मिती
  • एकरी सरासरी ४ टन
  • एकरी बेदाण्याचा खर्च अडीच ते तीन लाख
  • एकरी दोन ते अडीच लाख रु. निव्वळ नफा मिळतो.
  • एक किलो बेदाणा तयार करण्यासाठी ४ किलो द्राक्ष लागतात.
  • दर - सरासरी प्रति किलोस १५० ते २०० रुपये प्रति किलो.
  • गावातच बेदाणा शेड केल्यामुळे प्रति एकरी होणारी बचत

  • वाहतूक खर्च - १५ हजार
  • मजूर खर्च - ५ हजार
  • जागा भाडेपट्टी - ५ हजार
  • अशी एकूण - एकरी २५ हजार रुपये बचत
  • उसाचे उत्पादनाबाबत बरगाले म्हणाले, ‘‘एकरी ८० ते ९० टन उत्पादन मिळते. यातून सर्व खर्च वजा जाता ५० हजार रुपये एकरी शिल्लक राहतात. डाळिंब पीक गेल्या आठ वर्षांपासून घेतोय. मात्र डाळिंबाचे क्षेत्र कमी करण्याचे ठरवले आहे. त्याऐवजी द्राक्ष बाग वाढण्याचे नियोजन आहे.’’ एकत्र कुटुंबाचा फायदा एकत्रित कुटुंब असल्याने नियोजनसाठी फायदा होतो. चारही भावांकडे शेतीची जबाबदारी विभागलेली आहे. कर्नाटकातील शेती बाळासाहेब बरगाले आणि पुतण्या संतोष बाबासाहेब बरगाले यांच्याकडे दिली आहे. ते त्या ठिकाणी राहून संपूर्ण शेतीची जबाबदारी अगदी लिलया सांभाळतात.  

    द्राक्ष, ऊस,डाळिंब ही नगदी पिके आहेत. या शेतीकडे उद्योग म्हणून पाहतोय. द्राक्ष, बेदाणा या पिकांचे दर प्रत्येक वर्षी बदलत असतात. त्यामुळे उत्पन्नात चढ-उतार होत असतात, त्यानुसार खर्चाच्या नियोजनात योग्य ते बदल करावे लागतात. - संजय भीमराव बरगाले, ९३७०८४२२००, ९८९०८७९७२२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com