बियाणे खरेदी करताना लेबल तपासा

बियाणे खरेदी करताना लेबल तपासा
बियाणे खरेदी करताना लेबल तपासा

 बियाण्यांची खरेदी करताना योग्य काळजी न घेतल्यास संपूर्ण हंगाम वाया जाण्याचा धोका असतो. बियाण्यांची गुणवत्ता कशी ओळखायची याविषयी माहिती घेऊया. खरिप हंगामासाठी आवश्यक बियाणे, खते याची जुळवाजुळव सुरू आहे. विविध कंपन्याच्या जाहिराती सुरू असल्याने कोणते बियाणे खरेदी करावे, याबाबत शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम असतो. त्यामुळे बियाण्यांची खरेदी करतेवेळी खालील बाबींकडे लक्ष द्यावे.    

  • लेबल ः बियाण्यांच्या पिशवीवर मोहोर व बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडून विविध रंगांचे लेबल लावले जाते. प्रमाणित बियाण्यांसाठीचा रंग निळा, पायाभूत बियाण्यांसाठी पांढरा व पैदासकार बियाण्यांसाठी पिवळा रंग वापरतात.
  • विश्वासू, बीजपरवानाधारक विक्रेत्याकडून सीलबंद वेष्टनातील, लेबल असलेले बियाणेच खरेदी करावेत
  • खरेदीची पक्की पावती घ्यावी. या पावतीवर बियाण्यांचा संपूर्ण तपशील उदा. पीक, वाण, संपूर्ण लॉट नंबर, वजन, कंपनीचे नाव, किंमत, खरेदीदाराचे संपूर्ण नाव व पत्ता, विक्रेत्याचे नाव व सही इ. असावा. रोख अथवा उधारीची पावती घ्यावी.
  • बियाणे वैध मुदतीतील व सीलबंद असल्याची खात्री करावी.
  • पिशवीवर नमूद केलेल्या एमआरपी दरापेक्षा अधिक दराने बियाणे खरेदी करू नये. एमआरपीवरील सवलत, डिस्काउंट याचीही विचारणा करावी.
  • बियाणे खरेदीची पावती, बॅग व त्यावरील लेबल (टॅग) इत्यादी शेतकऱ्यांनी पिकाची काढणी होईपर्यंत जपून ठेवावे.
  • विक्रेता वर उल्लेखलेल्या विवरणासह बिल देत नसल्यास, मुदतबाह्य बियाण्यांची विक्री करत असल्यास या संबंधीची तक्रार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी किंवा संबंधित कंपनीच्या जिल्हा कार्यालयात लेखी स्वरूपात तत्काळ करावी.
  • पायाभूत बियाणे ः हे पैदासकार बियाण्यांपासून तयार केले जाते. पायाभूत बीजोत्पादन हे प्रामुख्याने कृषी विद्यापीठ अथवा सहकारी प्रक्षेत्रावर अथवा बियाणे महामंडळातर्फे प्रगतिशील शेतकऱ्यांच्या शेतावर घेतात. पायाभूत बीजोत्पादनाची पाहणी बीज प्रमाणीकरण यंत्रणेद्वारे गठित समितीकडून केली जाते. पायाभूत बियाण्याच्या पिशव्यांवर पांढऱ्या टॅगवर बियाण्यांची उगवणक्षमता, आनुवंशिक शुद्धता, भौतिक शुद्धता याची माहिती असून, बीज प्रमाणीकरण अधिकाऱ्याची सही असते. प्रमाणित बियाणे ः पायाभूत बियाण्यांपासून तयार केलेल्या या बियाण्यांमध्ये प्रमाणीकरण यंत्रणेच्या निर्धारित प्रमाणकानुसार आनुवंशिक शुद्धता, व भौतिक शुद्धता राखली जाते. याचे बीजोत्पादन शेतकरी स्वतःच्या शेतावर घेऊ शकतात. मात्र, हे बियाणे बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडून प्रमाणित करून घ्यावे लागते. प्रमाणित बियाण्यांच्या पिशवीवर निळ्या टॅगवर बियाण्यांची उगवणक्षमता, आनुवंशिक शुद्धता, भौतिक शुद्धता, तपासणी तारीख याची माहिती असून, बीज प्रमाणीकरण अधिकाऱ्याची सही असते. बियाण्यांचा टॅग व पिशवीवरील लॉट नंबर हा खालील बाब दर्शवितो. उदा. बियाण्यांचा लॉट नंबर ‘मे २०१७-१३-०१-०१’ असल्यास त्याचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे.

