वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदा

वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदा
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदा

शाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा पर्याय उपयुक्त ठरू शकतो. त्यासाठी वनशेतीमध्ये आंतरपिकांचे खास मॉडेल अकोला कृषी विद्यापीठांतर्गत नागपूर येथील वनविद्या विभागामध्ये तयार केले. या वनशेती प्रारुपातून जमिनीच्या सुपीकता आणि पर्यावरणाचे रक्षण साधतानाच शाश्वत आर्थिक उत्पन्नही मिळू शकते.

पिकांच्या उत्पादन आणि उत्पन्नामध्ये होत असलेल्या चढ उतारामुळे शेतकरी घायकुतीला येत आहेत. त्यांच्यासाठी उत्पन्नाचे शाश्वत साधन म्‍हणून वनशेती शेती फायदेशीर ठरू शकते. मात्र, वनशेतीमध्ये जमीन अधिक काळ गुंतून राहते, यामुळे शेतकरी वनशेतीकडे वळत नाहीत. यावर मात करण्यासाठी वनशेतीसोबत आंतरपिकांचा एक पॅटर्न कृषी विद्यापीठाच्या नागपूर येथील वनविद्या विभागाकडून तयार केला आहे. यातून पर्यावरण आणि जमिनीची सुपीकताही साधली जात असल्याने शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादनाची ग्वाही मिळू शकते. वनशेतीचे चार मॉडेल बांधावरची लागवड ः शेतकऱ्याकडे दोन हेक्‍टरपेक्षा कमी शेती असल्यास बांधावर झाडांच्या लागवडीला प्रोत्साहन दिले जाते. दोन मीटर अंतर ठेवल्यास या पॅटर्नमध्ये हेक्‍टरी ४०० मीटरचा बांध गृहित धरून सुमारे २०० झाडे बसतात. पट्टा पद्धत ः यात आठ बाय दोन मीटर अंतराप्रमाणे हेक्टरी सागवानाची ६२५ झाडांची लागवड होते. ७ वर्षांनंतर - ३०० झाडे - २५ सेंमी व्यास आकाराची झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने काढणी. प्रति झाड एक बल्ली (मूल्य २०० रुपये प्रति बल्ली) अधिक एक घनफूट लाकूड (१ हजार रुपये प्रति घनफूट) अधिक १०० किलो लाकूड फाटा (४०० रुपये प्रतिक्विंटल) याप्रमाणे १६०० रुपये उत्पन्न मिळू शकते.   १२ ते १३ वर्षांनंतर - १५० झाडे - यापासून प्रति झाड एक बल्ली (मूल्य ५०० रुपये) अधिक दीड ते दोन घनफूट लाकूड (१ हजार रुपये) अधिक ३०० किलो लाकूड फाटा याप्रमाणे ३२०० रुपये उत्पन्न मिळते. २० ते २२ वर्षानंतर - १७५ झाडे - प्रति झाड ४ ते ५ घनफूट लाकूड (१५०० रुपये प्रति घनफूट) अधिक २० क्विंटल लाकूड फाटा (४०० रुपये प्रतिक्विंटल) याप्रमाणे १४ ते १५ हजार उत्पन्न मिळू शकते. अर्थात, बाजारातील लाकडाच्या दरानुसार यात बदल होऊ शकतात. स्वतः कापणी करून टिंबर यंत्राद्वारे प्रक्रिया केलेल्या लाकडांना याच्या दुपटीपर्यंत दर मिळू शकतो. या बागेमध्ये ८० टक्के जागेमध्ये आंतरपिके घेता येतात.

