कमी खर्चाच्या तंत्रातून करता येईल शेतीचा विकास

कमी खर्चाच्या तंत्रातून करता येईल शेतीचा विकास
कमी खर्चाच्या तंत्रातून करता येईल शेतीचा विकास

शेतीतील शाश्वत उत्पादनासोबतच त्यातील उत्पादन खर्च कमी करण्याची क्षमता भूसूक्ष्मजीवशास्त्रात नक्कीच आहे. मात्र, त्यात नोकरीच्या संधी अत्यल्प असल्याने नोकरीसाठी मनुष्यबळ पुरवण्याचे कारखाने झालेल्या विद्यापीठांना व विद्यार्थ्यांनाही त्यात रस नाही. शेतकऱ्यांचा विचार करून या विषयातील शिक्षण, संशोधन आणि विस्ताराचे काम करीत राहिल्यास अशा कमी खर्चिक तंत्रातून शेतीचा शाश्वत विकास करणे शक्य होणार आहे. कृषी शिक्षण देणाऱ्या संस्थेमध्ये सूक्ष्मजीवशास्त्र योग्य प्रमाणात शिकवले जात नसेल, तर त्याचा अभ्यास होतो. त्यामध्ये संशोधनाचे मार्ग खुले होतात. पुढे ते शेतकऱ्यांपर्यंत पाझरले जाते. अर्थात, विद्यापीठामध्ये त्यावर काम झाले, की ते शेतकऱ्यांपर्यंत सहजासहजी पोचते, असे नाही. माझ्यासारख्या शेतकऱ्याने इच्छा व्यक्त केली, लेखमाला लिहिली म्हणून लगेच अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश होईल, असे नक्कीच नाही. कारण अभ्यासक्रमात बदल, नवीन विषय आणणे ही एक दीर्घमुदतीची व क्लिष्ट प्रक्रिया आहे. मात्र, या लेखमालेमुळे या विषयाची गरज तरी या लोकांपर्यंत पोहचेल, यात शंका नाही. सूक्ष्मजीवशास्त्राच्या अनेक उपशाखा आहे, त्यातील औद्योगिक, वैद्यकीय, दुग्धशास्त्र, भूसूक्ष्मजीवशास्त्र या विषयांचे शिक्षण विविध विद्यापीठांमध्ये दिले जाते. यात पदव्युत्तर अभ्यासाच्या विविध संधी असून, त्याला औद्योगिक क्षेत्रामध्ये चांगला वाव आहे. भूसूक्ष्मजीवशास्त्राच्याही औद्योगिक आणि कृषी अशा दोन उपशाखा आहेत. यातील औद्योगिक भूसूक्ष्मजीवशास्त्रामध्ये जिवाणू खतांची निर्मिती, रोगशास्त्रांतर्गंत विविध औषधांची सूक्ष्मजीवांवरील प्रतिक्रिया तपासणे अशा कामांची संधी आहे. अन्य विद्यापीठांमध्ये कृषी रसायनशास्त्र असा पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवला जातो. या विद्यार्थ्यांना कृषी रसायनाच्या उद्योगामध्ये चांगल्या संधी आहेत. मात्र, भूसूक्ष्मजीवशास्त्रामध्ये दैनंदिन शेतीमधील उपयुक्त ज्ञानांचा समावेश असतो. यात उत्पादन असले, तरी शेतकऱ्यांच्या पातळीवर असून, त्यात नोकरीच्या संधी नसल्याने हा विषय शिकून पुढे काय करायचे, असा सवाल विद्यार्थ्यांकडून येऊ शकतो. मात्र, ज्यांना शेतीच करायची आहे, अशांना हा विषय अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. अर्थात, कृषी विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर शेती कसणे ही एक अपवादात्मक बाब मानली जाते. ही स्थिती असल्यामुळे भूसूक्ष्मजीवशास्त्राचा अभ्यासक्रमच तयार केला गेला नाही. सर्वसाधारण पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये त्या-त्या विषयातील उपशाखांचा समावेश असतो. त्यातील एका विषयावर संशोधनासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकाची नियुक्ती केली जाते. शक्यतो मार्गदर्शक पदव्युत्तर काळातील एखाद्या विषयावरील समस्या किंवा प्रश्नावर विद्यार्थ्याला संशोधनात्मक काम करायला सांगतो. कारण नवीन विषय हातात घेतला की त्यासाठी पुन्हा ग्रंथालयात जाऊन नवीन संदर्भ शोधणे, संशोधनपत्रिकांचे वाचन करणे याबाबी येतात. एकदा तज्ज्ञ झाल्यानंतर असे विद्यार्थीपण टाळण्याचीच प्रवृत्ती अधिक होते. परिणामी, शेतीत उद्भवणाऱ्या नव्या प्रश्नांना सामोरे जाण्याची तयारी नसणारे, कृषी पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर तयार होत राहतात, पण शेतकरी आहे तिथेच राहते. गेल्या ५० वर्षांच्या शेती कालखंडाची उजळणी केली असता नवीन तंत्रज्ञान भरपूर आले आहे. पण, ते बहुतांशी बाजार व्यवस्थेतून शेतीत आले आहे. परिणामी, शेतकऱ्यांची बाजारशरणता किंवा बाजार अवलंबित्व वाढत चालले आहे. हे अवलंबित्व कमी करणारी तंत्रे शेतकऱ्यांना शिकवणे अत्यावश्यक झाले आहे. शेती सोपी झाली पाहिजे. किमान खर्चाची झाली पाहिजे. शेतीकामे कमी कष्टाची, कमी मजुरांमध्ये होणे आवश्यक आहे. यंत्रबलही कमी लागले पाहिजे. मात्र, त्याच वेळी उत्पादन टिकून राहिले पाहिजे. यासाठी जमिनीची सुपीकता किमान खर्चात किंवा फुकटात वाढवणारी तंत्रे विकसित झाली पाहिजेत. हंगामाच्या अंती अनेक कृषी उत्पादनाचे प्रमाण मागणीच्या तुलनेत अधिक असल्याने बाजारात मंदी असते. भरपूर खर्च करून आणलेल्या उत्पादनाला दर नसल्याने चांगले उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती येत नाही. त्यामुळे खर्च कमी झाला पाहिजे. विस्तारातील अडचणी खर्च कमी करणारी अनेक तंत्रे भूसूक्ष्मजीवशास्त्रामध्ये आहेत. त्याचा प्रसार, विस्तार विद्यापीठ आणि कृषी विभागाशिवाय कोण करणार? कारण ही स्वस्तातील किंवा फुकट अशी तंत्रे असल्यामुळे कंपन्यांना नफ्याची गणिते मांडता येत नाहीत. परिणामी, अन्य बाजारकेंद्रित ज्ञानाचा प्रसार झाला त्याप्रमाणे प्रतिनिधी, जाहिराती, विविध योजना यात कोणी राबवणार नाही. विस्ताराच्या अभावी हे उत्तम ज्ञान केवळ ग्रंथातून अडकून राहिले आहे.

