बॅंकेत सारी माणसं सारखीच...

बॅंकेत जाण्यापूर्वी...
बॅंकेत जाण्यापूर्वी...

ताराबाईला कर्ज मिळालं ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. तारा एकटी होती म्हणून महिला विकासातून तिला पैसे मिळाले असतील, असे भिकूला वाटले. माहिती करून घ्यायला तो ताराकडे गेला, तेव्हा त्याला कळले गावातल्या राधाने काम केले. जमिनीवर बोजा चढवून हे कर्ज प्रकरण झाले. तेव्हा त्याला राहवले नाही. त्याने विचारले ‘मला पण मिळेल का गं?’ तसं ताराने त्याला राधापाशी जायला सांगितले. ‘सावकाराकडे जावत नाही, पण पैशाचं सोंग घेता येत न्हाई. पैशाशिवाय कुठलंच स्वप्न पूरं होत न्हाई!’ असं वाटायचं त्याला. आता मार्ग सापडला. तो जमिनीचे कागद घेऊन राधाकडे गेला. भिकूतात्याला राधा ओळखत होतीच. चांगल्या मनाचा, कोणाच्या अध्यात, मध्यात नसलेला... असं तिला वाटायचं. आपल्याकडे का बरं आले तात्या? ती विचार करत होती. तेवढ्यात तात्या म्हणाले, ‘वाईच जमिनीवर लोन हवं होतं तूच देतेस ना?’ म्हणून त्यांनी कागदच पुढे केले. कागद वाचून राधा म्हणाली, ‘कोणाचे कागद?’ तशी भिकुतात्या ‘माझाच की!’ म्हणाला. राधाने पूर्ण नाव विचारले तर ‘भिकाजी म्हादू दहिवले’ असे सांगितले पण कागद तर म्हादू नावाने दिसत होते. मग राधाच्या लक्षात आले की जमिनीवर नाव बापाचे होते. ‘खातेफोड केली नाही का? तुम्हाला जमिनीवर कर्ज हवं असेल तर तुमचं नाव लागेल कागदावर!’ भिकोबाचा बाप जाऊन दहा वर्षं झाली होती. आज काम करू उद्या करू म्हणून त्याचं तलाठ्याकडे जायचं राहून गेल होतं. ‘मीच तर जमीन कसतोय, मग काय हरकत आहे सायबाने त्यावर कर्ज द्यायला?’ असं त्याच म्हणणं होतं. बिचारा निराश झाला. राधा त्याला म्हणाली ‘तात्या रागाावू नका, पण कधीतरी करावं लागणार आहेच ना, मग आजच लागा की त्या कामाला!’ राधेचं हे मात्र बरोबर होतं. त्याला अगदी पटलं. ‘आपण ना योजना चोख असली तरी कागदपत्रात मार खातो बघ. कसायचं तर कशाला लागतोय कागद? त्यावाचून काही अडत न्हाई, म्हणून असं बघ’ एकीकडे पटतपण होतं. बँकेसाठी राधाने मदत करायला सुरवात केली. पण तिला काम करावं लागत होतं, ते कुठली कागदपत्रं कशासाठी लागतात ते उलगडून सांगायचं. बँकेत नुसत्या गप्पा मारून काही काम होत नाही. सगळ्याचा पुरावा द्यावा लागतो बँकेत! हेच सारखं पटवून द्यावं लागत होतं. यंत्र खरेदीसाठी कर्ज काढायचं असं कोणी तिला म्हणालं तर पैसे दुकानदाराच्या नावाने मिळतात हे आधी सांगावं लागतं होतं. गावातल्या माणसाचं डोकं कसं चालतं ते तिला चांगलं माहिती होतं म्हणून आता तर माणसं बँकेत जायच्या आधीच तिच्याकडे येत होती. कारण एकदा सरूचा नवरा माहेरी आलेल्या त्याच्याच पोरीचं खातं काढायला बँकेत गेला. पत्ता म्हणून त्याचं रेशन कार्ड नेलं होतं, तर त्यावर पोरीचं नावच नव्हतं. साहेब म्हणाला, ‘असेल राहत तुमच्या घरात तुमची पोरगी, पण मी नाही ओळखत. तिचं नाव रेशन कार्ड वर घालून आणा, नाहीतर ज्यावर तिचे नाव आहे असे आधार कार्ड आणा!’ तसंच एकदा पाटलाची सून राधाकडे आली होती, बँकेत गुपचूप खाते काढायचं होतं. पण फोटो, रहिवासी पुरावा हवा, असे राधाने मागितले तर काय डाफरली होती? ‘मी कोणाची सून हाये म्हाहीती हाये ना?’ एवढंच बोलून तरातरा निघून गेली होती. आपल्याच सुनेने पाटलाच्या सुनेला चिडवलं असं राधाच्या सासूला तेव्हा वाटलं होतं. ‘पाटलाची सून असेल तिच्या घरी, पण बँकेत सारी माणसं सारखी. गंगुबाईला जे कागद लागले तेच सगळ्यांना लागणार’. हे घरात सांगता सांगता ती थकून गेली होती; पण जेव्हा त्याच सुनेने राधेच्या घरी सांगितले की तू सांगितलेस तेच बँकेने सांगितले. तेव्हा कुठे राधेच्या सासूची समजून निघाली होती. गावात सगळे ओळखतात तिथे कागदाचं महत्त्व वाटत नाही. पण बँकेत काम करायचं तर चोख कागदपत्रं हवीतच, हे आपण सगळ्यांनी शिकायलाच पाहिजे.

संपर्क : सुवर्णा गोखले, ९८८१९३७२०६ (लेखिका ज्ञान प्रबोधिनी, पुणे येथे कार्यरत आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com