  • ब्लॉक प्लॅन्टेशन ः वीस एकर किंवा त्यापेक्षा अधिक शेती असलेल्या शेतकऱ्यांकरीता याची शिफारस आहे. तीन बाय तीन मीटर अंतराप्रमाणे हेक्टरी सुमारे ११०० झाडे बसतात. यालाच सघन लागवड म्हणतात. ब्लॉक प्लॅंटेशनमध्ये पहिली दोन वर्षे आंतरपिके घेता येतात. त्यानंतर मात्र आंतरपिके घेता येत नाहीत.
  • औषधी वनवृक्षांसोबत आंतरपिकांची लागवड ः यामध्ये पाच बाय पाच मीटर अंतराप्रमाणे ४०० झाडे प्रती हेक्‍टर लागवडीची शिफारस आहे. यात आवळा, बिबा, शिकाकाई यासारख्या औषधी वनवृक्षांसोबत आंतरपिकाची शिफारस असल्याचे डॉ. विजय इलोरकर यांनी सांगितले. प्रति झाड उत्पादन ः आवळा - ३०० ते ३५० किलो, बेल -३०० किलो, बिबा - १५० किलो, शिकेकाई - १२५ किलो, रिठा -२०० किलो.
  • औषधांच्या बाजारातील दरातील चढउतार मोठे आहेत.
  • सागवान शेतीची आंतरपिकाशी सांगड सागवान असलेल्या शेतीमध्ये आंतरपीक म्हणून सावलीत येणाऱ्या पिकाची लागवड केली जाते. खरिप हंगामात अशा शेतात लागवड असलेल्या शेतात उडीद, मूग, सोयाबीन तीळ यासारख्या पिकांची लागवड शक्य आहे. सध्या रब्बी हंगामात करडईची लागवड केली जाते. उत्पादनामध्ये २० ते २५ टक्‍के घट झाली तरी बोनस उत्पन्न मिळते. जमिनीचा सुधारला पोत सागवान पानांची गळ मोठ्या प्रमाणावर होते. मजुरांमार्फत यातील काही पाने वेचली जाते. काही पानांचे त्याच ठिकाणी खत झाल्यास त्याचा जमिनीच्या सुपिकतेला हातभार लागतो. हेक्‍टरी ३०० झाडांपासून सरासरी अडीच ते तीन टन पालापाचोळा मिळतो. तो जमिनीत कुजल्यास त्यापासून नत्र ३० किलो, स्फुरद २४ किलो, पालाश २७ किलो अशी अन्नद्रव्ये मिळतात. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. सुरवातीला ०.६ टक्‍के असलेला सेंद्रिय कर्ब दहा पटीने वाढून आता ६ टक्‍केपेक्षा अधिक झाल्याचा दावा डॉ. इलोरकर यांनी केला. सागवानाच्या विकसित केल्या दोन जाती कृषी विद्यापीठाच्या वनविद्या शाखेने सागवानाच्या दोन जाती विकसित केल्या आहेत. आलापल्ली आणि सिंदेवाहीच्या जंगलातील झाडांपासून निवड पद्धतीने विकसित केलेली एफ-१ ही जात स्थानिक वातावरणात उत्तम व जलद वाढणारी आहे. याची उतीसंवर्धित रोपे पारंपरिक वाणाच्या तुलनेत १२ ते १५ टक्‍के जलद वाढतात. जंगलातील सागवानाला कापणीकरिता ४० वर्षे लागतात, त्या तुलनेत विद्यापीठाने विकसित केलेले वाण अवघ्या २२ वर्षांत कापणीस येते. उंच आणि सरळ वाढ असलेल्या या झाडाचे लाकूडही उत्तम दर्जाचे आहे. एफ-२ हेही निवड पद्धतीचे सागवान वाण आहे. कमी कालावधीत उत्तम लाकूड या दोन्ही वाणातून मिळते. भरीव बांबूला प्रोत्साहन केरळ आणि कोकण भागात भरीव बांबू घेतला जातो. तिथे त्याला मानगा/चिवा या स्थानिक नावाने ओळखले जाते. दोन पेऱ्यामधील अंतर १८ ते २० इंच असून, भरीव असतात. याचा वापर फर्नीचर, हॅन्डीक्राफ्ट (हस्तकला) उद्योगात होत असल्याने पोकळ बांबूच्या तुलनेत अधिक मागणी आहे. वेगाने वाढ, फांद्या कमी आणि काटे नाहीत या बरोबरच पेरांची उपयुक्‍त लांबी अधिक अशी अनेक वैशिष्टये या बांबूची आहेत. तुरडा, नुटन, ब्रॅण्डडिसी, वलगॅरीझ बांबूवरील बंधने हटवली असून, आता लागवड आणि वाहतुकीस अडथळे नाहीत. बायोमास आधारीत ऊर्जा निर्मिती, इथेनॉल निर्मिती, बायो सीएनजी, ऍक्‍टिव्हेटेड चारकोल, टेक्‍सटाईल, अगरबत्ती अशा उद्योगांतून सातत्याने मागणी असते. देशात आठ लाख टन बांबू अगरबत्ती उद्योगासाठी आवश्यक आहे. देशांतर्गत उत्पादन नसल्याने सहा लाख टन आयात करावा लागतो. जागतिक पातळीवर सर्वाधिक ११ दशलक्ष हेक्‍टर क्षेत्र भारतात असून, ९ दशलक्ष हेक्टर क्षेत्रासह चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. एकेकाळी चीनमध्ये दुर्लक्षित असलेल्या पिकावर भर दिला जात असून लाकडांऐवजी जिथे शक्य तिथे बांबूचा वापर वाढवला आहे. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यामधील नैसर्गिक वने टिकविण्यासाठी असाच पर्याय भारतातही राबवला पाहिजे.

    राज्यात एकमेव संशोधन केंद्र राज्यातील वनशेती संशोधनाचे नागपूर येथे एकमेव केंद्र आहे. येथे २०० हेक्‍टर परिसरात ९० हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक वनाचे संवर्धन केले आहे. वनशेतीखाली ४० हेक्‍टर, तलावामध्ये ६ हेक्‍टर, बॉटनीकल गार्डन २५ हेक्‍टर, झुडपी जंगल ३६ हेक्‍टर याप्रमाणे आहे. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाकडून वनौषधी रोपांच्या निर्मितीचा प्रकल्प वनविद्या विभागाला मिळाला आहे. त्याअंतर्गत पहिल्या वर्षी ५० हजार, दुसऱ्या वर्षी एक लाख तर तिसऱ्या वर्षी दीड लाख रोपे निर्मितीचे उद्दीष्ट आहे. बेल, आवळा, अर्जुन, शतावरी, अश्‍वगंधा यासारख्या वनौषधी वृक्षाची रोपे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केली जातील, असे डॉ. विजय इलोरकर यांनी सांगितले.

    संपर्क : डॉ. विजय इलोरकर, ९४२२८३१०५३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com