लिंबूवर्गीय फळझाडांचे खत व्यवस्थापन

लिंबूवर्गीय फळझाडांचे खत व्यवस्थापन
लिंबूवर्गीय फळझाडांचे खत व्यवस्थापन

लिंबूवर्गीय पिके अन्नद्रव्यांच्या पुरवठ्यासाठी संवेदनशील असतात. अन्नद्रव्यांची कमतरता भासल्यास त्याची लक्षणे पाने, फुले आणि वाढीवर त्वरित दिसतात. ही लक्षणे ओळखून योग्य ती उपाययोजना वेळीच करण्याची आवश्यकता आहे. लिंबूवर्गीय फळझाड अन्नद्रव्यांची कमतरता पानांद्वारे, फळांद्वारे दाखवते. त्याचप्रमाणे वाढीवर विपरीत परिणामही दिसून येतो. अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे कशी ओळखायची ते पाहू. नायट्रोजन ः नत्र हे अन्नद्रव्यांचे संतुलन चक्र समजले जाते. या अन्नद्रव्यांमुळे अन्य अन्नद्रव्यांची उपलब्ध होतात. या अन्नद्रव्यामुळे झाडांची वाढ जोमदार होते. बहार येण्यासाठी नत्राची आवश्यकता असते. बहार येताना पानातील नत्र हे फुलांमध्ये जाते. फुले टिकून राहून, फळधारणा होते. कमतरतेची लक्षणे - पाने पिवळी किंवा फिक्कट पिवळी पडतात. पानांच्या शिरासुद्धा पिवळ्या पडतात. झाडाच्या डहाळ्या वाळण्यास सुरुवात होते. झाडांची वाढ खुंटते, फळांचा आकार लहान होतो. झाडाचे एकूण आयुष्य कमी होते. नत्राची कमतरता असलेल्या झाडांवर प्रमाणापेक्षा जास्त बहार येऊन फळगळ मोठ्या प्रमाणात होते. उपाययोजना ः चांगले कुजलेले शेणखत ५० किलो प्रतिझाड द्यावे. नत्राची शिफारशीत मात्रा दरवर्षी झाडांना द्यावी. कमतरता दिसल्यास एक टक्के युरियाची फवारणी करावी. त्वरित परिणाम मिळतात. हिरवळीचे खत तयार करणारी पिके घेऊन जमिनीत गाडावीत. (उदा. बोरू.) स्फुरद ः स्फुरदाच्या कमतरतेमध्ये पाने करड्या किंवा फिक्कट हिरव्या रंगाची दिसतात. जुनी पाने खाली पडण्याअगोदर वेडीवाकडी होतात. पक्व झालेली फळे मऊ आणि ओबडधोबड होतात. झाडाची वाढ खुंटते. पानांची गळ होऊन पाने विरळ होतात. बहाराची फुले तरळक येतात. कळ्या सुप्तावस्थेत राहून सुकतात. फळधारणा कमी होते. फळांची प्रत बिघडते. अन्नरस निर्माण होण्याची क्रिया मंदावते. उपाययोजना ः स्फुरदाची योग्य मात्रा दरवर्षी झाडांना द्यावी. स्फुरदाची कमतरता दिसून आल्यास पाने व जमिनीचे पृथःकरण करून घ्यावे. त्यानुसार खते द्यावीत. पालाश ः पेशींच्या विभाजनासाठी पालाशची गरज असते. पालाशमुळे झाडात कडकपणा येतो. झाड रोगास व कीडीस बळी पडत नाही. झाडाची पाण्याचा ताण व कडाक्याची थंडी सहन करण्याची क्षमता वाढते. पालाश हा नवतीमध्ये जास्त असतो. पुढे पानामधून परिपक्व फळामध्ये जातो. फळांची प्रत सुधारते. उत्पादनात वाढ होते. पालाश कमतरेची लक्षणे - संत्रा झाडाची पाने पिळल्यासारखी वेडीवाकडी व सुरकुत्या पडल्यासारखी होतात. शेंड्याची वाढ थांबते. झाडे खुरटल्यासारखी होतात. पानांचा रंग पिवळा ते तपकिरी होतो. फळांचा आकार लहान राहतो. उपाययोजना - पालाशची कमतरता असलेल्या जमिनीमध्ये पोटॅशिअम सल्फेट किंवा म्युरेट ऑफ पोटॅश या खतांचा वापर करावा. झाडावर पोटॅशिअम नायट्रेटची एक टक्के फवारणी करावी. आपल्याकडील जमिनीमध्ये पालाशचे प्रमाण भरपूर असले तरी ते उपलब्ध स्वरूपात नसते. परिणामी वरखतातून ती गरज भागवावी लागते. त्याचप्रमाणे पालाशचे अधिक्य असलेल्या जमिनीत जस्त, मॅग्नेशिअम आणि मॅंगेनीजची कमतरता भासते. लिंबूवर्गीय फळपिके असलेल्या जमिनीचे पृथःकरण केल्यानंतर प्रामुख्याने या जमिनीत लोह, जस्त, मॅंगेनीज, तांबे या चार अन्नद्रव्यांची कमतरता असल्याचे दिसून आले आहे.

