AGROWON_AWARDS : शेतीउपयोगी यंत्रांचा ७२ वर्षीय तरुण संशोधक

AGROWON_AWARDS : शेतीउपयोगी यंत्रांचा ७२ वर्षीय तरुण संशोधक
AGROWON_AWARDS : शेतीउपयोगी यंत्रांचा ७२ वर्षीय तरुण संशोधक

ॲग्रोवन स्मार्ट संशोधक शेतकरी पुरस्कार शेतकरी ः पंढरीनाथ सर्जेराव मोरे मु. पो. सांगवी-भुसार, ता. कोपरगाव, जि. नगर नगर जिल्ह्यातील सांगवी भुसार (ता. कोपरगाव) येथील पंढरीनाथ सर्जेराव मोरे यांनी आजवर क्षारयुक्त पाणी शेतीमध्ये वापरण्यासाठी मॅग्नेटिक कॅटलिक वॉटर कंडीशनर विकसित केले. पुढे लेव्हल गार्ड अॅण्ड कंट्रोलर, पावसाचे पाणी गोळा करण्याचा प्रकल्प, कॅटॉलिक कन्व्हर्टर बायोगॅस स्टोव्ह, ट्रॅक्टरचलित कांदा रोप लागवड यंत्र अशी यंत्रे तयार केली. वयाच्या ७२ व्या वर्षीही पंढरीनाथ मोरे यांचे शेतीतील पाण्याची गरज कमी करण्याविषयी संशोधन सुरू आहे. नगर जिल्ह्यातील सांगवी भुसार (ता. कोपरगाव) येथील पंढरीनाथ सर्जेराव मोरे (वय वर्षे ७२) यांच्याकडे ११.४५ हेक्टर शेती आहे. ग्रामीण भागामध्ये क्षारयुक्त पाण्याची समस्या मोठी आहे. असे पाणी शेतीसाठी वापरण्यासाठी त्यांनी २००३ मध्ये यूपीएम मॅग्नेटिक कॅटलिक वॉटर कंडीशनर विकसित केले. यासोबतच यूपीएम अॅटो लेव्हल गार्ड अॅण्ड कंट्रोलर, पावसाचे पाणी गोळा करण्याचा प्रकल्प, कॅटॉलिक कन्व्हर्टर बायोगॅस स्टोव्ह आणि शेगडी, कमी खर्चातील घरकूल, ट्रॅक्टरने चालणारे कांदा रोपे लागवड यंत्र अशी अनेक यंत्रे तयार केली आहेत. यातील पाच यंत्रांना नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन, अहमदाबाद यांनी गौरविलेले आहे.

वास्तविक १९६६ मध्ये अर्थशास्त्रातील पदवी घेतली असली तरी पंढरीनाथ मोरे यांना यंत्रे, तंत्रज्ञानाचीच ओढ मोठी. त्यात ते स्वतःच्या प्रयत्नातून पारंगत झाले. घराच्या शेतामध्ये आवश्यक त्या यंत्रांच्या निर्मितीला प्रारंभ केला. १९६९ मध्ये बैलचलित पेरणी यंत्र तयार केले. त्यानंतर मोटार रिवायडिंगसह अनेक कामे घरीच करू लागले. ही आवड पाहता वडिलांनी शेती अवजारांचा कारखाना काढण्यासाठी परवानगी दिली. १९७० मध्ये श्री ज्ञानेश्वर मेटल अॅण्ड इलेक्ट्रिक वर्क्स ही कार्यशाळा सुरू केली. या कार्यशाळेच्या उभारणीसाठी वडिलांना गुंतवलेले पैसे तीन वर्षातच सव्याज परत केले. येथे शेतकऱ्यांची गरज आणि अडचणी लक्षात घेऊन त्यावर संशोधनातून मार्ग काढू लागले. अशा नावीन्यपूर्ण बैलचलित, ट्रॅक्टरचलित विविध अवजारांची निर्मिती होत असल्याने हा कारखाना परिसरामध्ये नावाजला जाऊ लागला. तांत्रिक ज्ञानासोबत असलेल्या शेतीच्या ओढीमुळे १९७५ मध्ये कारखाना बंद करून पूर्ण वेळ शेतीत उतरले. शेतीत प्रयोगांना सुरुवात झाली. शेतीमध्येही पीक पद्धतीचा अभ्यास करून कमी पाण्यामध्ये अधिक फायदा देणारी पीक पद्धती बनवली आहे. विविध फळपिकांची लागवड करून सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेत आहेत. पंढरीनाथ मोरे यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान ः

  1. १९९५ मध्ये पावसाचे पाणी गोळा करून साठवण्यासाठी प्रकल्प उभा केला. स्वतःच्या शेतातील घरावर उभारलेल्या प्रकल्पाची क्षमता ६० हजार लिटर असून, त्यातून पुढे विहीर पुनर्भरणाचाही प्रयोग केला.
  2. क्षारयुक्त पाण्याच्या समस्येने पिकांची वाढ होत नसल्याचे लक्षात आले. त्यावर यूपीएम व्हेंचुरी मॅग्नेटिक कॅटेलिक वॉटर कंडिशनर विकसित केला. या संशोधनासाठी २००३ मध्ये तत्कालीन लोकसभाध्यक्षांच्या हस्ते सन्मान केला गेला.
  3. २००० मध्ये अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रामध्ये सोलर हिटिंग सिस्टिम, सोलर फोटो व्होल्टाईक सिस्टिम तयार केली.
  4. २००२ मध्ये कमी खर्चाच्या घरबांधणीचा प्रयोग केला. ४००० वर्गफूट आकाराचे विनापाया आरसीसी घरकुल उभारले. यालाही स्थापत्य अभियांत्रिकी शास्त्राची मान्यता मिळाली.
  5. २००३ मध्ये पाणी वाहून जाण्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी यूपीएम ऑटो लेव्हल वॉटर गार्ड अॅण्ड कंट्रोलर तयार केले.
  6. २००४ मध्ये बायाडायनॅमिक आणि पर्माकल्चर या दोन्ही पद्धतीतून नॅडेप कंपोस्ट खत पद्धतीतील दोष काढून टाकले. सुधारीत नॅडेप पद्धती तयार केली.
  7. २००५ मध्ये ट्रॅक्टरचलित कांदा रोपे पुनर्लागवडीसाठी अर्धस्वयंचलित यंत्र तयार केले.
  8. २००७ मध्ये कॅटॅलिक कनव्हर्टर बायागॅस स्टोव्ह तयार केला. या शेगडीमुळे मिथेन गॅसची कार्यक्षमता ५० टक्क्यांनी वाढते.
  9. सेंद्रिय शेती तंत्रासाठी उपयुक्त गोठा उभारणी.

तंत्रज्ञानाचा प्रसार व पुरस्कार ः

  • स्वतः विकसित केलेल्या कांदा रोपे लागवड यंत्रासाठी कोणतेही पेटंट न घेता सर्वांसाठी मोफत खुले ठेवले आहे. आपल्या तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी क्षारपाणी व पाणी बचतीची साधने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. आकाशवाणी, दूरदर्शन, खासगी वाहिन्यांच्या माध्यमे आणि मासिकांतून लेखाद्वारे आपल्या संशोधनाचा प्रसार केला आहे.
  • २००९ मध्ये कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानारिता महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार व राष्ट्रपती राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नगर जिल्हा परिषद, कांदा लसूण संशोधन केंद्र, राजगुरुनगरसोबतच पर्यावरण संरक्षण, अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील कामांमुळे आजवर विविध पुरस्कार मिळाले आहेत
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com