  • मे २०१७ - हा पीक काढणीचा महिना व वर्ष असतो.
  • १३ हा स्टेट कोड असून, ज्या राज्यात बियाणे उत्पादित झाले त्याचा कोड नंबर असतो. काही प्रमुख राज्यांचे स्टेट कोड (सांकेतांक) पुढीलप्रमाणे : ०१- आंध्र प्रदेश, ०६- गुजरात, १०- कर्नाटक, १२, मध्य प्रदेश, १३- महाराष्ट्र ,२४- उत्तर प्रदेश
  • ०१ हा प्लांट कोड असून, सदर बियाण्यांवर जिथे प्रक्रिया केली त्या बीज प्रक्रिया केंद्राचा सांकेतांक असतो.
  • ०१ हा ग्रोवर कोड असून, सदर बियाणे ज्या शेतकऱ्याने उत्पादित केले, त्याचा सांकेतांक असतो.
  • बियाण्यांचे परीक्षण व चाचण्या ः  
  • बियाण्यांचे शेतात उत्पादन झाल्यानतर ते प्रक्रिया केंद्रावर नेले जाते. बियाण्यांची भौतिक व आनुवंशिक शुद्धता व गुणधर्माची चाचणी घेतली जाते.
    1. चाचणीसाठी नमुना काढणे ः प्रकिया केद्रावर बियाण्यांच्या एकूण गटाच्या आकाराप्रमाणे बियाण्यांच्या निरनिराळ्या पोती, गट, पिशव्या यांच्या वेगवेगळ्या भागातून बिया एकत्र करतात. बियांच्या प्रकाराप्रमाणे निरनिराळे वजनाचे नमुने मोहोरबंद करून बीज परीक्षण प्रयोगशाळेत पाठवतात.  
    2. बियाण्यांची भौतिक शुद्धता ः बियाण्यांच्या नमुना वाणाचे बाहेरून एकसारखे दिसणारे बी, इतर बियाणे आणि काडीकचरा हे घटक शुद्धता बोर्डवर वेगवेगळे केले जातात. बियाण्यातील या वेगवेगळ्या घटकाच्या वजनावरून भौतिक शुद्धतेचे प्रमाण ठरवले जाते.
    3. बियाण्यांच्या अनुवंशिक व वाण शुद्धता चाचण्या ः त्यात पुढील तीन पद्धती समाविष्ट आहेत
    4. रासायनीक चाचण्या : या पीक निहाय वेगवेगळ्या असतात. उदा. गहू वाणांचे गहू दाणे पाण्यात भिजवून फिनॉलिक द्रावणात बुडवून आलेल्या रंगावरून वाण निश्चिती केली जाते. सोयाबीन बियाणे भिजवून बीजावरण काढून, नंतर हायड्रोजन पेरॉक्साईड द्रावणात बुडवून निश्चिती करतात. अशीच चाचणी भातात फेरस सल्फेटच्या, वाटाण्यात पोटॅशियम डायक्रोमेटच्या द्रावणात बुडवून आलेल्या रंगावरून केली जाते.  
    5.  रोपवाढ चाचणी पद्धत : या पद्धतीमध्ये प्रत्येक नमुन्यातील ठरविक संख्येचे बी ठरविक प्रतीरूपामध्ये लावून त्यांची रोपावस्थेत तसेच फुले येणाच्या अवस्थेत विशिष्ट गुणधर्मासाठी निरीक्षणे घेतात. रोपांच्या शुद्धतेचे प्रमाण निश्चित केले जाते. सर्वच प्रमाणित बियांच्या अनुवंशिक शुद्धता निश्चित्तीसाठी ही एक कमी खर्चाची व सोपी पद्धत आहे. या मुळे अनुवंशिक नरवंध्य मादी वापरलेल्या संकर बियाण्यांत नरवंध्य रोपाचे प्रमाण अगोदरच समजते.
    6. उगवणशक्ती चाचणी ः प्रयोगशाळेत उगवणशक्ती बियाण्यांची प्रत्यक्ष उगवण पेपरटॉवेल किंवा वाळूच्या मध्यभागी ठराविक संख्येचे बियाणे उगवणीस ठेवून घेतली जाते. या साठी उगवण यंत्राचा वापर करतात. बियाणांवर जरूरीप्रमाणे निर्जंतुकीकरण, रासायनिक किंवा तापमानाची प्रकिया केली जाते. बियांतील सुप्तावस्था जरूर असेल तिथे निरनिराळ्या पद्धतीने घालवली जाते. बीज उगवण प्रतिरोधके असल्यास नष्ट केली जातात. बियास योग्य ओलावा देऊन बियांची उगवण केली जाते. पिकानुसार प्रत्येक प्रक्रियेचे निकष ठरलेले आहेत. त्याचा प्रयोगशाळेमध्ये काटेकोरपणे पालन केले जाते. त्यानुसार बियाण्याचे उगवणक्षम, न उगलेले व असाधारण असे वर्गीकरण दोन वेळा निरीक्षणानंतर केले जाते.
    7. जीवनक्षमता, कीडरोग, ओलावा टक्केवारी व जोम चाचण्या ः प्रयोगशाळेत पिकाची उगवणशक्ती तपासण्यात बरेच दिवस लागतात. त्यामुळे विशिष्ट परिस्थितीतील बियाणांचे उभे छेद ओले करून, ते टेट्रोझीलम द्रावणात तीन दिवस बुडवून ठेवतात. बियांस आलेल्या रंगावरून त्याची जीवनक्षमता समजते. काही बियाणांसाठी ते ओले करून, त्यातील भृण वेगळा काढला जातो. तो योग्य द्रावणामध्ये बुडवून त्याच्या उगवण्याच्या टक्केवारीवरून बियांची जीवनक्षमता आजमावता येते. बियाण्यातील ओलावा टक्केवारी बियाणांना हानी न पोचवता मोजण्यासाठी यंत्र उपलब्ध आहे.

    बियाण्यांचे प्रकार ः

  • पैदासकार बियाणे (Breeder seed) टॅगचा रंग पिवळा
  • पायाभूत बियाणे (Foundation seed) - टॅगचा रंग पांढरा
  • प्रमाणित बियाणे (Certified seed) - टॅगचा रंग निळा
  • सत्यप्रत बियाणे (Truthful seed) - टॅगचा रंग हिरवा
  • त्यापैकी पायाभूत, प्रमाणित बियाणे शेतकऱ्यांच्या वापरासाठी आहेत.
  • संपर्क ः आशिष सहाणे, ९४२०९०५९१६ (प्राध्यापक, श्रमशक्ती कृषी महाविद्यालय, मालदाड, संगमनेर.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com