जस्त (झिंक) ः चुनखडीयुक्त जमिनीत जस्ताची कमतरता असल्याचे आढळते. लक्षणे - शेंड्याकडील पानांच्या शिरांमध्ये पिवळे ठिपके दिसतात. पानांच्या मध्य व इतर शिरा बाजूने रंगहीन होतात. पाने लहान अरुंद, टोकदार आणि वेडीवाकडी होतात. कधीकधी पिवळ्या पडलेल्या भागांवर हिरवे ठिपके आढळतात. जस्तांच्या कमरतेमुळे झाडांच्या डहाळ्या उभट आणि झुपकेदार होतात. वेडीवाकडी झालेली पाने लवकर खाली पडून शेंडेमरसारखी लक्षणे दिसतात. फळे लहान, ओबडधोबड आणि पांचट होतात. उपाययोजना ः झिंक सल्फेट ०.२ टक्के तीव्रतेची नवीन नवतीवर फवारणी करावी. मॅंगेनीज ः या मूलद्रव्यांच्या कमतरतेमुळे फिक्कट हिरव्या रंगाच्या पानावर गर्द हिरव्या रंगाच्या शिरा दिसून येतात. या मूलद्रव्यांच्या कमतरतेमुळे फळाच्या आकारावर काही परिणाम होत नाही. झाडाच्या ज्या भागावर सावली असते, त्या भागात या मूलद्रव्याची कमतरता पानामध्ये दिसून येते. उपाययोजना ः

  • मॅंगेनीज सल्फेट १० किलो प्रतिहेक्टर जमिनीतून द्यावे. किंवा
  • मॅंगेनीज सल्फेट ०.५ टक्के अधिक चूना ०.२५ टक्के यांची फवारणी करावी. किंवा
  • मॅंगेनीज सल्फेट ०.३ टक्के फवारणीद्वारे द्यावे.
  • लोह (आयर्न)- या मूलद्रव्यांच्या कमतरतेचे मुख्य लक्षण म्हणजे पाने फिक्कट हिरवी किंवा पिवळी पडून त्यावर जाळीदार शिरा दिसून येतात. अशी पाने गळून पडतात. फळांचा आकार वाढत नाही. साधारणपणे अल्कधर्मी जमिनीत या अन्नद्रव्याची कमरता जाणवते. उपाययोजना ः

  • जमिनीतून फेरस सल्फेट १० किलो प्रतिहेक्टर या प्रमाणात द्यावे.
  • झाडावर ०.४ टक्के फेरस सल्फेट अधिक चूना ०.२ टक्के यांची फवारणी करावी.
  • तांबे (कॉपर) - या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे कोनात निघणाऱ्या फांद्यावरील पाने लांब, मऊ (ठिसूळ) होतात. नवीन निघणाऱ्या फांद्यासारख्या आकारात वाढतात. लहान फांद्यावर पाने येतात व लवकर गळतात. फांद्याच्या सालीवर डिंक बाहेर येतो. या मूलद्रव्याची कमतरता पानांपेक्षाही फळांवर अधिक प्रमाणात दिसून येते. फळांवर गडद तपकिरी रंगाचे काळे ठिपके व डिंकयुक्त उंचवटे दिसून येतात. उपाययोजना ः

  • झाडांवर ०.३ टक्के कॉपर सल्फेट अधिक चूना ०.२ टक्के यांची फवारणी करावी.
  • नत्रयुक्त खतांचा जास्त वापर करू नये.
  • बुरशीनाशकांची फवारणी करताना ताम्रयुक्त बुरशीनाशकांचा वापर करावा.
  • सूक्ष्म अन्नद्रव्ये देताना घ्यावयाची काळजी ः

  • काही सेंद्रिय आम्ले विशेषतः सॅलिसिलीक आम्ल, टार्टारीक आम्ल, सायट्रिक आम्ल ही सौम्य प्रमाणात चिलेटिंग करतात. त्यामुळे ही खते चांगल्या कुजलेल्या शेणखतातून द्यावीत.
  • चिलेटिंग स्वरूपात सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर केल्या सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांमध्ये १० ते २० टक्के एवढी कपात करता येते.
  • बागेतील झाडांचा ताण संपल्यानंतर पहिले पाणी दिल्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची पहिली फवारणी करावी. त्यामुळे येणाऱ्या नवीन फुटीला ही अन्नद्रव्ये उपयोगी पडतील.
  • पहिल्या फवारणीनंतर तीन ते चार महिन्यांनी दुसरी फवारणी करावी. त्यामुळे झाडे अधिक सशक्त आणि तजेलदार राहून फळे भरपूर येतात.
  • रासायनिक खते देताना घ्यावयाची काळजी

  • खते देताना जमिनीत पुरेसा ओलावा असावा.
  • भर पावसात खते देऊ नयेत.
  • अन्नद्रव्ये नवी पालवी फुटण्याच्या कालावधीमध्ये उपलब्ध होतील, अशा प्रकारे द्यावीत.
  • खते विभागून दिल्यास कार्यक्षमता वाढते.
  • शेणखत आणि कंपोस्ट खतांचा वापर नियमित करावा.
  • जमिनीची आम्लता व क्षारता न वाढवणारा खते वापरावीत.
  • खताची कार्यक्षमता वाढवण्यासाठी जैविक खतांचा वापर करावा.
  • डॉ. सुरेंद्र पाटील, ९८८१७३५३५३ (लेखक उद्यानविद्या विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे कार्यरत आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com