  • १) या सूक्ष्मजीवांचा आकार दृष्टीच्या पलीकडे असल्याने डोळ्यांना दिसत नाही, दाखवता येत नाही. ही विस्तारासाठी मोठी अडचण आहे.
  • २) बहुतांश ग्रंथ हे इंग्रजीत असून, त्याची स्वतंत्र तांत्रिक भाषा आहे. या मर्यादेमुळे सामान्य शेतकरी त्यापासून दूर राहतात. अनेक वेळा एखादा ग्रंथ एकदा वाचून काही गोष्टी लक्षात येतातच, असे नाही. पुन्हा पुन्हा वाचन आणि विचार केल्यानंतर अनेक गोष्टी समजून येतात. अशीच समस्या माझ्या मराठीतून लिहिलेल्या पुस्तकांबाबतही शेतकऱ्यांना येत असतील.
  • ३) पायाभूत विज्ञानावर आधारित या ग्रंथातील माहिती समजून घेऊन आपल्या स्थानिक परिस्थितीनुसार त्यांचा प्रत्यक्ष शेतात वापर करण्यासाठी तरल बुद्धी आवश्यक आहे. ते उद्दिष्ट ठेवूनच वाचन झाले पाहिजे.
  • ४) एखाद्या प्राध्यापक किंवा शास्त्रज्ञांपुढे प्रत्यक्ष शेतात काम करीत नसल्यामुळे समस्या किंवा प्रश्न असणार नाही. शेतकऱ्यांपुढे समस्यांचा डोंगर असला, तरी त्याला त्या समस्या योग्य शब्दांत मांडून या शास्त्रज्ञांपर्यंत पोचवता येत नाहीत. स्वतःला विज्ञान समजून घेऊन सोडवता येत नाहीत.
  • विज्ञानाचा डोंगर पोखरायचा आहे... मला भूसूक्ष्मजीवशास्त्राच्या वाचनाची गोडी लागली. मी वाचत गेलो. सूक्ष्मजीवशास्त्राचे सर्व ग्रंथ हे पदव्युत्तर व आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी संदर्भ म्हणून प्रकाशित झालेले असतात. हे चारपाचशे पानांच्या ग्रंथाचे लक्षपूर्वक वाचन केल्यानंतर एखाद दुसरा प्रत्यक्ष शेतात वापरण्यायोग्य अशा उपयोजित ज्ञानाचा धागा सापडतो. पुस्तकांतील अनेक संदर्भ हे आजच्या शेतीतील शास्त्रीय शिफारशींच्या विपरीत असल्याचे किंवा परस्परविरोधी असल्याचे मला आढळत गेले. या परस्पर विरोधी वाटणाऱ्या घटकांचा शेतीत पडताळा घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून काही निष्कर्ष बरोबर असल्याचे ध्यानात आले. हे निष्कर्ष मला बरोबर असल्याचे लक्षात आले, तरी प्रत्यक्ष शिफारशी वेगळ्याच असल्याने शेतकऱ्यांच्या गळी कसे उतरवावे, ही मोठी समस्या माझ्यासमोर उद्भवली. मग दैनंदिन व्यवहारातील साधेसोपे दाखले गोळा करू लागलो. पुस्तकाचे वाचन, त्यातून प्रत्यक्ष शेतीत राबवण्याजोगे एखादे तत्त्व हा सारा अक्षरशः डोंगर पोखरून उंदिर काढण्याचाच हा प्रकार आहे. मात्र, आपल्या शेतकऱ्यांसाठी हे उद्योग कोणीतरी करणे गरजेचे आहे, एवढे खरे!

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com