गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड; पूर्वहंगामी कपाशी टाळावी

गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड; पूर्वहंगामी कपाशी टाळावी
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड; पूर्वहंगामी कपाशी टाळावी

केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार केलेली गुलाबी बोंड अळीच्या एकात्मिक नियंत्रणासाठीची रणनीतीतील महत्त्वाच्या कापसाचा हंगाम वेळेत संपविणे व पूर्वहंगामी लागवड न करणे या उपायांचे गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणातील महत्त्व याविषयी सविस्तर माहिती घेऊया. भारतात बीटी कपाशीप्रती गुलाबी बोंड अळीमध्ये प्रतिकारक्षमता विकसित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या दोन, तीन वर्षांपासून महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलंगाणा या प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये बीटी कपाशीमध्ये त्यांचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून आले. त्याची कारणे ः

  • कपाशीभोवती रेफ्युजी (आश्रय पीक) न लावणे,
  • कापसाचा हंगाम फेब्रुवारी आणि त्यानंतरही लांबविणे,
  • पूर्वहंगामी कापसाची एप्रिल-मेदरम्यान लागवड करणे,
  • एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतींचा अवलंब न करणे.
  • वरील कारणांमुळे गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्र अविरतपणे सुरू राहून तिच्यामध्ये बीटीला प्रतिकारकता निर्माण होण्याजोगी परिस्थिती शेतात निर्माण झाली. २०१७-१८ च्या कापूस हंगामात गुलाबी बोंड अळीच्या उद्रेकसदृश स्थिती तयार झाली. त्याचा फटका उत्पादनाला बसला.
  • सर्वेक्षणातील पुढे आलेली कारणे - नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या पीक संरक्षण विभागातील शास्त्रज्ञांनी सप्टेंबर ते डिसेंबर २०१७ व २०१८ मध्ये विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्यातील कापूस उत्पादक जिल्ह्यांतील सुमारे १०५ हून अधिक गावांचे सर्वेक्षण केले. यामध्ये प्रादुर्भावग्रस्त शेतातील नमुने तपासणीबरोबरच शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. शेतकरी वापरत असलेले उत्पादन तंत्रज्ञान, कीड नियंत्रणाच्या उपाययोजना, स्थानिक पीक पद्धती अशी माहिती संकलित केली. त्यात बऱ्यापैकी सिंचन सुविधा असलेल्या भागात ९० टक्क्यांहून अधिक शेतकरी अधिक उत्पादनाच्या उद्देशाने नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान पिकाला अतिरिक्त खतमात्रा व सिंचन देऊन कापसाचा हंगाम फेब्रुवारी ते मार्चपर्यंत लांबवत असल्याचे आढळले. परिणामी गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रम सलग सुरू राहतो. एकमेव खाद्यपीक कपाशी- गुलाबी बोंड अळीसाठी कपाशी हे एकमेव खाद्यपीक असून, व्यापक क्षेत्रावर बीटी कापसाची लागवड असल्याने जगण्याच्या स्पर्धेत या किडीवर दबाव आला. त्यातून हळूहळू तिच्यामध्ये बीटी कपाशीला प्रतिकार करण्याची क्षमता वाढीस लागली. गत १५ वर्षांपासून संथगतीने सुरू असलेली ही प्रक्रिया अलीकडील २-३ वर्षांपासून बळावली. त्याचेच रूपांतर चालू वर्षी बीटी कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रकोप होण्यात झाले. साधारणतः कापूस हंगामाच्या मध्यापासून (साधारणतः लागवडीच्या ९० दिवसांपासून पुढे) गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव सुरू होतो व शेवटपर्यंत हळूहळू वाढत जातो. ही