दुभत्या जनावरांमधील उन्हाळी कासदाह

दुभत्या जनावरांमधील उन्हाळी कासदाह
दुभत्या जनावरांमधील उन्हाळी कासदाह

उन्हाळी कासदाह हा दुधाळ जनावरांमध्ये उद्भवणारा सर्वात जास्त आणि वारंवार आढळणारा अाजार आहे. कासदाहामुळे दुधाची गुणवत्ता आणि उत्पादन क्षमता दोन्हीवरही विपरीत परिणाम होतात. वेळीच उपचार न केल्यास कासेचे कायमचे नुकसान होऊन जनावर निरुत्पादक होते. या रोगावर नियंत्रण ठेवल्यास औषधोपचाराचा खर्च आणि पर्यायाने आर्थिक नुकसान रोखता येईल. उन्हाळी कासदाह हा जीवाणूजन्य रोग असून कॉरीनेबैक्टीरियम पायोजन (Corynebacteriun pyogenes) या जीवाणूमुळे होतो. या जीवाणूंचा प्रसार हायड्रोटिया इरिटांट (Hydrotaea irritants) जातीच्या माशामुळे होतो. विशेषत: या रोगाचे प्रमाण वालुकामय मातीच्या प्रदेशात सर्वाधिक असते. उन्हाळ्यात किंवा मॉन्सून पूर्व कालावधीत या माशांच्या प्रजननासाठी योग्य वातावरण असते, या काळात त्या सर्वाधिक सक्रिय असतात म्हणून हा रोग सहसा उन्हाळ्यात होतो. आर्थिक नुकसानीची कारणे

  • दुग्धोत्पादनात घट होते.
  • कासदाह झालेल्या जनावराचे दूध बऱ्याच वेळा टाकून द्यावे लागते.
  • रोगनिदान व औषधोपचारासाठी खर्च होतो.
  • दुग्धजन्य पदार्थाच्या दर्जामध्ये घसरण होणे.
  • जनावर निरुपोगी होणे.
  • व्यवस्थापनासाठी होणारा मजुरी व इतर साहित्यावर खर्च.
  • लक्षणे

    1. कास सुजते, स्पर्श केल्यास वेदना होतात.
    2. सडातून पिवळसर रंगाचा स्राव निघतो अाणि त्याभोवती माश्या बसतात.
    3. अतिशय पातळ किंवा पिवळे दूध निघणे तसेच दूध नासणे.
    4. अधिक गंभीर परिस्थितीमध्ये जनावरांच्या मागील पायांवर (कासेभोवती) सूज दिसून येते.
    5. वेळीच लक्ष न दिल्यास सडांमध्ये जीवाणू दीर्घ काळापर्यंत वास्तव्य करून आपली संख्या वाढवितात आणि दूध तयार करणाऱ्या ग्रंथींचा नाश करतात.
    6. ओवा आकाराने छोटा व टणक होतो.
    7. जनावराला थकवा जाणवतो व ते सुस्त पडून राहते.
    8. शरीराचे तापमान वाढते व आहार मंदावतो.
    9. गाभण काळात जानावरांच्या गर्भाशयात प्रादुर्भाव होऊन गर्भपात होण्याची शक्यता असते, तातडीने उपचार न केल्यास जनावर दगावण्याचीसुद्धा शक्यता असते.

    रोग निदान

    1. जर उन्हाळ्यात जनावरांच्या कासेभोवती माश्यांचा वावर दिसून येत असेल तर.
    2. कॅलिफोर्निया कासदाह चाचणीचा (California mastitis test) उपयोग करूनसुद्धा या रोगाचे निदान केले जाते.
    3. दुधामधील दैही पेशी (Somatic cell count) ची संख्या जाणून घेऊन या रोगाचे निदान केले जाऊ शकते.

    उपचार

    1. पशुवैद्यकाच्या मदतीने जनावरांवर उपचार करून घ्यावे.
    2. सर्वप्रथम प्रभावित सडांमधील संपूर्ण खराब स्राव काढून घ्यावा, त्यानंतर सडांमधून प्रतिजैविक औषध सोडावीत, त्याने जीवाणूंचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.
    3. अाजारी जनावराला इतर जनावरांपासून वेगळे करावे.

    प्रतिबंध आणि नियंत्रण

    1. जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवावा.
    2. जनावरांच्या कासेला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
    3. धार काढण्यापूर्वी कास व सडांना स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे.
    4. दूध काढण्यापूर्वी हातसुद्धा स्वच्छ धुऊन घ्यावे.
    5. प्रत्येक वेळी दूध काढताना कासेतील संपूर्ण दूध ८-१० मिनिटांच्या कालावधीत (या कालावधीत अाॅक्सिटॉसीन या संप्रेरकाचा प्रभाव हा सर्वाधिक असतो, त्यामुळे सडातील संपूर्ण दूध निघण्यास मदत होते) काढून घ्यावे. कासेमध्ये दूध शिल्लक राहणार नाही याची काळजी घ्यावी. (सडातील शिल्लक दूध हे जीवाणूंच्या वाढीसाठी मध्यम म्हणून काम करते).
    6. प्रादुर्भाव झालेल्या सडातील दूध सर्वात शेवटी वेगळ्या भांड्यात काढून फेकून द्यावे.
    7. दूध काढून झाल्यावर किमान पुढील अर्धा तास जनावर जमिनीवर बसणार नाही याची काळजी घ्यावी (या कालावधीत सडाचे तोंड उघडे असल्यामुळे जमिनीवरील जीवाणू कासेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असते).
    8. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने बाजारात उपलब्ध जीवाणू रोधक (अँन्टीसैपटीक) द्रावणाचा वापर करून प्रत्येक वेळी दूध काढून झाल्या नंतर जनावरांच्या सडांना टीट-डीप करायला हवे.
    9. जनावरांच्या प्रत्येक दुभत्या काळाच्या शेवटी (भाकडकाळ सुरू होत असताना) पशुवैद्यकांच्या मदतीने दीर्घकालीन प्रतिजैवकांचा उपचार करून उपचार करून घ्यावा यास ड्राय काऊ थेरपी (डीसीटी) असे म्हणतात.
    10. परजीवी नाशकांचा वापर करून माश्यांचे नियंत्रण करावे.

    संपर्क ः वैभव सानप, ९४५५१४८१७२ (डॉ. सानप भारतीय तंत्रज्ञान संस्था कानपूर, उत्तर प्रदेश अाणि डॉ. पतंगे पशुधन विकास अधिकारी म्हणून एटापल्ली, गडचिरोली येथे कार्यरत अाहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com