कीड बोंडामध्ये लपून राहत असल्यामुळे वरून सहजासहजी प्रादुर्भाव दिसून येत नाही. परिणामी लांबलेल्या हंगामानुसार बोंडांवरील प्रादुर्भाव व त्यामुळे होणारे कपाशी व बियांचे नुकसानही वाढत जाते. आदर्श पीक पद्धतीमध्ये कपाशीचा हंगाम डिसेंबरच्या शेवटी किंवा जास्तीत जास्त जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत संपवला पाहिजे. त्यानंतर शेतातील पिकाचे अवशेष काढून नष्ट करावे. अळीला खाण्यासाठी पिकाचा अभाव व हिवाळ्यातील थंड तापमान यामुळे अळ्या निसर्गतः सुप्तावस्थेत जातात. सुप्तावस्थेतील अळ्या प्रादुर्भावग्रत बोंडे व पिकाचे अवशेष यामध्येच लपून राहतात. पीक काढणीनंतर शेतात गुरे, शेळ्या-मेंढ्या चरावयास सोडाव्यात. पऱ्हाटीचे अवशेष जाळून टाकावेत. कोणत्याही कारणास्तव वेचणीनंतर शेतात कपाशीचे पीक तसेच ठेवणे किंवा कपाशी पिकांचे अवशेष साठवणे टाळावे. अशी तजवीज केल्यामुळे खाद्य पुरवठ्याअभावी गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रम खंडित होतो. पुढील हंगामातील प्रादुर्भाव रोखण्यास मदत होते. पूर्व-हंगामी कापसाची लागवड टाळा साधारणपणे पाऊस पडल्यानंतर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कपाशीच्या लागवडीची शिफारस आहे. मात्र, ओलीताखालील कापूस क्षेत्रात अनेक शेतकरी एप्रिलचा शेवटचा आठवडा ते मे महिन्याचा पहिला पंधरवडा कपाशीची लागवड (पूर्वहंगामी) करतात. आधीच मागील पिकाचा मार्चपर्यंत लांबवलेला हंगाम आणि एक, दीड महिन्याच्या अंतराने केलेली पुढच्या हंगामातील कपाशी लागवड यामुळे किडीसाठी वर्षभर खाद्यपुरवठा होत राहतो. त्यांचे जीवन चक्र खंडित होण्यास फारच कमी कालावधी राहतो. गुलाबी बोंड अळीचे पतंग कोवळ्या पात्या, कळ्या, व बोंडावर अंडी घालण्यास अधिक पसंती देतात. पूर्वहंगामी लागवडीच्या कपाशीला पात्या लागण्याची अवस्था जुलै महिन्याच्या दरम्यान येते. मागील हंगामातील सुप्तावस्थेत असणाऱ्या गुलाबी बोंड अळ्यांपासून निघणारे पतंगही याच कालावधीत बाहेर पडतात. अशा प्रकारे गुलाबी बोंड अळीची नवीन हंगामातील पहिली पिढी ही पूर्वहंगामी पिकावरच तयार होते. पुढे हाच प्रादुर्भाव नंतर जून-जुलैमध्ये लावलेल्या हंगामी कपाशी पिकावर प्रसारित होतो. याउलट, पूर्वहंगामी कपाशीची लागवड करणे टाळल्यास जून-जुलैदरम्यान सुप्तावस्थेतून निघालेल्या पतंगांना अंडी घालण्यास योग्य जागा मिळत नाही. तसेच त्यांनी घातलेल्या अंड्यांतून बाहेर पडलेल्या अळ्यांना उपजीविकेसाठी पात्या, फुले व कोवळी बोंडे उपलब्ध नसल्याने त्या मरून जातात. या क्रियेला पतंगांचा “आत्मघाती उदय” (suicidal emergence) असे म्हणतात. महत्त्वाचे...

    कापसाचा हंगाम वेळेत (डिसेंबरअखेरपर्यंत) संपवणे, फरदड न घेणे आणि एप्रिल - मे महिन्यातील पूर्वहंगामी लागवड न करणे या बरोबरच शिफारशीत म्हणजेच जून महिन्यात लागवड या बाबी गुलाबी बोंड अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी महत्त्वाच्या आहेत. कमी कालावधीत व एकाच वेळेत परिपक्व होणाऱ्या (१५०-१६० दिवस) वाणांची निवड करावी. सिंचन सुविधा उपलब्ध असल्यास पूर्वहंगामी कपाशीऐवजी उन्हाळी हंगामातील पर्यायी पिके घ्यावीत. पिकांतील फेरबदलामुळे किडीचा जीवनक्रम खंडित होण्यास मदत होईल. बेवड मिळेल अशा पिकांमुळे जमिनीची सुपीकता टिकून राहील. संपर्क ः डॉ. बाबासाहेब फंड, ७५८८७५६८९५ डॉ. विश्लेष नगरारे, ९४२०३९७१७८ (पीक संरक्षण विभाग, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com